सावध प्रकरण १५
“हो नक्की लगेच करूया पोलिसांना सहकार्य करायला मी तयारच असतो. पण हेही लक्षात ठेव तारकर की माझ्या अशिलाचा माझ्यावर जो विश्वास आहे त्याला मी तडा जाऊन देऊ शकत नाही”
तारकर ने त्याच्या हाताखालच्या पोलिसाला खूण केली हाताचे ठसे घेण्याचं एक उपकरण त्यांने आपल्या बॅगेतून बाहेर काढलं “उठून उभा रहा” तारकर म्हणाला
“ओह नो. मी बसूनच करतो हा प्रकार.” पाणिनी हसून म्हणाला आणि त्याने आपला हात त्या पोलिसाच्या पुढे केला.
हा सगळा प्रकार गडकरी बघत होता तो अचानक उद्गारला, “मला नाही वाटत मी बघितलेला माणूस हा आहे. मी जो माणूस बघितला होता तो खूपच जाड होता आणि..,.”
“जरा गप्प बस  आणि थोडा वेळ बाहेर जा.हा माणूस उभा राहिलेला असताना , चालत असताना आणि त्याने त्याचा कोट अंगावर घातलेला असताना तू त्याची ओळख पटवायची आहेस इथे त्याच्या टेबलामागे खुर्चीवर बसलेला असताना नाही.” तारकर रुद्रांश गडकरी ला म्हणाला
“तारकर मी तुला असलं काहीही ते करून देणार नाही या माणसाने माझी ओळख पाठवावी असं वाटत असेल तर माझीच अंगकाठी असलेल्या इतर लोकांना माझ्याबरोबर पोलीस चौकीत उभं करून तू त्याच्याकडून माझी ओळख पटव.” पाणिनी म्हणाला.
“एखादी गोष्ट करण्याची एक सोपी पद्धत असते आणि अवघड पद्धतही असते तुला जर सोप्या पद्धतीने मी जावं असं वाटत नसेल तर माझ्याकडे अवघड पद्धत सुद्धा आहे.”-तारकर
“तुला जी पद्धत वापरायची असेल ती वापर तारकर. आता या क्षणाला मला एवढेच करायचे की तुला हवे असलेल्या ठसे तुला द्यायचेत” –पाणिनी
मायरा आपले डोळे मोठे करून पाणिनी कडे बघत होती कोळवणकर ने  पण पाणिनी कडे बघितलं नंतर आपले डोळे पुन्हा दुसरीकडे वळवले तोपर्यंत त्या पोलिसांनी पाणिनीच्या हाताचे ठसे घ्यायचे काम पूर्ण केलं होतं
“झालय माझं काम पाणिनी” तारकर म्हणाला. “आता तू आत जाऊन तुझा हात साफ करू शकतोस”
पाणिनी हसला “धन्यवाद तारकर. मी उठलो की लगेच तुझा साक्षीदार आत येईल आणि त्याच्याकडून तू माझी ओळख पाठवायचा प्रयत्न करशील. सौम्या आपल्या ऑफिसमधले टिशू पेपर घेऊन ये जरा हात पुसायला” पाणिनी म्हणाला
“पाणिनी तुला बसून राहायचं असेल तर बसून रहा पण तू काही तिथे कायम बसून राहू शकत नाहीस केव्हा तरी तुला तुझं हे ऑफिस सोडायलाच लागेल आणि जेव्हा तू बाहेर पडशील तेव्हा मी माझ्या या साक्षीदाराला तुला ओळखायला लावीन.”—तारकर
 
तारकरने पाणिनी ते घेतलेले ठसे भिंगातून बघितले आणि एकदम उद्गारला.
“ज्या रिव्हॉल्व्हरने खून झाला आहे त्याच्यावर तुझ्या हाताचे ठसे आहेत”
“खरंच की काय !” पाणिनी म्हणाला
“पाणिनी तुला याबद्दल काय म्हणायचंय?”
“काहीच म्हणायचं नाहीये.”
“मिस्टर पटवर्धन मी आता तुला अधिकृत सांगतोय, ज्या रिव्हॉल्व्हरवर तुझ्या हाताचे ठसे मिळाले त्या रिव्हॉल्व्हरनी जयद्रथ परब चा खून झालाय त्यामुळे मी तुला पुन्हा विचारतोय याबद्दल तुझं काय म्हणणं आहे?”—तारकर
“माझं म्हणणं एवढंच आहे की मी माझ्या अशीलाच्या हिताची जपणूक करतोय.”
“तुझ्या हाताचे ठसे मर्डर वेपन वर कसे आले याचा खुलासा न करता तू तुझ्या अशिलाच्या हिताचं रक्षण करू शकत नाहीस” तारकर म्हणाला
“याबाबतीत तुझं आणि माझं एकमत होऊ शकत नाही तारकर.” नंतर तारकर कडे दुर्लक्ष करून पाणिनी सौम्याला उद्देशून म्हणाला, " सौम्या तारकर ने आपल्याला दुसऱ्या पत्राबद्दल काहीच विचारलं नाही आणि मायरा ने सुद्धा त्याला त्याबद्दल काही सांगितलं नाही याचं कारण तिला या दुसरा पत्राबद्दल काहीच माहित नाहीये कारण सकृत दर्शनी असे दिसते की पहिलं पत्र हे तिने दिले पण ते दुसरं पत्र मात्र दुसऱ्याच कोणीतरी लिहिले तिला माहित पडू न देता"
" कुठल्या पत्राच्या संदर्भात बोलतोयस तू पाणिनी ?"
" सौम्या ते पत्र जरा इकडे आण ज्याच्याबरोबर टेबलाचा ड्रॉवर उघडण्याची किल्ली आली होती"
सौम्यान ते दुसरे पत्र आणून तारकर कडे दिलं
"हे पत्र स्पेशल कुरियर नी आलं" पाणिनीम्हणाला
तारकर ने हे पत्र काळजीपूर्वक वाचलं
"या पत्राबरोबर किल्ली आली पाकिटातून?"
"हो. टेबलाचा ड्रॉवर उघडण्याची किल्ली" –-पाणिनी
"कुठे आहे किल्ली?"
" दोन्ही किल्ल्या इथेच आहेत माझ्याकडे. बघायच्या आहेत तुला?"
तारकर ने दोन्ही किल्ल्या हातात घेऊन काळजीपूर्वक बघितल्या त्याच्या चेहऱ्यावर वैतागल्याचे भाव उमटले
"तारकर, स्वाभाविकपणे मी असं गृहीत धरून चाललो की माझ्या हातात पुरावा पडावा अशी मायरा ची इच्छा होती, पण तो पुरावा तिने मला दिला आहे हे दुसऱ्या कोणाला कळू नये अशी ही तिची इच्छा होती. म्हणूनच ती आणि आदित्य कोळवणकर जेव्हा काल दुपारी माझ्या ऑफिसला आले तेव्हा मी काहीतरी निमित्त काढून त्यांना इथे गुंतवून ठेवून तिच्या फ्लॅटमध्ये जाऊन टेबलाचा ड्रॉवर उघडण्याचा साहस केल. मला पत्राबरोबर आलेली ही दुसरी किल्ली टेबलाच्या ड्रॉवरला बरोबर लागली आणि ड्रॉवर उघडला गेला वरच्याच बाजूला एक छोटी वही आणि रिव्हॉल्व्हर होतं. हे पत्र कोणी लिहिले हे जर तू शोधून काढू शकलास तर परब च्या खुन्यापर्यंत तू सहज पोचू शकशील."
अरे पाणिनी याचा अर्थ तू ती किल्ली लावून तिच्या घरात शिरलास आणि तिथल्या सगळ्या वस्तू...... नाही नाही हे फारच गंभीर प्रकरण आहे."
“ओ तारकर कम ऑन... मी तिच्या फ्लॅटमध्ये तिच्या परवानगीनेच शिरलो लक्षात ठेव कारण पहिलं पत्र आणि त्याच्याबरोबर आलेली फ्लॅट ची किल्ली ही कपाडिया नेच पाठवलं होतं त्यामुळे मला तिच्या फ्लॅटमध्ये शिरायचा अधिकार होता पण हे दुसरं पत्र मात्र काहीतरी सापळा लावल्यासारखं होतं."
पाणिनी तू टेबलाचा ड्रॉवर ती किल्ली लावून उघडलास तिथे रिव्हॉल्व्हर होतं?"
"रिव्हॉल्व्हर होतं तिथे, आणि टेबलाचा ड्रॉवर लॉक होता याचा अर्थ काय निघतो तारकर? कोणाकडे तरी त्या ड्रॉवरची डुप्लिकेट केली होती. ज्याच्याकडे ती होती त्याने ती मला पाठवली. आता लक्षात घे तारकर मायरा कपाडिया माझ्या ऑफिसमध्ये असतानाच मी तिच्या फ्लॅटमध्ये गेलो आणि ड्रॉवर उघडला त्यावेळेला ड्रॉवरमध्ये रिव्हॉल्व्हर होतं याचाच अर्थ असा की मायरा कपाडिया माझ्या ऑफिसमध्ये असताना तिच्याकडे ते रिव्हॉल्व्हर नव्हतं. आणि त्या रिव्हॉल्व्हर वरती तुला मायराचे हाताचे ठसे जर मिळाले नाहीत तर तू सिद्ध करू शकणार नाहीस की ते रिव्हॉल्व्हर तिच्याकडे होतं म्हणून. पण याच्यापेक्षा अधिक मी तुला काही सांगू शकणार नाही तुला मी बोलता बोलता बऱ्याच काही टिप्स दिल्या आहेत."पाणिनी म्हणाला
अचानक तारकर च्या एक गोष्ट लक्षात आली आणि तो त्याच्या हाताखालच्या पोलिसाला म्हणाला," मायरा कपाडिया आणि कोळवणकर दोघांनाही बाहेर घेऊन जा हा पाणिनी पटवर्धन चतुर आहे तो माझ्याशी बोलत नाहीये तो मायरा कपाडिया आणि कोळवणकर यांना उद्देशून बोलतोय थोडक्यात त्या दोघांनी काय जबानी द्यावी याचा क्लू तो त्यांना देतोय"
पोलीस उठला आणि त्या दोघांना म्हणाला, "चला बाहेर"
ते बाहेर जाण्यापूर्वी पाणिनी  मायरा कपाडियाला उद्देशून म्हणाला , "वकील म्हणून मी तुला पुन्हा सल्ला देतो की कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ नकोस"
" वकील म्हणून सल्ला?"तारकर उद्गारला," तू मायरा कपाडियाच खुनाच्या प्रकरणात वकील म्हणून काम करतोयस?"
"तिच्यावर खुना चा आरोप ठेवला गेलाय?"
"ठेवला जाऊ शकतो"
"मी तुला सांगितल्यानुसार काल मी जेव्हा तिला भेटायला गेलो तेव्हा तिने मला वकील म्हणून नेमलय"
" कुठल्या प्रकरणात?"
"ते मी तुला सांगू शकत नाही"
" मायरा तू हे मला सांगितलं नाहीस की तू पाणिनी पटवर्धनला वकील म्हणून नेमल आहेस"
"तुम्ही तसं मला विचारलं ही नाहीत"मायरा कपाडिया म्हणाली
"असा काय विषय होता की पटवर्धनला वकील नेमण्याची वेळ आली तुझ्यावर?"
"नाही नाही मायरा उत्तर देऊ नकोस त्याला काही"
"माझ्या वकिलांनी मला काय सल्ला दिला आहे तुम्ही ऐकलंय ना तारकर?" मायरा  म्हणाली
"बाहेर घेऊन जा या दोघांना"तारकर हाताखालच्या पोलिसाला म्हणाला पोलीस त्या दोघांना घेऊन बाहेर गेला
" अगदीच गरज लागल्याशिवाय मी तुला यात अडकवणार नाही पाणिनी" तारकर म्हणाला
" थँक्स तारकर"
"विचार कर पाणिनी उद्याच्या पेपरात जर अशी बातमी आली की वकिलाच्या हाताचे ठसे खुनी हत्यारावर मिळाले तर कसं वाटेल तुला?"
"तू पत्रकारांना बातमी देणार आहेस ही?"
"द्यायला तर लागेलच मला"
"खूप मोठी ठळक बातमी होईल ती"
"या ठळक बातमी खाली आणखीन एक बातमी छापावी लागेल की वकिलाने खुलासा करणे नाकारले"
"खरंच खूप सनसनाटी बातमी ठरेल ही"
ते सगळं जाऊ दे पाणिनी तू आणि मी नेहमी एकमेकांच्या विरोधी बाजूला असतो पण मला तुझ्यावर उगाचच दोषारोप करायचे नाहीत रुद्रांश गडकरी ने जरी तुला बघितल्यासारखं वाटत असलं तरी त्यावेळेला मायराबरोबर तूच होतास याची मला खात्री नाही. आणि दुर्दैवाने असल्यास तर मला असं वाटतं की काहीतरी बनाव रुचून मायराने तुला काहीतरी दाखवण्यासाठी तुला फसवून तिथं आणलं असावं. त्यामुळेच मी तुला हजार वेळा सांगतोय की अशी जर काही गोष्ट असेल तर मला स्पष्ट कर."
"तारकर समज मी तुझं म्हणणं मानलं आणि तुला मी सांगितलं की खरंच तसं घडलंय तर मग मी माझ्या जबाबदारी तून मोकळा होईन?"
मी खात्री देत नाही मृत्यू कधी झाला त्याची वेळ फार महत्त्वाची आहे मृत्यूचे वेळ ठरवताना तासाभराचा फरक पडू शकतो, पण आम्हाला सहा वाजताच कळवलं गेलं असतं तर अगदी मिनिटापर्यंत खुनाची वेळ नक्की करता आली असती खून झाला हे समजल्यानंतर तुझी ड्युटी होती की तू आम्हाला कळवायला हवं होतं. इथे तुझी नक्कीच चूक झाली. बर मला एक सांग जेव्हा तुला तिथे सहाला बोलवलं गेलं तेव्हा प्रेत गॅरेजमध्ये पडलेलं होतं?"
"तारकर मी तुला आधीच सांगितले की मी सहा वाजता कुठे होतो हे मी तुला सांगू शकत नाही"
 कारला धडक देणारा माणूस जर वेगळा होता तर तू  कीर्तीकर कडून नुकसान भरपाईची वसुली कशी काय केलीस?"
"मी नाही केली"
"नाही कशी? मला समजलंय"
"बरोबर आहे तुला समजले ते"
"तू तोंडवळकरला भेटलास त्याच्यावर गाडीला अपघात केल्याचा आरोप केलास अर्थातच त्याला हा विषय वाढवायचा नव्हता त्यामुळे त्यांनी तडजोड करण्याचे मान्य केलं, पण तू त्याला भेटून गेल्यानंतर कीर्तीकर ने काही विचार केला आणि तो तुला भेटायला तुझ्या ऑफिसमध्ये गेला त्यानं त्याच्या ड्रायव्हरला खालीच गाडी थांबायला सांगितलं जेव्हा त्याला कळलं की तू लवकर येणार नाहीस तेव्हा तू तुझ्या ऑफिसमधून खाली आला आणि त्याने ड्रायव्हरला म्हणजे परब  ला गाडी घेऊन जायला सांगितलं"
"अच्छा असं झालं तर"
"कीर्तीकर ने सहा वाजेपर्यंत तुझी वाट बघितली मग विमा कंपनीला फोन लावला आपण कुठे आहोत हे त्यांना सांगितलं विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्याला सांगितलं की तुझ्या ऑफिस मधून बाहेर पड तुझ्याशी काहीही बोलू नको जेवढं लवकर येता येईल तेवढे मी येतो त्यामुळे कीर्तीकर लॉबी मध्ये वाट बघत थांबला जवळ जवळ पाच दहा मिनिटे तो तिथे थांबला तेवढ्यात विमा कंपनीचा माणूस आला आणि त्याला घेऊन बाहेर गेला."
पाणिनी केवळ ऐकत राहिला काहीही बोलला नाही.
"आता विषय असा आहे पाणिनी की कीर्तीकर च्या गाडीने जर दुसऱ्या गाडीला धडक दिली नसेल तर अर्थातच त्यांनी दिलेले पैसे त्यांना परत हवे असणार."
"अर्थातच त्याला परत हवे असणारच" पाणिनी म्हणाला.
"तू असं स्पष्टपणे म्हणत नाहीयेस की तू त्याला पैसे परत करणार आहेस म्हणून"
 
"मी तसंच स्पष्टपणे म्हणत नाहीये कारण मी पैसे परत करणार नाहीये"
"काsssय?" तारकर ओरडला.
"पाणिनी तू मला गोल गोल फिरवतोयस स्वतःलाही अडकवून घेतोयस ही मायरा  कपाडिया पहिल्यांदा मला भेटली तेव्हा तिने मला अजिबात कळू दिलं नाही की त्यांनी तुला वकील म्हणून नेमलय.
“ काय सांगतोस ! ” आश्चर्य दाखवत पाणिनी म्हणाला.
“ मी निघतोय आता पाणिनी, तू विचार कर आणि ठरव काय करणार आहेस ते.” तारकर म्हणाला आणि बाहेर गेला.
“ सौंम्या, अग तू तो जांभळा कोट कुठून आणलास? ”  पाणिनी ने विचारलं.
“ तो कनकचा आहे. आपल्या रिसेप्शनिस्ट गती ने ऐकलं ते कोटा बद्दल बोलत होते.माझ्या लक्षात आलं काय झालं असावं ,मी मागच्या दाराने कनक कडे गेले आणि त्याचा कोट आणून कपाटात ठेवला आणि तुमचा त्याच्या. ”
“ कनक ने विचारलं नाही काय करते आहेस तू?”
“ नाही सर, तो तुमच्या एवढाच चतुर आहे.” सौम्या म्हणाली.
“ तुझ्या एवढा. ” पाणिनी म्हणाला  “ सौम्या, तिथून उठून माझ्या जवळ ये. तुझा पगार मला वाढवायचा आहे.मी उठू शकत नाही नाहीतर तेवढ्यात आपला तारकर यायचा रुद्रांश गडकरी ला घेऊन.”
( प्रकरण १५ )

i

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to सावध