तें ऐकून प्रभावती फार खिन्न झाली. पण पित्यानें तिचें शांत्वन केलें; आणि तिला बरोबर घेऊन तो पार्श्वनाथासह वाराणसीला आला. तेथें अश्वसेनानें त्याचें योग्य स्वागत केलें. प्रसेनजितानें त्याला प्रभावतीचा वृत्तान्त सांगितला; आणि अश्वसेनाच्या आग्रहास्तव पार्श्वनाथानें तिचें पाणिग्रहण केलें.
त्या कालीं कठ नांवाचा एक तापस वाराणसीबाहेर पंचाग्निसाधनादिक तप करीत होता. सगळे नागरिक त्याला पाहण्यासाठीं जात. पार्श्वहि तिकडे गेला. त्याला त्या तापसाच्या धुनींत जळणार्या एका लांकडांत एक मोठा सर्प दिसला, आणि तो म्हणाला, "काय हें अज्ञान! हा तपस्वी असून याला दया नाही! आणि दयेवांचून धर्म कसला? " कठ म्हणाला, " राजपुत्र हत्ती घोडे इत्यादिकच जाणतात; पण आम्हीं मनी धर्म जाणतों."
त्यावर पार्श्वानें आपल्या नोकरांकडून तें जळणारें लांकूड बाहेर काढवून फोडविलें. त्यांतून जरासा जळलेला धरण नांवाचा नाग निघाला. पार्श्वानें लोकांना त्याला नमस्कार करावयास लावलें. लोकांनी पार्श्वाच्या अंतर्ज्ञानाची स्तुति केली. ती ऐकून कठानें आणखीहि खडतर तप आरंभिलें. आणि मरून तो मेघमाली नांवाचा असुर झाला.
इकडे पार्श्व भगवान् आपलें कर्मफल भोगून संपलें असें जाणून प्रव्रज्या घेण्यास सिद्ध झाला, आणि विशाल नांवाच्या शिबिकेंत बसून अरण्यांतील आश्रमांत गेला. तेथें त्यानें आपल्या वस्त्रालंकारांचा त्याग केला. इन्द्रानें त्याला वस्त्रें पुरविलीं. त्याच्याबरोबर ३०० राजांनी प्रव्रज्या घेतली.
एकदा पार्श्वनाथ प्रवास करीत एका तापसाश्रमाला आला, आणि तेथें एका विहिरीजवळ वटवृक्षाखालीं राहिला. तेव्हां पूर्वजन्मीचें वैर स्मरून मेघमाली असुरानें पुष्कळ भयंकर शार्दूल उत्पन्न करून त्याजवर सोडले. परंतु पार्श्वनाथाची समाधि ढळली नाही; आणि ते शार्दूल कोठल्याकोठें निघून गेले! त्यानंतर मेघमालीनें अनुक्रमें पर्वताएवढे हत्ती, आपल्या नांग्यांनी पाषाण फोडणारे विंचू, निर्दय अस्वलें, दृष्टि विष सर्प आणि भयंकर वेताळ उत्पन्न करून पार्श्वावर सोडले; पण ते सर्व तेथल्या तेथेंच नष्ट झाले. तेव्हां मेघमालीनें कल्पान्त मेघासारखा पाऊस पाडला. त्यामुळें पूर आला, व पार्श्वनाथाच्या नाकापर्यंत पाणी पोंचलें. त्या वेळीं धरण नागराजाचें आसन कंपित झालें, आणि त्यानें जाणलें कीं, पूर्वजन्मींचा कठ या जन्मीं मेघमाली होऊन पार्श्वनाथाला उपद्रव करीत आहे. तो आपल्या राण्यांसह पार्श्वाजवळ आला, आणि त्यानें आपल्या शरीरानें पार्श्वनाथाला वेढून सात फणांनी त्यावर छत्र धारण केलें, आणि त्याच्या राण्यांनी पार्श्वनाथासमोर सुंदर नृत्य आरंभिलें. पार्श्वनाथ जसा मेघमालीच्या कृत्यांनीं तसाच त्या नृत्यानें देखील विचलित झाला नाहीं.
मेघमाली सारखा पाऊस पाडीतच होता. तें पाहून धरण नागराजा क्रुद्ध झाला, आणि म्हणाला, " अरे, हें तूं काय करतोस? त्या प्रसंगीं लांकडाच्या आंत असलेला सर्प जळतो आहे असें जाणून जर प्रभूनें तुला पापापासून निवृत्त करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांत तुझें अहित काय केलें? प्रभूचा सदुपदेशहि तुझ्या वैराला कारण झाला!" तें वचन ऐकून मेघमाली भयभीत झाला, व पार्श्वनाथाला शरण गेला.
पार्श्वनाथ तेथून वाराणसीला आला व उद्यानांत एका घातकी वृक्षाखालीं राहिला. तेथें, ज्या दिवशीं त्याच्या दीक्षेला ८४ दिवस पुरे झाले, त्या दिवशीं म्हणजे चैत्र कृष्ण चतुर्दशीला सकाळीं त्याच्या घाति कर्माचा नाश झाला व त्याला केवल ज्ञान प्राप्त झालें.
त्या प्रसंगीं देव-देवी, नर-नारी आणि साधु-साध्वी त्याला नमस्कार करून यथोचित स्थानीं राहिले. तें वैभव उद्यानपालानें पाहिलें आणि राजवाड्यांत जाऊन तें अश्वसेनाला नमस्कारपूर्वक निवेदित केलें. अश्वसेन वामादेवीसह सहपरिवार पार्श्वनाथापाशीं आला आणि त्याला नमस्कार व प्रदक्षिणा करून इन्द्राजवळ बसला. इन्द्रानें व अश्वसेनानें पार्श्वनाथाचें स्तवन केलें.