‘कित्येक दिवसांनी मी आज बाहेर पडलो आणि हे फूल मला एकाने प्रेमाने दिले. मला नाही म्हणवेना. ते मी घेतले. परंतु अद्याप त्याचा वासही मी घेतला नाही. माझ्या जीवनात एकाच फुलाचा वास भरुन राहिला आहे.’
‘कोणत्या फुलाचा?’

‘माझ्या मधुरीचा. तुझे माझ्यावर प्रेम आहे. मी दिलेले फूल तू घेतलेस. मग तू माझे प्रेम का घेत नाहीस? तू माझा हात कायमचा स्वत:च्या हातात का घेत नाहीस? मी एकटा आहे. माझ्या घरात ये माझी राणी हो. माझ्या घरात आनंद आण. सौंदर्य आण. माझ्या जीवनात मधुरता आण. सफलता आण. मला कृतार्थ कर.’
‘बुधा, तशा प्रकारच्या माझ्या प्रेमावर मंगाचा अधिकार आहे.’

‘आणि माझा नाही?’
‘आधी त्याचा. मंगा नसेल तर बुधा.’
‘का नाही मरत तो मंगा?’
‘बुधा, काय रे बोलतोस? मधुरीची मान का कापू पहातोस?  करशील हो मंगाचा खूनबीन. तू नाहीसच मला आवडत जा. तू असा दुष्ट आहेस हे नव्हते माहीत.’

‘मधुरी, मनुष्य वैतागला म्हणजे असे बोलतो. पुन्हा नाही हो मी असे बोलणार. मला क्षमा कर. माझ्या मनाची वेदना ह्या शब्दांवरुन ओळख. ह्या शब्दांवरुन माझ्यावर राग न करता माझी कीव कर. मधुरी, लहानपणी आपण खेळत असू. तू काय म्हणत असस? आपण लटोपटीच्या लग्नाचा खेळ खेळत असू. आम्ही दोघे नवरदेव होण्यासाठी भांडत असू. मंगा एकदा तुझ्यासाठी फुले व हार घेऊन आला होता. फुलांनी त्याने तुला नटविले व प्रथम त्यानेच तुला माळ घातली. मी रडलो. तू समजूत घातलीस व काय म्हणालीस?'

‘काय बरे म्हटले?’
‘तुला नाही आठवत ते शब्द?’
‘नाही.’
‘खोटे सांगतेस. ते शब्द तू कधीही विसरणार नाहीस.’

‘लहानपणाचे बुधा आपण विसरतो.’
‘सारेच नाही विसरत. महत्त्वाचे कोणी विसरत नसतो.’
‘सांग ना काय मी म्हटले ते.’
‘तू म्हणालीस की मी तुमची दोघांची बायको होईन.’
‘बुधा, परंतु आता दोघांची मोठी बायको एकदम कशी होऊ? तू वेडा तर नाहीस! मंगाशी माझे मनाने लग्न लागले आहे.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel