रूप ना लावण्य सोडींना कधीं मांडी
करितो नासाडी जीवनाची ५०१
रात्र ना दिवस चंदन वेलीला
विळखा देऊन राहिला नाग जेवीं ५०२
कधीं उजळे पुनव कधीं काळी ग अवस
मैत्रीणी काय सांगू मिळे सुधा मिळे वीख ५०३
कधीं फुले ग वसंत तुझी सखी तेव्हा खुले
कधीं वैशाख वणवा हरिणी तुझी होरपळे ५०४
मैत्रीणी काय सांगू गोड मी करूनी घेत्ये
दिवस रोज नेत्यें मोजूनीयां ५०५
काय विचारीशी होते का धूसपूस
मैत्रीणी येते घूस घरा कधीं ५०६
आधणाचे पाणी त्यांत भात शिजवीते
रुसवे फुगवे त्यांत सुख पिकवीते ५०७
आधणाचे पाणी ओतीते विसावण
पतीच्या रागांत मिसळते प्रेमगुण ५०८
दूध वर येतां पाणीयानें खाली जाई
कंथाचा ग राग सखी हंसण्याने नष्ट होई ५०९
कंथा रागावता सखी हळूंच हंसून बघत्यें
क्रोधी मुद्रा मोहावते क्षणामाजीं ५१०
शत ग जनमांची पुण्याई आली फळा
माझ्या कुंकवाची कळा सूर्या सारी ५११
लाखांत एखादा तसा सखा माझा पती
अनुरक्त परी व्रती भाग्य माझें ५१२
पुरवीती हौस मैत्रीणी विचारून
आम्ही ग नांदतो दोघे हंसून खेळून ५१३
काय विचारीशी कधीं ना सखी तंटा
जीवेंभावें ओंवाळींन प्रेमरंगा माझ्या कंथा ५१४
काय विचारीशी आहे हो खरी सुखी
तुझ्या गळ्याची शपथ कसें खोटें बोलूं सखी ५१५
समुद्राच्या कांठी सखी मोतीं पोवळ्याच्या वेली
दैवाची उणीव कडू वेल हाती आली ५१६
जीवाला देत्ये जीव जीव देऊन पाहीला
पाण्यांत पाषाण अंती कोरडा राहीला ५१७
फोडीले चंदन त्याच्या केल्या बारा फोडी
स्त्रियांची जात वेडी पुरुषांना माया थोडी ५१८
सेवेला करित्यें झटून झिजून
चीज त्यांचें करी कोण मैत्रीणी गे ५१९
हंसेना बोलेना कोणी सासरी ग मशी
मैत्रीणी जीवासी कंटाळल्यें ५२०