(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

एक दिवस तर योगिताने  कमालच केली. ऑफिस सुटल्यावर  तिने अभिजितला विचारले.मला शॉपिंगला जायचे आहे.माझ्या बरोबर येणार का ? तो तर एका पायावर तयारच होता.

तिला सलवार कमीज घ्यायचे होते. निवडीमध्ये  तिला त्याची मदत हवी होती. एखाद्या शाळकरी पोराच्या उत्साहात अभिजीत तिच्याबरोबर गेला .निरनिराळ्या रंगांच्या एकमेकांना मॅचिंग होतील अशा रंगांच्या, परंतु  भडक नाही अंगावर रंग येणार नाहीत अशा रंगांच्या कपड्यांची निवड त्याने केली .प्रत्येक वेळी तो तिला हा ड्रेस तुला खुलून दिसेल.या ड्रेसमध्ये तू आणखीच सुंदर दिसशील. तू इतरांवर अगोदरच छाप पाडतेस,या ड्रेसने आणखी जास्त छाप पडेल.असे सांगत होता.आणि प्रत्येक वाक्याबरोबर  ती जास्तच खुलत होती. बोलता बोलता त्याने उंची परंतु भडक नसलेली एक साडी काढली.ही साडी तुला खुलून दिसेल. सण समारंभासाठी ही साडी छान आहे .असे सुचविले.

तिनेही आनंदाने ती साडी खरेदी केली. त्या साडीचे पैसे त्याने दिले.ही माझ्याकडून तुला भेट असे तो म्हणाला .ती नको नको म्हणत होती पण त्याने हक्काच्या,मैत्रीच्या , नात्याने तिला ती साडी भेट म्हणून दिली. आतापर्यंत तो अहो जाहो करीत होता .हळूच तो एकेरीवर आला होता .तेही तिला आतून कुठेतरी आवडले होते .ती साडी भेट म्हणून घेताना तिला आतून परमानंद झाला होता .ती मनोमन सुखावून गेली होती .

त्या दिवशी योगिता घरी बरीच उशिरा आली.तिच्या आईचा ती दुकानात असताना एकदा फोन आला.तिने बोलता बोलता मी मैत्रिणीबरोबर दुकानात खरेदीला आले आहे मला उशीर होईल असे सांगितले . अभिजितने तिला विचारले मी तुमची मैत्रीण आहे काय ?त्यावर किंचित लाजून ती म्हणाली मित्र तर आहात ?तुमची माझी मैत्री अजून आईला माहीत नाही .म्हणून मी मैत्रीण म्हणाले.त्यावर अभिजीत म्हणाला .तुम्हाला अनेक मित्र असतील .मग मित्र म्हणाला असता तर काय बिघडले असते ?ते मित्र तर आईना माहित असतील.त्यावर ती काहीही बोलली नाही . आपण मित्राबरोबर दुकानात खरेदी करीत आहोत असे सांगायला काहीही हरकत नव्हती.आईने कोणता मित्र असे विचारल्यावर एखाद्याचे नाव सांगता आले असते.आपण आईजवळ खोटे बोलत नाही .तिने विचारले असते तर अभिजितचे नाव सांगावे लागले असते.अभिजितला मित्रापेक्षा आपण काहीतरी जास्त समजतो असे तिच्या लक्षात आले .ते लक्षात आल्यावर तिची तीच स्वत:शी किंचित लाजली .तिच्या चेहऱ्यावरील बदलते भाव अभिजित निरखीत होता . त्याच्या विशिष्ट स्वभावानुसार तो तिला काय म्हणायचे आहे ते समजतही होता.

घरी आल्या आल्या तिने खरेदीची सर्व पॅकेट्स टीपॉयवर  टाकली.आईने तिला कोणत्या मित्राबरोबर खरेदी करीत होतीस असा डायरेक्ट प्रश्न विचारला.प्रश्न एेकून योगिता दचकली .आई मी मित्राबरोबर खरेदी करीत आहे हे तुला कसे काय कळले ?तिने विचारले.त्यावर तिची आई एवढेच म्हणाली, मी तुझी आई आहे. तुझ्या  बोलण्यातील लहान सहान चढउतार   मला कळतात.त्यांतील अर्थही लक्षात येतो.त्याचप्रमाणे  तुझा चेहरा इतका आरसपानी आहे की त्याच्यावर मला तुझ्या मनातील सर्व कांही वाचता येते. 

तू हल्ली वारंवार केसांवरून हात फिरवीत असतेस.वारंवार आरशात पहात असतेस.तुझ्या नकळत तू जास्त नीटनेटकी रहात असतेस. केव्हा केव्हा स्वतःशीच खुदकन हसत असतेस.परवाच तू बहुधा  पहिल्यांदाच ,ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करून आलीस.आज मला माहीत नसलेल्या मित्राबरोबर खरेदी करायला गेली होतीस.मी तुला फोन केल्यावर मित्राबरोबर असे न सांगता पटकन तुझ्या तोंडातून नकळत मैत्रीण असा शब्द आला.आताही तू त्या मित्राच्या पसंतीनेच सर्व खरेदी केली आहेस हे मी ओळखले आहे.कदाचित त्या मित्राने तुला एखादी भेट दिली असेल.हा मित्र तू तुझ्या आईपासून इतके दिवस लपवून ठेवला आहेस.या सर्वांचा अर्थ एकच तू प्रेमात पडली आहेस.

आईच्या या बोलण्यावर बोलण्यासारखे काहीच उरले नव्हते 

योगिता पुन्हा दहा वर्षांची झाली.आईच्या जवळ धावत जाऊन तिने तिचे तोंड आईच्या कुशीत लपविले .आईने तिची हनुवटी धरून तोंड वरती करीत तिला विचारले,त्याचे नाव काय ? अभिजित असे उच्चारून ती लाजून चपळाईने तिच्या खोलीत पळाली .

दुसऱ्याच दिवशी योगिता अभिजितला घेऊन घरी आली.नाकारण्यासारखे त्याच्यात कांहीच नव्हते.दोन चार दिवसांनी अभिजितने त्याच्या आई वडिलांना योगिताला ऑनलाइन भेटवले.अभिजितचे आईवडील दुसऱ्या शहरी राहात होते.ते दोन चार दिवसांत योगिताला व तिच्या  आई वडिलांना भेटायला इकडे येणार होते.घरच्यांच्या संमतीने दोघांचाही विवाह होणार हे मनोमन सर्वांनीच ओळखले होते .फक्त त्यावर शिक्कामोर्तब होण्याचे शिल्लक राहिले होते .

त्याच रात्री  कॅनडाहून योगिताला मेल आला.पाठोपाठ पत्रही आले .तिने तिच्या आई वडिलांच्या संमतीने कॅनडाला जायचे ठरविले होते. तिने ऑनलाइन इंटरव्ह्यूही दिला होता . तिची चांगल्या पगारावर ऑफिसर पोस्टसाठी निवडही झाली होती.तिचा व्हिसा,विमान तिकिटे , आली होती.खरे सांगायचे तर ती कॅनडा प्रकरण विसरून गेली होती .आता आपल्याला बोलावणे येणार नाही असे कुठे तरी ती मनोमन धरून चालली होती .

गेल्या चार महिन्यांपासून  अभिजित भेटल्यापासून ती ही सर्व गोष्ट विसरून गेली होती.परदेशी जायचे, कॅनडा किंवा अमेरिकेला जायचे,तिथेच सुस्थिर व्हायचे,तिचे स्वप्न होते .त्यावेळी लग्नाबद्दल विचारही तिच्या मनात आला नव्हता .गेल्या चार महिन्यांत वेगाने घटना घडल्या होत्या .आता तिची ती राहिली नव्हती.

इतक्या वर्षांचे उरी बाळगलेले स्वप्न पुरे करायचे की येथे अभिजितमध्ये अडकून पडायचे, तिचा निर्णय होत नव्हता.उद्या ऑफिस सुटल्यावर अभिजीत नेहमीप्रमाणे भेटेलच. त्याला सर्व काही मोकळेपणाने सांगू .नंतर निर्णय घेऊ असे तिने ठरविले. 

रात्रभर विचार करून तिने कॅनडाला जायचे निश्चित केले होते .तिचा स्वतंत्र बाणा, तिचे पुरुषी विचार, पुन्हा उफाळून आले होते.पुरुषाबरोबर स्त्री परदेशात जायला तयार होते तर मग स्त्रीबरोबर पुरुष परदेशात यायला कां तयार होऊ नये अशी तिची मनोधारणा होत होती .अभिजित परदेशी यायला तयार असेल तर विवाह करू, नाहीतर आपले स्वप्न महत्त्वाचे असा विचार ती करत होती .अभिजितचेही काही स्वप्न असेल,आकांक्षा असतील, विचार असतील, ते ती लक्षात घेत नव्हती. अभिजित आपल्याला भेटलाच नाही असे समजू अशी मनाची समजूत घालीत होती.

दुसऱ्या दिवशी अभिजित तिला जाताना,अॉफिसवर भेटला नाही .गेल्या रात्री तिने त्याला नेहमी प्रमाणे फोन केला होता. फोनवर ती काहीच बोलली नव्हती .खरे म्हणजे तिला ती बातमी फोनवर सांगता येत नव्हती.आपल्या प्रेमाचे काय असे त्याने विचारल्यावर तिला उत्तर देता आले नसते .प्रत्यक्ष भेटल्यावर परिस्थितीनुसार पाहू असा विचार तिने केला होता .

ती अभिजीतच्या घरी गेली.त्याची प्रकृती बरी नसावी अशी तिची समजूत होती.त्याच्या घराला कुलूप होते.ती थोडी हिरमुसली झाली.ऑफिसात न येता आपल्याला न कळवता हा प्राणी कुठे गायब झाला.आपल्या माणसाला कांही सांगायची पद्धत आहे की नाही ?  तिला थोडा रागच आला होता .आपल्याला त्याचा राग येतो .म्हणजेच आपण त्याच्यावर आपला हक्क आहे असे गृहीत धरतो.ही गोष्ट लक्षात येऊन ती अंतर्मुख झाली होती.आपला कॅनडाला जायचा निर्णय योग्य आहे का ?असा संशय तिला येत होता.ती द्विधा मनस्थितीत सापडली होती.  आई वडिलांकडूनही विरोध होणार हे तिला चांगलेच माहीत होते.

योगिताने अभिजीतला फोन केला.त्याच्या वडिलांची प्रकृती अकस्मात बिघडली होती.त्यामुळे रातोरात तो गावी निघून गेला होता.त्याला फोन करायला वेळही मिळाला नव्हता .सर्व गोष्टी पटापट घडल्या होत्या .तिने त्याच्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी केली .काळजी घे म्हणून सांगितले .अशा परिस्थितीत त्याला कॅनडाची बातमी सांगावी असे तिला वाटले नाही .तिचे तिकीट आठ दिवसांनंतर होते. दोन चार दिवसांत तो येईल मग त्याला प्रत्यक्षच सांगू असा विचार तिने केला.अभिजीतला आपल्या निर्णयाचा त्रास होणार याची तिला खात्री होती .वडिलांच्या प्रकृतीच्या  काळजीत तो असताना,वडिलांचे हॉस्पिटलायझेशन,वैद्यकीय मदत, इत्यादींमध्ये तो गुंतलेला असताना, त्याला आणखी टेन्शन देऊ नये असा विचार तिने केला.

चार दिवसांनी त्याचा तिला फोन आला .तसा त्यांचा फोन रोजच होत होता .त्याला वडिलांच्या प्रकृतीस्तव तिथे काही दिवस राहावे लागणार होते .ती कॅनडाला निघून गेल्यावर तो येथे येणार होता. काय करावे या संभ्रमात ती पडली.त्याला सर्व काही कळवावे आणि कॅनडाला निघून जावे.कॅनडाला जाणे पुढे ढकलावे .कॅनडाला जाणे रद्द करावे.तिला काहीच कळत नव्हते.

तिची कॅनडाला जाण्याची तयारी सुरू होती.बॅगा भरणे चालू होते.आई बाबांना तिने सर्व कांही सांगितले होते.दोन चार महिन्यांनी इकडची सर्व आवारावर करून तुम्ही या असे ती त्यांच्या जवळ म्हणाली होती .तिने कॅनडामधील इंटरव्ह्यू दिला त्यावेळीच त्यांचे तसे ठरले होते .आता परिस्थिती बदलली होती . कॅनडाला जाणे रद्द कर .इथेच राहा .अभिजितसारखा चांगला मुलगा मिळणार नाही.मुलाला काय किंवा मुलीला काय जोडीदार पाहिजे .एकटे राहणे सुरुवातीला कदाचित  एखाद्याला चांगले वाटते परंतु म्हातारपणी असे लोक पस्तावतात.अशी उदाहरणे आम्हाला माहित आहेत .निदान त्या कॅनडातील कंपनीकडून आणखी दोन चार महिन्यांची मुदत मागून घे .अभिजीतला भेटल्याशिवाय सांगितल्याशिवाय जावू नको.तो तुला जाण्यापासून परावृत्त करील.असे त्यांनी तिला आवर्जून सांगितले .

तिने आई बाबांचे ऐकिले.   तिलाही तिचे अंतर्मन तेच सांगत होते. 

त्याचबरोबर एवढी चांगली संधी पुन्हा मिळणार नाही.आपल्याला मनासारखी करिअर घडवायची हीच संधी आहे.आपले बरेच दिवसांचे स्वप्न पुरे होत आहे .असाही विचार तिच्या मनात येत असे.

जायचा दिवस उजाडला.तिला काय वाटले कोण जाणे . तिने फोन करून आई वडील  आजारी आहेत. मी आत्ता येऊ शकत नाही. असे कारण सांगून आणखी मुदत मागितली .

तिच्या मनात एक कल्पना आली .तिने अभिजितची परीक्षा घ्यायचे ठरविले.कॅनडाला ती गेल्याचे तिने तिच्या मैत्रिणी मार्फत त्याला सांगितले .त्याला ते खरे वाटले नाही .त्याने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला .तिने तिचा फोन स्विच ऑफ ठेवला होता.त्याने ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली .तिथेही त्याला ती राजीनामा देऊन कॅनडात गेल्याचे सांगण्यात  आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती पार्कमध्ये गेली.तो पार्कमध्ये आला होता.तो विमनस्क स्थितीत होता .त्याचे कुठेही लक्ष नव्हते .तिच्या सर्व काही लक्षात आले होते .त्याला विमनस्क, हरवलेल्या स्थितीत,ती पाहू शकत नव्हती.एवढय़ात त्याला फोन आला.जॉगिंग ट्रॅकवर उभे राहून तो फोनवर बोलत होता.

*ती जॉगिंग ट्रॅकवरून दौडत त्याच्या  दिशेने गेली.*

*त्याला ओलांडून पुढे जाताना ती म्हणाली ,एका वेळी एकच काम, निदान व्यायाम तरी प्रामाणिकपणे करावा.*

*फोनवर बोलता बोलता त्याने दचकून वर पाहिले.योगिता त्याच्या दृष्टीस पडली .*

ती उभी राहून  त्याच्याकडे पहात हसत होती.त्याने फोन बंद करून खिशात ठेवला.* 

तो तिच्याकडे धावत गेला .त्याने तिला अलिंगन देण्यासाठी बाहू पसरले होते.*

*लोकांच्या टीकेची किंवा कसलीही पर्वा न करता ती त्याच्या छातीवर विसावली होती.*

(तुम्ही काहीही ठरवा.

विधात्याचा  अदृश्य हात भविष्य रेखाटन करीत असतो.)

(समाप्त)

२६/६/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel