पुस्तकाबाहेरचा इतिहास
मी कधी वाचलाच नाही
माझ्या वाट्याचा शिवाजी
माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही

शिवाजी म्हणजे किल्ल्यावरचा छावा
शिवाजी म्हणजे गनिमी कावा
घोड्यावरचा शिवाजी कधी
खाली उतरलाच नाही
माझ्या वाट्याचा शिवाजी
माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही

हिंदवी स्वराज्य जाहले:
त्यात यवन कसे भले?
धर्म-अधर्माचा कावा मला
कधी समजलाच नाही
माझ्या वाट्याचा शिवाजी
माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही

कुणी दिली भवानी तलवार?
तरी का घ्यावी लागे माघार?
अंधश्रद्धेचा गुंता मला
अजूनही सुटलाच नाही
माझ्या वाट्याचा शिवाजी
माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही

शिवाजीचा गुरू होता कोण?
काय दिले त्याने शिवास ज्ञान?
त्याच्या गुरूचा शोध अजून
कुणास कसा लागलाच नाही
माझ्या वाट्याचा शिवाजी
माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही

कोणती शिवबाची जन्मतारीख?
फेब्रुवारी होती की होती वैशाख?
उद्या तुम्हीच म्हणाल
शिवाजी कधी जन्मलाच नाही
माझ्या वाट्याचा शिवाजी
माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही

कवी-  संजय दोबाडे, नाशिक
मो. - 976767649544

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel