सावधानपणें अश्वास प्रश्वास कसे करता येतात याचे विवरण या सूत्रात ज्या* चार चौकड्या आहेत त्यापैकी पहिल्या चौकडीत केले आहे.  त्यात दीर्घ अश्वास आणि दीर्घ प्रश्वास म्हणजे लांब अश्वास व लांब प्रश्वास, किंवा अधिक काळ टिकणारा आश्वास प्रश्वास; आणि र्‍हस्व अश्वास प्रश्वास म्हणजे कमी काळ टिकणारा आश्वास प्रश्वास.  अर्थात हे परस्पररावलंबी आहेत.  धावणार्‍या मनुष्याचे अश्वासप्रश्वास फार दीर्घ चालतात; पण तोच जर उभा राहिला, तर ते हळू हळू र्‍हस्व होत जातात.  दमून येऊन उभा राहिलेल्या माणसापेक्षा शांतपणे बसलेल्या माणसाचे अश्वासप्रश्वास र्‍हस्व असतात.  बहुधा ध्यानारंभी अभ्यासप्रश्वास दीर्घ असतात, आणि मग हळूहळू र्‍हस्व होत जातात.  म्हणून प्रथमतः दीर्घ आणि मग र्‍हस्व या विशेषणांचा उपयोग करण्यात आला आहे.  या आश्वासप्रश्वासांचे एकदा आकलन झाले, म्हणजे आपल्या सर्व देहाची स्मृती ठेवून अश्वासप्रश्वास करण्याचा अभ्यास करावा लागतो. तो जर साध्य झाला, तर सर्व शरीरावर एक प्रकारच्या आनंदलहरी उठू लागतात, व त्यायोगे शरीर कंपित होते आहे असे वाटू लागते.  पण असे सुखकारक कार्यसंस्कारही प्रशांत करून अश्वास प्रश्वास करावयाचा असतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  वरील विधानात सावधानपणे आश्वास घेणे व सावधानपणे प्रश्वास सोडणे येथपर्यंत आनापानस्मृतील आरंभ कसा करावा हे सांगण्यात आले आहे.  त्यानंतर या चार चौकड्या दिल्या आहेत. पहिल्या चौकडीत आनापानस्मृतीच्यायोगे शरीराचे आणि शरीरसंस्काराचे आकलन करण्याचा उपाय सांगितला आहे.  या चौकडीला 'दीर्घ अश्वास' येथपासून सुरुवात होते, व ती 'कार्यसंस्कार शांत करून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो' येथे पूरी होते. 'प्रीतीचा अनुभव घेऊन' या वाक्यातून दुसर्‍या चौकडीला आरंभ होतो, व ती 'चित्तसंस्कार शांत करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो' येथे पूरी होते.  या चौकडीत वेदनाचे आकल करण्याचा उपाय सांगितला आहे.  'चित्त जाणून' एथपासून तिसर्‍या चौकडीला आरंभ होतो व ती 'चित्ताला विमुक्त करून आश्वास-प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो,'  येथे पूरी होते.  इच्यांत चित्ताचे आकल करण्याचा उपाय सांगितला आहे.  'अनित्यता जाणून' एथपासून चवथी चौकडी आहे, आणि तिच्याच निर्वाणप्रापक पदार्थांचे आकलन करण्याचा उपाय सांगितला आहे.  काये कायानुपस्सना, वेदनासु वेदनानुपस्सना, चित्ते चित्तानुपस्सना, धम्मेसु धम्मानुपस्सना, ही जी सतिपट्टाने (स्मृत्युपर्स्थाने) सुत्तपिटकात वारंवार येतात, त्यांचाच खुलासा या चार चौकड्यांत आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.  चौकडीतील दुबे दाखविण्यासाठी अर्धविरामाची व जेथे ती पुरी होते तेथे पूर्णविरामाची योजना केली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
केवळ अरहं शब्दावर चित्त ठेवले असता श्वासोच्छवासांचे आकलन सुखाने झाले तर ठीकच आहे, नाहीतर विशुद्धिमार्गात सांगितलेल्या, गणना, अनुबंधना; स्पर्श आणि स्थापना, यांचाही प्रयोग करून पहावा.  गणना म्हणजे दीर्घ किंवा र्‍हस्व आश्वास प्रश्वास मोजणे ते दहापेक्षा जास्त किंवा पाचापेक्षा कमी मोजू नयेत.  दहापेक्षा जास्त मोजले, तर केवळ मोजण्यावरच चित्त जाते; पाचापेक्षा कमी मोजले, तर चित्त गडबडते.  म्हणून पाच आणि दहा यांच्या दरम्यान सोईवार आकडा घेऊन सावधानपणे गणना करीत राहावे.  गणनेने थोडेसे चित्ताला स्थैर्य आल्याबरोबर मोजणे सोडून देऊन केवळ श्वासोच्छवासांबरोबर चित्त आतबाहेर चालत राहील असे करावे.  यालाच अनुबंधना असे म्हणतात.  स्पर्श (पालि-फुसना) म्हणजे नासिकाग्रावर ज्या ठिकाणी आश्वास आणि प्रश्वास येऊन आदळतात त्याच ठिकाणी चित्त एकाग्र करणे.  नगरद्वारपाल असा नगरद्वारावर बसूनच जाणार्‍या-येणार्‍यांचा पत्ता टिपून घेतो, त्याप्रमाणे स्मृतियुक्त चित्ताने आश्वासप्रश्वासांचा नासिकाग्रावरच पत्ता लावला असता चित्ताची एकाग्रता सुलभ होते.  अशा रीतीने श्वासोच्छवासांवर चित्ताची एकाग्रता करणे याला स्थापना म्हणतात.

मुद्याची गोष्ट ही की, कोणत्याही प्रकारे चित्ताची एकाग्रता आश्वास-प्रश्वासांवर झाली पाहिजे.  आणि ही गोष्ट प्रयत्‍नांवाचून शक्य नाही.  पोहण्यावर व्याख्यान देऊन जसे पोहण्यास शिकविता येत नाही, त्याचप्रमाणे प्राणापानावर एकाग्रता करण्याचा सतत प्रयत्‍न केल्यावाचून आनापानस्मृति साध्य होत नाही.  पाण्यात तरंगावे कसे हे नीटपणे ऐकून घेतल्यावर स्वतः पाण्यात शिरून आपल्या अडचणी काय आहेत याचा अनुभव घेतला पाहिजे, आणि मोठ्या शिताफीने त्या दूर केल्या पाहिजेत.  त्याचप्रमाणे योगारंभ करणार्‍याने पूर्वाचार्याचे अनुभव समजून घेऊन, व आपल्या अडचणी काय आहेत, हे जाणून त्या मोठ्या कौशल्याने दूर केल्या पाहिजेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel