आईसमोर पोर उभे होते. पाण्यातील ढेकळाप्रमाणे विरघळलेले पोर उभे होते. ते थरथरत होते, शतभावनांनी थरथरत होते. मोक्षवेळ आली. अहंकार हरला, मद गळला, भक्तीचा उदय झाला. आईच्या भेटीची वेळ आली. सारे पडदे दूर झाले.

बाळ वाकला-पडला, आईच्या चरणावर पडला- “आई, आई, माझ्या आई !” एकच शब्द, दुसरा शब्द बोलवेना. “बाळ, बाळ ” “आई, आई !” ‘बाळ’ आणि ‘आई’ या दोन शब्दांहून दुसरे कोणते शब्द अधिक पवित्र आहेत ? अधिक गोड आहेत ? सा-या श्रुतिस्मृती, सारी महाकाव्ये, सारी महान सारस्वते या दोन शब्दांपुढे तुच्छ आहेत !

मालती चमकून उठली,
“वात का हो झाला ! अरेरे ! खाली का पडले ? घात झाला ! असे काय करता ? राधाबाई ! शुद्ध नाही का हो ? असे काय करतात ?” मालती रडत घाबरत बोलू लागली.

“मालती, घात नाही. वात नाही, शुद्ध गेली नसून आज आली. आज मी खरा शुद्धीवर आहे, इतके दिवस अहंकाराच्या वातात होतो, गर्वाच्या धुंदीत होतो. माझी आई, ही मोलकरीण राधाबाई माझी आई ! माझ्या आईला मी मोलकरीण केले ! बाबांना मी मारले ! आई, काय करू मी ? मालती, धर माझ्या आईचे पाय धर.” बाळाला अश्रू आवरत ना.

“बाळ नीज आता. होय हो, मी तुझीच आई हो ! आईला बाळ परत मिळाला हो ! ऊठ, नीज शांत पड.” आई हात फिरवीत म्हणाली.

“तू माझे डोके मांडीवर घे. आई, लहानपणीचे सुख मला पुनः अनुभवू दे, मला लहान होऊ दे.” बाळ बोलला.

“हो, घेत्ये हो मांडीवर डोके, पण आता ऊठ, वर गादीवर नीज.” असे म्हणून राधाबाईंनी बाळाला उठविले. मालतीने सावरले. बाळ पलंगावर पहुडला, आई उशाशी बसली. बाळाने आईच्या मांडीत डोके खुपसले. अंगावर पांघरुण घातले. आई बाळाला थोपटू लागली.

पाळण्यात दिनेश रडू लागला. “दिनेश उठला गं-” दिनेशची आजी म्हणाली. तुम्ही बसा. मी घेत्ये व आधी तुमच्या पायांवर घालत्ये.”  मालती म्हणाली. दिनेशला तिने काढून आणले व आजीच्या पायांवर घातले. “अगं, तो माझ्या पायांवर रोजच असतो.” असे त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत आजी म्हणाली. मालती पायांवर डोके ठेवून म्हणाली, “क्षमा करा मुलीला.” “वेडी मुलगी. जा, त्याला कुशीत घेऊन नीज. पहाटेचा तो झोपेल आणि तूसुद्धा नीज अजून.” आजी प्रेमाने म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel