(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

तिचे आभार मानण्यासाठी दुसरी संधी आपल्याला कदाचित उपलब्ध होणार नाही .आताच जाऊन तिला भेटावे .तीच सुनंदा आहे ना याची खात्री करून घ्यावी.तिचे मन:पूर्वक आभार मानावे असा विचार करून तो तिच्या दिशेने निघाला.

गिरीश त्या मुलीपुढे जाऊन उभा राहिला .सुनंदा प्लॅटफॉर्मवरील गर्दीकडे पाहात होती .गिरीश पुढ्यात येऊन उभा राहताच तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने  पाहिले .या देखण्या तरुणाचे आपल्याकडे काय काय काम असावे ते तिच्या लक्षात येईना.आपल्या दिसण्यामुळे आपली छेड कुणीच काढणार नाही याची तिला खात्री होती.वेळोवेळी उपहासाचीच धनी ती झाली होती .

गिरीश तिला म्हणाला, मला माफ करा परंतु मी तुम्हाला ओळखतो असे मला वाटते.जर मी चुकत नसेन तर तुमचे नाव सुनंदा परांजपे आहे.

त्यावर सुनंदा हसून म्हणाली अगदी बरोबर माझे नाव सुनंदा परांजपे आहे.मला तुम्हाला कधी भेटल्याचे आठवत नाही.

गिरीश म्हणाला अगदी बरोबर जर मी तुम्हाला भेटलाच नाही तर तुम्हाला आठवेल कसे?

या त्याच्या बोलण्यावर सुनंदा गोंधळून गेलेली दिसली.  याला आपण कधी भेटलो नाही.तरीही हा आपल्याला नावासकट बरोबर ओळखतो. यांचे आपल्याकडे काय काम असावे बरे? असा भाव तिच्या चेहऱ्यावर आला.

गिरीश पुढे म्हणाला मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे .मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत .असेच इथे बोलत बसण्यापेक्षा आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन कॉफी घेऊया.तिथे मी तुम्हाला सर्व काही समजून सांगतो .

सुनंदाने त्याच्याकडे एकदा रोखून  पाहिले.तिची नजर तीक्ष्ण  होती.तिचे डोळे तेजस्वी होते .ही गोष्ट आतापर्यंत गिरीशच्या लक्षात आली नव्हती.आपल्या नजरेने ती जणू काही गिरीशचा एक्सरे काढीत होती.

तो प्रामाणिक आहे. त्याला खरेच आपल्याशी काही तरी बोलायचे आहे . कोणत्याही गैर उद्देशाने तो आपल्याला बोलवत नाही हे तिला समजले.त्याला आपल्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे असेही तिच्या लक्षात आले .

ती उभी राहिली आणि त्याला चला असे म्हणाली.दोघानाही  जिथे जायचे होते तो बेत त्यानी रद्द केला .स्टेशन बाहेरील एका  त्यातल्या त्यात बर्‍या रेस्टॉरन्टमध्ये दोघेही शिरली.कोपऱ्यातील एका टेबलवर दोघेही स्थानापन्न झाली .

तेवढ्यात वेटर  येऊन उभा राहिला. त्याने सुनंदाला काय घेणार म्हणून विचारले.त्यावर तिने नि:संकोचपणे काहीही तुम्ही मागाल ते असे उत्तर दिले.त्याने वेटरला ऑर्डर दिली आणि तो तिच्याशी बोलू लागला.

तुम्ही कदाचित माझ्या वागणुकीने गोंधळून गेला असाल.जास्त प्रस्तावना न करता मी मुद्द्यावर येतो .जवळजवळ सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे .एका मॉलला आग लागली होती .त्यामध्ये अनेक लोक सापडले होते .त्यात दोन तरुण मुली सापडल्या होत्या.तुम्ही सुखरूप बाहेर पडलेल्या  असतानाही त्यांच्या किंकाळ्या ऐकून तुम्ही बेधडकपणे आगीच्या कल्लोळात आत शिरला .व त्या दोन मुलींची सुखरुप सुटका केली.त्या मुली पूर्णपणे बचावल्या परंतु दुर्दैवाने तुमच्या   कपड्यांनी पेट घेतला .तुम्ही बेशुद्ध झाला . त्या दोन मुलींमधील एक मुलगी माझी बहीण होती.मी तिला मॉलमध्ये सोडून जवळच काही कामासाठी गेलो होतो .आग लागल्याचे कळताच मी धावत आलो .मला माझी बहीण सुखरूप मिळाली .तुम्ही मॉलच्या बाहेर बेशुद्ध पडला होता .तिने मला तुम्ही तिला वाचविल्याचे सांगितले .मी तुम्हाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेणार होतो .एवढ्यात एका अॅम्बुलन्समधून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले .मी व माझी बहीण सुखदा  अॅम्ब्युलन्स पाठोपाठ त्या हॉस्पिटलमध्ये आलो.तेवढ्यात तुमचे आई वडीलही तिथे आले होते .त्यानंतर मी घरी निघून आलो. 

दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणार होतो .परंतू काही अर्जंट कामामुळे मला दिल्लीला जावे लागले .चार दिवसांनी परत आल्यावर मी हॉस्पिटलमध्ये आलो .तुमच्या गंभीर अवस्थेमुळे तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते असे मला समजले .त्या हॉस्पिटलचे नाव मिळवण्याचा मी प्रयत्न केला. दुर्दैवाने मला त्या हॉस्पिटलचे नाव कळले नाही.तेव्हापासून तुम्ही कुठे तरी दिसाल आणि मी तुम्हाला भेटेन म्हणून मी वाट पहात होतो.सुदैवाने आज तुम्ही रेल्वे स्टेशनवर भेटला .

तुमच्या धाडसाबद्दल, तुमच्या स्वतःच्या जिवाची पर्वा न करता संकटांमध्ये झोकून देण्याच्या प्रवृतीबद्दल,मला वाटणारे कौतुक, मला तुमच्याबद्दल वाटणारा आदर,तुम्हाला भेटून सांगावा असे उत्कटतेने सतत वाटत होते .त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या बहिणीला वाचवले याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार मानायचे होते.

एवढे बोलून गिरीश बोलायचा थांबला.

त्याच्या बोलण्यातील तळमळ,त्याच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा, तिच्या हृदयाला जावून भिडला. त्याच्या बोलण्यावर ती पुढे काही बोलणार एवढ्यात त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली .तुम्ही माझ्या घरी एकदा यावे असे आम्हाला वाटते .आम्ही म्हणजे मी माझी बहीण व आई वडील . बहिणीला व आई वडिलांना तुम्हाला भेटायचे आहे.तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत .तुमच्या कुटुंबीयांशीही ओळख करून  घ्यायची आहे .तुम्हाला जर आता वेळ असेल  तर आपण असेच आमच्या घरी जाउया .किंवा तुम्ही  तुमचा पत्ता द्या मी माझ्या कुटुंबीयांसह तुमच्या घरी येईन.तुमच्या सारख्या सुसंस्कृत धाडसी कुटुंबीयांशी स्नेह म्हणजे  आम्हाला आमचा मान वाढल्यासारखा वाटेल.

या त्याच्या बोलण्यावर ती सुरेखपैकी लाजली.ती लाजल्यावर सुरेख दिसते असेही त्याच्या लक्षात आले.तिच्या अशा कुरूप दिसण्यामुळे तिला इतका मान, इतके प्रेम, इतका आदर कुणीही दाखविला नव्हता.माणसाची किंमत त्याच्या दिसण्यावर व्हावी याबद्दल त्याला खेद झाला .दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे हे लोकांच्या कधी लक्षात येणार असाही विचार त्याच्या मनात आला.

तिने तिच्या घराचा पत्ता त्याला दिला .त्या दिवशी तो तिला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला. तिने त्याला आग्रहपूर्वक आपल्या घरी बोलाविले .तिच्या आई वडिलांशीही त्याची ओळख झाली.

दोन्ही  कुटुंबांचे परस्परांकडे येणे जाणे सुरू झाले.गिरीश आवर्जून सुनंदाबरोबर मैत्री वाढवत होता.तिच्या बरोबर फिरायला सिनेमाला जात होता. दोघेही बरोबर असतात त्यांना पाहणारे नाक मुरडत असत.

हिच्यात याने काय पाहिले ?  

प्रेम आंधळे असते असे ऐकून होतो परंतु आता प्रत्यक्ष खात्री पटली .

ही शूर्पणखा हिडिंबा कोण ?

हा इतका उमदा देखणा आणि ही अशी.

असे शेरे त्याना बरोबर फिरताना ऐकायला मिळत असत.सुनंदाला हा आपल्याबरोबर केवळ कृतज्ञ भावनेने फिरतो कि आणखी काही त्यांच्या मनात आहे असा संभ्रम पडे.

गिरीश श्रीमंत होता. देखणा होता .उमदा होता.कोणत्याच दृष्टिकोनातून तो तिला अनुरूप नव्हता.सुनंदा त्याच्यावर प्रेम करायला लागली होती .तो तिला मनापासून आवडत होता .त्याच्या मनाचा थांग मात्र तिला अजूनही लागत नव्हता.  आपण ही अशी, तर हा असा, गिरीशचे आई वडील हे मान्य करणार नाहीत.यातून केवळ दुःख निर्माण होईल.आपण मनात इमले रचू आणि ते शेवटी कोसळतील.हा संबंध, हे बरोबर फिरणे, आपल्याला जरी कितीही आवडत असले  तरीही शेवटी ते दुःखाला कारणीभूत होईल .आपण अगोदरच बरेच गुंतलो आहोत .जास्त गुंतण्याअगोदर याला पूर्णविराम दिलेला चांगला.अशा मतावर, निष्कर्षावर सुनंदा आली.

तिने मन घट्ट करून त्याला फोन केला. त्याने फोन उचलताच ती म्हणाली यापुढे आपण न भेटलेले बरे .यातून केवळ दुःख निर्माण होईल .गिरीशला तिच्या भावना तिच्या आवाजातूनच कळल्या.

गिरीशने सुनंदाला त्यांच्या नेहमीच्या जागेवर शेवटचे भेटायला  बोलाविले. ती येताच त्याने तिला सरळ मागणी घातली.सुनंदाने विरोध दर्शविला .तू हा असा मदनाचा पुतळा आणि मी ही अशी कुरूप . तुझे आई वडील हे नाते मान्य करणार नाहीत .आत्ताच समाज आपल्याला हसत आहे .याने हिच्यात काय पाहिले म्हणून हिणवत आहे.तेव्हा आपण आत्ताच दूर झालेले चांगले .

त्यावर गिरीश म्हणाला तू कुरूप आहेस असे कोण म्हणतो?तू तर जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस.केवळ बाह्य सौंदर्य पहायचे नसते.सुंदर दिसणाऱ्या व्यक्ती कित्येकदा अंतर्यामी कुरूप असतात.बाह्य सौंदर्यापेक्षा मी अांतर सौंदर्याला महत्त्व देतो . तू अंतर्यामी कित्येक स्त्रियांपेक्षा जास्त सुंदर आहेस.बाह्य सौंदर्यालाही काही महत्त्व आहे हे मी नाकारत नाही .मला जरी तू आहेस अशीच आवडत असलीस तरीही प्लास्टिक सर्जरी करून आपण तुला तुझे पूर्वीचे रूप आणू.म्हणजे तुला वैषम्य  वाटणार नाही. आपल्याला एकमेकांबरोबर पाहून लोकांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव तुला त्रासदायक वाटतात.तुझा उतरलेला चेहरा मला काळजीत टाकतो.

प्लॅस्टिक सर्जरीनंतर मला,  लोकांनी दूषणे ठेवल्यामुळे  पडलेला तुझा चेहरा पाहावा लागणार नाही 

*तुझ्या डोळ्यात मला  माझ्या विषयीचे तुझे प्रेम स्पष्ट दिसत आहे .*

*तुझे डोळे बोलके आहेत .तुझा चेहराही बोलका आहे .*  

*मला तू आहेस तशीच सुंदर दिसतेस .*

* यावर सुनंदाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला . परंतु गिरीशने तिला आपल्या कवेत घेऊन तिचे बोलणे बंद केले.*   

(समाप्त) 

१९/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel