डॉ.वसंतराव देशपांडे (मे २, १९२० ; मूर्तिजापूर - जुलै ३०, १९८३ ; पुणे) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.
सुप्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मुर्तझापूर येथे झाला. वसंतराव देशपांडे म्हटले की अनेक नाट्यगीते , ठुमरी आणि शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार आठवतात. याबरोबर आठवते ते त्यांचे ‘ कट्यार काळजात घुसली ‘ हे नाटक आणि त्यांनी केलेली खासाहेबांची अविस्मरणिय भूमिका.
वसंतराव देशपांड्यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
मूर्तिजापूर अकोला येथे वसंतराव ह्यांचा जन्म एका देशस्थ ब्राह्मण परिवारांत झाला. ८ वर्षांचे असतानाच भालजी पेंढारकर ह्यांनी वसंतरावांची प्रतिभा ओळखून त्यांना कालिया मार्डन ह्या चित्रपटांत रोल दिला. संगीताचे शिक्षण त्यांनी आधी सप्रे गुरुजी कडे घेतले, नंतर किराणा घराण्याचे सुरेशभाऊ माने आणि त्यापुढे पतियाळा घराण्याचे असद अली खान, अमान अली खान इत्यादींकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले. मंगेशकर घराण्याचे थोर दीनानाथ मंगेशकर ह्यांचा तरुण वसंतराव ह्यांच्यावर बराच प्रभाव पडला.
वसंतराव अठरा वर्षाचे असताना असद अली खासाहेबाचा गंडा बांधायला गेले असताना ते रस्तात एका विहिरीजवळ बसले असताना ते गाऊ लागले तो राग मारवा होता , तेव्हा खांसाहेब तिथे आले त्यांनी ते आइकले , त्यांनी त्यांच्या तो राग शिष्याकडून गाऊन घेतला आणि शेवटी वसंतरावांना गायला सांगितले . त्यांनी तो उत्तमपणे गायला. तेव्हा असद अली खासाहेबांनी त्याना सांगितले तू मारवाच राग शिक कारण ‘ मारवा ‘ या एका रागात अनेक राग येतात हा मंत्र दिला.
वसंतराव हे अत्यंत हरहुन्नरी कलाकार होते आणि विविध प्रकारच्या शास्त्रीय तसेच नाट्यगीतांवर त्यांनी आपली अशी सुरेख छाप पाडली. कट्यार काळजांत घुसली हे नाटक तुफान लोकप्रिय झाले ते वसंतराव ह्यांच्या खांसाहेब ह्या भूमिकेनेच. ह्या नाटकावर आता चित्रपट सुद्धा येऊन गेला आहे.
अशा या भारतीय शास्त्रीय संगीताची उपासना करणाऱ्या गायकाचे ३० जुलै १९८३ रोजी पुण्यात निधन झाले. आज त्यांचे नातू राहुल देशपांडे त्यांची गायनाची परंपरा चालवत आहेत.