‘बुधा, तुला सारे कसे आठवते?’
‘काही काही गोष्टींचे अभंग ठसे उमटतात मधुरी!’

‘आणि समुद्रकाठी उभी असलेली ही मधुरी!’
‘हो. सागराला विचारीत आहे, कोठे आहे माझे मोती, माझे रत्न!’

‘बुधा, तू का नेहमी चित्रे काढीत बसस?’
‘हो, तुला रंगवीत बसे.’

‘मधुरी बेरंग आहे. माझ्या जीवनात आता नाही हो रंग.’
‘मी पुन्हा भरीन. मला रंग भरता येतात. छान छान रंग. परंतु देशील ना ते भरू? तुझ्या जीवनात मी रांगोळी घालीन. तेथे रांगोळीचे गालिचे घालीन.

‘रांगोळीचे गालिचे?’
‘मग कसले मधुरी?’

‘मला नाही असले बोलणे समजत. मधुरी भोळी आहे. साधी आहे.’
‘मी साध्याच गोष्टी बोलत आहे.’

‘ठेव ती चित्रे. कागदावरची चित्रे.’
‘दुसरीही आहेत. जी फाटणार नाहीत, भिजणार नाहीत, मळणार नाहीत.’

‘कोठे आहेत ती!’
‘बुधाच्या अंतरंगातील दिवाणखान्यात. तेथे मधुरीची शेकडो चित्रे; मधुरीच्या अनंत तसबिरी.’

‘बुधा, जरा पडते आता मी. तू पडतोस?’
‘मी घरी जातो.’
‘सायंकाळी ये हो. दिवे लावायला ये.’

आणि मधुरी झोपली. गोड गोड झोप तिला लागली. गोड गोड झोप.
अशीच दिवाळी गेली. आनंदाची दिवाळी झाली. मधुरीच्या जीवनात दिवे लागले. बुधाच्या जीवनात प्रकाश आला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel