‘वेडी आहेस तू. तो पाहा सूर्य अस्तास जात आहे. आकाशात अग्नी पेटला आहे. त्या अग्नीसमोर आपण लग्न लावू. ये. हा पाहा वारा गुणगुण करतो आहे. वारा जणू विवाहमंत्र म्हणत आहे. ही पाहा फुले वरुन पडत आहेत. हया जणू अक्षता. त्या लहानशा मांडवातल्या लग्नापेक्षा विश्वाच्या विशाल मंडपात हे लग्न अधिक पवित्र नाही का?

‘मला काही समजत नाही. मी वेडी आहे. तुमचे म्हणणे गोड वाटते, खरे वाटते; परंतु खात्री होत नाही.’ जुन्या कल्पना आपल्या मानगुटीस बसलेल्या असतात. खरेच, इतके दिवस आपण भेटत आहोत; परंतु माझे नाव मला माहीत नाही. काय तुझे नाव?;

‘काय करायचे नावाशी?’

‘नामरुप शेवटी मिथ्या आहे; परंतु व्यवहारासाठी त्याची जरुरी आहे.

सांग, तुझे नाव सांग.’

‘आधी तुमचे सांगा.’

‘हट्टी आहेस तू.’

‘स्वभावच आहे तो आमचा. सांगा ना नाव.’

‘माझे नाव माधव.’

‘सुंदर नाव.’

‘तुझे सांग.’

‘मधुरी’

‘खरोखर तू मधुर आहेस. त्रिभुवनातील सारी गोडी तुझ्यात ओतली गेली आहे. मधुरी. मधुर. गोड नाव.’

‘जाते आता मी.’

‘रोज जाते जाते म्हणतेस?’

‘मग काय करु?’ लग्न लावा म्हणजे असे म्हणावे लागणार नाही.’

‘मधुरी!’

‘काय’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel