आत्म्याच्या कल्पना

या आचार्यांच्या आणि तत्समकालीन इतर श्रमणांच्या आत्म्याविषयीं किती विलक्षण कल्पना होत्या यांचा थोडासा मासला उपनिषदांत सापडतो. उदाहरणार्थ, आत्मा तांदळापेक्षा आणि जवापेक्षाही बारीक आहे, आणि तो ह्यदयामध्ये रहातो, ही कल्पना घ्या.

एष म आत्मार्न्तह्यदयेऽणीयान्व्रीहेर्वा यवाद्वा सर्षपाद्वा श्यामाकाव्दा श्यामाकतण्डुलव्दा | ( छान्दोग्य ३ | १४ | ३ )  'हा माझा आत्मा अंर्तह्यदयांत (राहतो). तो भातापेक्षा, जवापेक्षा, मोहरीपेक्षा, श्यामाक नांवाच्या देवभातापेक्षा किंवा त्याच्या तांदळापेक्षाही लहान आहे.'

आणि तो त्यांच्या एवढाही आहे!

मनोमयोऽयं पुरूषो भा: सत्यस्तस्मिन्नर्न्तह्यदये यथा व्रीहिर्वा यवो वा .... (बृहदारण्यक ५। ६। १)

'हा पुरूषरूपी आत्मा मनोमय भास्वान् आणि सत्यरूपी असून त्या अंतहृदयामध्ये जसा भाताचा किंवा जवाचा दाणा (तसा असतो).'

त्यानंतर तो आंगठ्याएवढा आहे अशी कल्पना प्रचलित झाली.

अङ्गुष्ठमात्र: पुरूषो मध्य आत्मनि तिष्ठति। ( कठ २।४।१२)
'अंगठयाएवढा तो पुरूष आत्म्याच्या मध्यभागीं राहतो.'

आणि मनुष्य झोपला असतां तो त्याच्या शरीरांतून बाहेर हिंडावयास जातो.

स यथा शकुनि: सूत्रेण प्रबध्दो दिशं दिशं पतित्वान्यत्रा
यतनमलब्ध्वा बन्धनमेवोपश्रयत एवमेव खलु सोम्य तन्मानो दिशं दिशं पतित्वान्यत्रायतनमलब्ध्वा प्राणमेवोपश्रयते
प्राणबन्धनं हि सोम्य मन इति॥ (छान्दोग्य ६।८।२)

'तो (आत्मा ) जसा दोरीने बांधलेला पक्षी, चारी दिशांला उडतो अणि तेथे राहूं न शकल्यामुळे बंधनांतच येतो, त्याचप्रमाणे हे सोम्य, मनाच्या योगें आत्मा चारी दिशांना उडतो, आणि तेथे हे स्थान न मिळाल्यामुळे प्राणाचा आश्रय धरतो; कारण प्राण हे मनाचे बंधन आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel