(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
अपेक्षा गाढ झोपेत होती. अकस्मात तिला जाग आली. आपल्या जाग कां आली तेच तिच्या लक्षात येत नव्हते. तिच्या मोबाइलची रिंग वाजत होती.त्यामुळेच ती जागी झाली होती .हॉस्पिटलमधून ती उशिरा अकरा वाजता घरी आली होती .काल रात्री गुंतागुंतीचे ऑपरेशन तिने केले होते.त्यामुळे तिला यायला उशीर झाला होता .ती गाढ झोपी गेली होती .
तिने फोन उचलला .रात्रपाळीची नर्स बोलत होती.रात्री ऑपरेशन केलेला पेशंट अस्वस्थ वाटत होता म्हणून तिने फोन केला होता .नर्सने सांगितलेली पेशंटची स्थिती ऐकून ती लगेच हॉस्पिटलला जायला निघाली. रात्री ऑपरेशन झालेल्या पेशंटचे नातेवाईक गंभीर चेहऱ्याने उभे होते.त्यांना अाश्वस्त करून ती आयसीयूमध्ये शिरली. पेशंट धोक्यातून बाहेर येईपर्यंत जवळजवळ एक तास गेला.आयसीयू मधून ती बाहेर आली आणि आपल्या केबिनकडे निघाली .पेशंटच्या नातेवाईकाना आता काळजीचे काही कारण नाही ती धोक्यातून बाहेर आली आहे असे तिने सांगितले .
केबिनकडे जाताना तिची नजर डाव्या बाजूच्या खोलीकडे गेली.त्या खोलीत प्रदीप होता.प्रदीपच्या सोबतीसाठी त्याची बहीण माधुरी आली होती .आठ दिवसांपूर्वी प्रदीपचे ऑपरेशन झाले होते .त्याला हॉस्पिटलमध्ये आणले त्यावेळी त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर होती . त्याला मोटरसायकलचा अपघात झाला होता .त्याच्या पोटात काहीतरी तीक्ष्ण वस्तू घुसल्यामुळे त्याचे पोट फाटले होते.आपल्या एकुलत्या एक मुलाचे ऑपरेशन करणारी नामांकित डॉक्टर अपेक्षा आहे हे पाहून त्याच्या आई वडिलांना धक्काच बसला होता .त्याचे ऑपरेशन करताना अपेक्षाला फार ताण आला होता.हे ऑपरेशन आपण करू नये आणखी कुणाला तरी बोलवावे असे तिला वाटत होते .ऑपरेशन करताना प्रेमापोटी आपला हात जरा थरथरला तर त्याचे गंभीर परिणाम प्रदीपला जन्मभर भोगावे लागतील .त्यावेळी शहरात दुसरा अॅब्डॉमिनल सर्जरीमध्ये कुशल असणारा डॉक्टर उपलब्ध नव्हता.तिला हे ऑपरेशन करणे भाग होते .एकदा ऑपरेशन सुरू झाल्यावर ती नेहमीप्रमाणे स्वतःलाही विसरली होती.ऑपरेशन व्यवस्थित झाले होते .
तिला पाहून त्याचे आई वडील व बहीण सुद्धा चमकले होते.तिने कुशलतेने ऑपरेशन करून त्याच्या पोटातील निरनिराळे अवयव जाग्यावर व्यवस्थित आणले.त्याला चार दिवस आयसीयूमध्ये ठेवावे लागले होते . नंतर त्याला स्पेशल रूममध्ये हलवले होते. कदाचित आणखी सातआठ दिवसात त्याला डिसचार्ज मिळाला असता.
अपेक्षा आपल्या केबिनमध्ये येऊन बसली .तिच्या केबिनमध्ये पार्टिशन करून मागच्या बाजूला एक कॉट टाकली होती.काही वेळा अपेक्षाला घरी जाता येत नसे .त्या वेळी ती इथेच आराम करीत असे . तिने कॉटवर झोपी जाण्याचा प्रयत्न केला .तिला झोप लागणे शक्य नव्हते . जुन्या आठवणी तिच्या डोक्यात पिंगा घालत होत्या .
प्रदीप बी कॉम होऊन पुढे सीए झाला होता.तो एका मोठ्या फर्ममध्ये काम करीत होता. तर अपेक्षा एमबीबीएस होऊन नंतर तिने अॅब्डॉमिनल सर्जरीत प्राविण्य मिळविले होते . ती एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. दोघांचे शिक्षण, व्यवसाय, संपूर्ण भिन्न होते .एका शहरात असूनही आतापर्यंत त्यांची कुठेही भेट झाली नव्हती .दैवाने कुणाची गाठ कुणाशी घालायचे ठरवले असेल ते काही सांगता येत नाही.
चेन्नईला एक मेडिकल कॉन्फरन्स होती .त्यासाठी अपेक्षा चेन्नईला जात होती . चार्टर्ड अकाऊंटंटसची कॉन्फरन्स चेन्नईला त्याचवेळी होती .प्रदीपही त्यासाठी चेन्नईला जात होता .दोघांची फ्लाइट एकच होती .विमानात दोघांच्या सीट शेजारी शेजारी आल्या होत्या.तिथे त्यांची सहज ओळख झाली. बोलता बोलता दोघांनाही चेन्नई केव्हा आले ते कळले नाही.कोण कुठे उतरणार त्याची चौकशी करताना त्यांना एकाच हॉटेलमध्ये जायचे आहे असे लक्षात आले .त्यांना विमानतळाकडून हॉटेलमध्ये आणण्यासाठी हॉटेलतर्फे सोय करण्यात आली होती .दोघेही बरोबरच हॉटेलवर आले .दोघांच्या खोल्याही एकाच मजल्यावर होत्या. त्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तीन कॉन्फरन्स रूम होत्या . प्रदीप व अपेक्षा यांच्या कॉन्फरन्स त्याच हॉटेलात होत्या .स्वाभाविक हॉटेलात त्यांची ओळख जास्त गडद झाली .प्रदीप अविवाहित होता. अपेक्षाही अविवाहित होती .स्वभाव जुळले. नियतीने त्यांची गाठ घालून दिली होती .भेटीगाठी सुरू झाल्या .दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले .घरच्यांची परवानगी असली तरच विवाह करायचा असेही दोघांनी ठरविले होते .घरच्यांचा विरोध असताना केलेला विवाह अंतीम सुखावह होणार नाही असे दोघांनाही वाटत होते . प्रदीप एकुलता एक मुलगा होता.आई वडिलांची जबाबदारी त्यांच्यावर होती . त्यांची संमती असेल त्याच मुलीशी तो विवाह करणार होता.
अपेक्षा प्रदीपच्या आई वडिलांना सून म्हणून पसंत होती .अपेक्षामध्ये त्यांना काही दोष आढळला नव्हता .केवळ जात हीच अडचण होती .प्रदीपच्या वडिलांची मते थोडी वेगळी होती .जातीवर भर असण्याची त्यांची कारणे थोडी वेगळी होती .जातीप्रमाणे संस्कार खाण्या पिण्याच्या सवयी भिन्न असतात.प्रेमामुळे सुरुवातीला जरी अडचण आली नाही तरी हळूहळू संस्कार भिन्नता एकमेकांना टोचू लागते .प्रत्येक जण दुसऱ्याला आपल्यासारखे करण्याचा प्रयत्न करीत असतो.त्यामुळे कलह सुरू होतो . बऱ्याच वेळा त्याची परिणिती घटस्फोटामध्ये होते .अशा लग्नामुळे कुणालाच सुख मिळत नाही .ना पतीला ना पत्नीला ना माहेरच्याना ना सासरच्याना.या कारणांसाठी अशी लग्ने टाळावीत अशा मताचे ते होते. एकत्र कुटुंबात तर सर्वांनाच त्याचा त्रास होतो .
अपेक्षाच्या आईचा तिने प्रदीप बरोबर लग्न करण्यास विशेष विरोध नव्हता .
शेवटी दोघांनीही दूर होण्याचे ठरविले .या गोष्टीला केवळ सहा महिने झाले होते .आणि नंतर हा अपघात झाला .अपेक्षाचे अॅब्डॉमिनल सर्जरीमध्ये प्राविण्य असल्यामुळे प्रदीपला तिच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते .त्याचे ऑपरेशन करताना तिला ताण आला होता.सुदैवाने सर्व काही व्यवस्थित झाले होते.प्रदीपच्या आईवडिलांना कोणत्या शब्दात अपेक्षाचे आभार मानावे तेच कळत नव्हते.रोज आईवडील त्याला भेटण्यासाठी येत होते .बहीण रात्री सोबतीला येत होती.
प्रदीप शुद्धीवर आला त्यावेळी अपेक्षा तिथे होती.अपेक्षाला पाहून त्याच्या चेहऱ्यावरील भाव जास्त गडद झाले होते.अपेक्षा एकटी असताना त्याने तिचे मनःपूर्वक आभार मानले होते.त्याच्या डोळ्यातील प्रेम भावना तिच्या अंत:करणाला जाऊन भिडली होती. प्रदीपने लग्न केले नाही हे तिला,त्याचे नातेवाईक व मित्र याशिवाय कुणी भेटायला येत नाही यावरून लक्षात आले होते . सहज बोलता बोलता तिने त्याच्या बहिणीकडून ती माहिती खुबीने काढून घेतली होती. दोघांनाही या अपघातातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल असे वाटत होते .चेन्नईला जाताना योगायोगाने त्यांची झालेली भेट,आणि आताही योगायोगाने तिच्याच हॉस्पिटलमध्ये त्याचे तिच्याकडून ऑपरेशन होणे,या योगायोगाची तिला गंमत वाटत होती . हे योगायोग पुन्हा पुन्हा दोघांच्या भेटीसाठी नियती घडवून आणीत आहे असे तिच्या मनात आले .यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल असेही तिला वाटत होते. विचारांच्या आवर्तात किती वेळ गेला ते तिला कळले नाही.सकाळ झाली होती. हॉस्पिटलमधील सकाळचे रुटीन सुरू झाले होते.
अपेक्षाच्या गळ्यात मंगळसूत्र नाही यावरून तिने लग्न केले नाही हे त्याला समजले होते.तरीही त्याने सहज सिस्टरजवळ बोलता बोलता चौकशी करून खात्री करून घेतली होती . त्यांचे बोलणे त्याच्या बहिणीने ऐकले होते .बहिणीने प्रदीपला तिने लग्न केले नाही हे मिश्किलपणे हसत हसत सांगितलेसुध्दा होते. प्रदीप व अपेक्षा यांच्याबद्दल तिला पूर्ण माहिती होती .तिला दोघांचे लग्न व्हावे असे मनापासून वाटत होते.आई वडिलांच्या जुन्या विचारांपुढे तिचा नाईलाज होता. त्यावेळी तिने आई वडिलांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता.तिचे सांगणे आईला थोडेबहुत पटले होते परंतु वडील त्यांच्या विचारावर ठाम होते.
त्याला तपासताना तिला रोज तिच्या हृदयाची धडधड जाणवत होती तर तिलाही त्याच्या डोळ्यातील भाव लक्षात येत होते.
एक दिवस ती आपल्या केबिनमध्ये बसलेली असताना दरवाजावर टकटक आवाज आला .तिने सवयीने कम इन म्हणून सांगितले.बघते तो प्रदीपची आई दरवाज्यात उभी होती. प्रतिक्षिप्त क्रियेने ती चटकन खुर्चीतून उठून उभी राहिली .या आई म्हणून तिने प्रदीपच्या आईला आंत बोलाविले .या आई असे शब्द तिच्या तोंडून पटकन निघून गेले होते.आईने तिचे आभार मानले . बोलता बोलता तिने प्रदीपच्या बाबांना तुझ्याजवळ काहीतरी बोलायचे आहे असे सांगितले.
त्यावर तिने बाबांना नि:संकोचपणे मला भेटायला या असा आईजवळ निरोप दिला.
दुसऱ्या दिवशी प्रदीपचे आईवडील अपेक्षाच्या आई वडिलांना भेटायला अपेक्षा घरी असताना तिच्या घरी गेले.त्यांनी मोकळेपणाने तिच्या आई वडिलांची क्षमा मागितली.संस्कार, विचार,आहार, विहार, सवयी, या सर्वांमध्ये जाती जातीमध्येअसलेली भिन्नता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या याबद्दलचे त्यांचे आवडते विचार त्यांनी पुन्हा सांगितले .नंतर पुढे ते म्हणाले प्रत्येक नियमाला अपवाद हे असतातच.तुमची मुलगी नियमाला अपवाद आहे .दुधामध्ये साखर सहज विरघळून जावी त्याप्रमाणे ती आमच्या कुटुंबात सहज मिसळून जाईल.
*तिच्यामुळे आमचा मुलगा आम्हाला परत मिळाला .तो आता तिचाच झाला आहे.*
*आम्ही तुमच्या मुलीला आमच्या मुलासाठी मागणी घालायला आलो आहोत.*
*हे बोलणे होत असताना प्रदीपची बहीण घरी होती .*
*केव्हा एकदा ही बातमी प्रदीपला सांगत्ये असे तिला झाले होते*
१३/४/२०२०©प्रभाकर पटवर्धन