रसपरिचय

स्त्रियांच्या ज्या ओव्या मी संग्रहित केल्या त्यांतून काही सुभाषितरूप ओव्या अलग करून त्या या प्रकरणात देत आहे. इतर प्रकरणांतूनही मधून मधून सुभाषितरूप संबध्द ओव्या किंवा सुभाषितरूप चरण नाहीत असे नाही; परंतु काही पृथक् निवडून हे प्रकरण केले आहे.

या सुभाषितांत काही काही फारच बहारीची सुभाषिते आहेत. त्यांतून मी कोणती निवडून देऊ हे समजत नाही. परंतु काहींची चव देतो. मनुष्य पुष्कळवेळा चांगली वस्तू जवळ असूनही तिचा त्याग करितो, प्रकाश जवळ असून अंधारात खितपत पडतो. चांगला रस्ता समोर असूनही मुद्दाम चिखलातून जाऊ बघतो :

रामाच्या नांवाचा         पापी कंटाळा करीती
निवळ टाकून                 पाणी गढूळ भरीती

निर्मळ पाणी जवळ असूनही गढूळ पाणीच काही पसंत करतात. असे अनुभव जीवनात येतात.
स्त्रियांचे संसारासंबंधी काय मत ? संसार सोडून देणे जरूर आहे का ? मुमुक्षूने का संसार सोडावा ? संसारात राहून मुक्त होईल तो खरा. मनुष्याची परीक्षा संसारातच राहून घ्यायला हवी :

शिकती तराया             पाण्यात पडून
संसारी वावरून                 मुक्त व्हावें

तुम्हाला एक सुंदर सुभाषित देऊ ? हे घ्या :

वाण्याच्या दुकानी         भाव नाहीं कापराला
मूर्खाशीं बोलतां                 शीण येई चतुराला

वाण्याच्या दुकानात वस्तू पडलेल्या असतात. कोणी गिर्‍हाईक येईल तर ती द्यायची. त्याला त्या वस्तूचे मोठेसे प्रेम नसते. त्याला जर आपण म्हणू तुमच्या दुकानात केशर आहे, कस्तुरी आहे, कापूर आहे, तर तो म्हणेल, आहेत डबे भरलेले. त्या वस्तूमुळे त्याचे हृदय थोडेच उचंबळून येते ? त्याप्रमाणे मूर्खाला कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी त्याचे हृदय फुलत नाही. सुंदर ओवी.

जगात सारे नाशिवंत आहे. शरीर जाणारे आहे. या जाणार्‍या शरीराला फार कुरवाळू नका. आत्म्याकडे पहा. मानवधर्माच्या सेवेत देह झिजवा. मेलो तर आपल्याबरोबर कोण येईल ? जगात मागेही काय राहील ? ज्या चांगल्या गोष्टी आपण केल्या त्याच आपणाला आधार :

कुणी नाही रे कुणाचा         पुत्र नव्हे ग पोटीचा
येईल कामाचा                 धर्म पांचा ग बोटींचा
कुणी नाहीं रे कुणाचा         आत्मा नव्हे रे कुडीचा
आहे संसार घडीचा             नाशिवंत

या ओव्यांतील प्रास-अनुप्रास आणि प्रसन्न रचना किती गोड आहेत !

धर्माचे सार काय ? ज्या आईबापांनी वाढविले त्यांची सेवा, कृतज्ञता म्हणजेच धर्म :

वृध्द मायबाप             सेवावे पूजावे
हेच समजावें                 धर्मसार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel