मांडवाला मेढी घालाव्या ठेंगण्या
बहिणी चिमण्या उषाताई १०१
मांडवाला मेढी सरशा सूत्रधारी
चुलता कारभारी उषाताई १०२
घातला मंडप त्याला लावियलें छत्र
नवरी शोभते घरात उषाताई १०३
घातला मंडप हंडया झुंबरे लावती
तेथे झालरी सोडीती रेशमाच्या १०४
मंडपाला खांब शंभर लावीले
लाल कापडे मढवीले रातोरात १०५
मांडव घातला ओल्ये की हिरांचा
वैनीबाईच्या दीरांचा पराक्रम १०६
मांडव घातला ओल्ये पोफळीचा
व्याही केला कोंकणीचा मामारायांनी १०७
मांडव घातला ओल्ये ओलेत्यांनी
उषाताईच्या चुलत्यांनी परी केल्या १०८
मांडवाला मेढी घालाव्या दुसर्या
बहिणी रुसल्या गोपूबाळाच्या १०९
खांद्यावर कुर्हाडी कुठें जाता हो वर्हाडी
मांडवाला मेढी चंदनाच्या ११०
घाणा भरियेला विडा ठेवियेला
आधी नमियेला गणराज १११
घाणा भरियेला खंडीच्या भाताचा
आमुच्या गोतांचा गणराय ११२
आधी मूळ धाडा दूरी दूरींचीये
आम्हा कुळीचीये जोगेश्वरीला ११३
आधी मूळ धाडा घुंगराची गाडी
शालजोडीचे वर्हाडी गणराय ११४
आधी मूळ धाडा चिपळूण गांवा
परशुराम देवा आमंत्रण ११५
नागवेली बाई आगरी तुझा वेल
कार्य मांडले घरी चल भाईरायांच्या ११६
अहेर की आला शेला शालू खंबायीत
चल सखी मंडपात उषाताई ११७
अहेर की आला माहेरीचा शेला
शेल्यावरी झेला मोतीयांचा ११८
अहेर की आला माहेरींची चोळी
चोळीवर जाळी मोतीयांची ११९
अहेर की आला माहेरींची शाल
शालीवरी लाल पीतांबर १२०