सैतान व माधव हवेतून दौडत येत होते. त्यांनी आपली गती जरा मंदावली. ‘ठक ठक’ आवाज कानावर आला. कोठून येत होता तो आवाज? ठक ठक. कोण काय ठोकीत होते? कोण काय दुरुस्त करीत होते? इतक्यात माधवाला दोनचार माणसे दिसली. ती माणसे काही तरी उभारीत होती.

‘काय रे, काय चालले आहे तेथे?’ माधवाने विचारले.

‘तुला काय करायचे आहे?’ सैतान म्हणाला.

‘ठकठक आवाज येतो आहे. कशाची तयारी? काय उभारताहेत?’

‘अरे, एका अभागी जिवाला उद्या सकाळी येथे फासावर द्यायचे आहे. त्यासाठी ही तयारी. त्यासाठी तो वधस्तंभ.’

‘कोण आहे असा अभागी जीव?’

‘तुला काय करायचे आहे?’

‘सांग त्याचे नाव. काय त्याने केले?’

‘नाव सांगितले तर तुला वाईट वाटेल.’

‘का बरे? माझ्या ओळखीचा आहे तो जीव ?

‘नुसत्या ओळखीचा नाही, तर प्रेमाचा.’

‘प्रेमाचा? कोणावर केले मी प्रेम? जगात अशी कोणती वस्तू आहे, कोणती व्यक्ती आहे की, जेथे माझे आतडे गुंतले आहे? हा माधव अनासक्त आहे’.

‘वाहवा रे अनासक्ती!’

‘सांगतोस की नाही नाव?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel