‘मग तुम्हांला कोण?’
‘आई, तू आहेस ना. जाऊ दे बाबांना. खाऊ आणतील.’
‘परंतु आई मारते ना रे?

‘परंतु घेतेसुध्दा. तुमच्यापेक्षा आईच जास्त घेते.’
‘मी नाही घेत?’
‘तुम्ही किती उशिरा येता. तुमची वाट पाहून आम्ही झोपतो. नाही का ग आई?’
‘जा बाहेर. नको रे सारखी कटकट करु.’

‘आमची कटकट. बाबांची नाही वाटते कटकट? बाबा नि तू किती वेळ बोलत असता. त्या दिवशी मी जागा झालो तो बाबा नि तू आपली बोलतच होतात. तुम्हांला झोप नाही येत रात्री?
‘अरे मनी रडते आहे. जा, मुंगीबिंगी चावली असेल.’

सोन्या बाहेर गेला. मधुरीच्या अंगावर पांघरुण नीट घालून मंगा चुलीच्या कामाला लागला. आज त्याने स्वयंपाक केला. त्याने मुलांना आधी जेवू घातले. मग मधुरी व मंगा जेवायला बसली.
‘आज जेवण गोड आहे मंगा.’
‘म्हणजे रोज मी करु वाटते?’

‘हो कर. मी मजुरी करीन. तू जेवण कर. मंगा किती दिवसांत तुझ्या हातची भाकर खाल्ली नव्हती. अशी आपण प्रेमाने किती तरी दिवसांत जेवायला बसलो नव्हतो. किती आनंद होतो आहे मला! हा आनंद मधुरीला तू देत असता आणखी कोठे कशाला जातोस? नको हो जाऊ मंगा. मी तुला जाऊ देणार नाही. मंगा माझा आहे. कसा जाईल तो?’

‘मधुरी, मी जाईन, जाईन. तू ब-या बोलाने परवानगी दे. नाही तर मी तुला न कळत निघून जाईन. तुला सांगून जाऊ की न सांगता जाऊ? तुझा निरोप घेऊन जाऊ, की पळून जाऊ?’

‘मंगा, आधी मला बरी होऊ दे. तू असे आजच बोलू लागला तर मला आणखी वाईट वाटेल. मी बरी होईपर्यंत तरी जाण्याच्या गोष्टी करु नको.’

जेवणे झाली. मंगाने मधुरीचे अंथरुण झाडून दिले. त्याने केरही काढला. दोघे बसली होती. हातात हात घेऊन दोघे बसली होती. मधुरी थोडया वेळाने झोपली. मंगाही झोपी गेला.

काही दिवसांनी मधुरी बरी झाली. मंगा पुन्हा कामावर जाऊ लागला. परंतु परदेशात जाण्याचा मोह त्याला अनावर होऊ लागला. तो अस्वस्थ होऊ लागला. त्याला खाणेपिणे सुचेना, रुचेना. तो बोलेना. एके दिवशी तो मधुरीला म्हणाला, मधुरी, मी जाण्याचे ठरवीत आहे. समुद्राच्या लाटा मला बोलवीत आहेत. त्यांची हाक मी नाकारु शकत नाही.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel