''तुका म्हणे व्हावी
प्राणासवे ताटी
नाही तर गोष्टी
बोलू नये''

आपण श्रध्दांजली वाहिली. त्यांना श्रध्दांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या ध्येयाला श्रध्दांजली. आज सर्वोदय, समन्वय अनेक
शब्द उच्चारले जात आहेत. सर्वांचा उदय व्हावा, सारे सुखी व्हावेत म्हणून प्राचीन ॠषीश्वरांपासून सारे सांगत आले. परंतु केवळ  शब्दोच्चाराने सारे सुखी कसे व्हायचे हा प्रश्न आहे. सर्वाचा उदय व्हावा म्हणूनच स्वराज्य हवे होते. परंतु सर्वांच्या उदयाची तीव्रता लागूल राहिली आहे का? भांडवलदारांना शतसवलती देऊन, आणखी काही वर्षे तुमचे कारखाने राष्ट्राचे
होणार नाहीत असे आश्वासन देऊन त्यांचा उदय सुरक्षित केला जात आहे. गरिबांचे काय? - हा प्रश्न आहे.

महात्माजींनी स्वराज्यात चार गोष्टी हव्यात म्हणून लिहिले होते. (१) आर्थिक समता, (२) सामाजिक समता, (३) धार्मिक समता (४) लोकशाही सरकारचे धोरण पसंत नसेल तर शांततेने विरोध दाखवायला परवानगी. या चार गोष्टी अजून किती दूर आहेत हे पाहिले म्हणजे दुःख होते. वेदना होतात. दिल्लीला महात्माजींनी म्हटले,... ''एक दिवसही स्वतंत्र हिंदुस्थान आर्थिक विषमता सहन करणार नाही.'' परंतु आज काय दिसते? शेतकर्‍याला दिलीत जमीन? काटकसर करून विकत घे असे सांगणे म्हणजे सर्वोदयी श्रध्दा नव्हे. शेतमजुराजवळ मालकीची जमीन नाही. त्याच्याजवळ दोन-चार बिघे जमीन विकत घेण्याइतके पैसे कधीही साठणार नाहीत हे का काँग्रेसी मंत्र्यांना माहीत नाही? चलनवाढीची सबब न सांगता जमीनमालकाला दीर्घ मुदतीची सेव्हिंग्ज सर्टिफिकिटे द्या आणि शेतमजुराला जमीन द्या. कानावर आले की, कोणी काँग्रेसचे बडे अधिकारी म्हणाले, पुढच्या निवडणुकीनंतर हे करावयाचेच आहे. तुमच्या निवडणुकीसाठी आज या लोकांना असेच सडत पिचत ठेवणार होय? गरीबांच्या चितेची होळी पेटत ठेवून त्यावर भावी निवडणुकीची भाकर भाजणार? दुसर्‍यांना सत्तालोलुप म्हणणार्‍या  या लोकांची ही सत्ता टिकविण्याची कारस्थाने पाहिली की किळस येतो. जो प्रकार शेतकर्‍याच्या बाबतीत तोच प्रकार कामगारांच्या बाबतीत. उत्पादन वाढवा, उत्पादन वाढवा म्हणून त्यांना येता जाता सारे डोस पाजीत आहेत. चार महिन्यांत १०० कोट नफा उकळणार्‍या गांधीभक्त मालकांसाठी का अधिक उत्पादन करायचे? ज्या कारखान्यात आपण श्रमतो तेथील माल जनकल्याणार्थ आहे, जनता पिळली जाणार नाही, काळा बाजार होणार नाही, तेथील नफा धनवंतांच्या विलास दगडी राजवाडयात उधळला जाणार नाही ही खात्री वाटली तर कामगार आनंदाने नाचत वाटेल तितका श्रमेल. परंतु जोवर गरिबांची होते होळी, बडयांची पिकते पोळी, - हे त्याला दिसत आहे तोवर त्याचा जीव अधिक उत्पादनात संपूर्णतया कसा रंगेल? एवंच, आर्थिक समता दूर आहे. आणि सामाजिक समता? जोवर शिक्षणाने, राहणीने, संस्कृतीने सर्व थर समान पातळीवर येत नाहीत तोवर सामाजिक विषमता तरी कशी दूर होणार?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel