या प्रकरणात बहीणभावासंबंधीच्या ओव्या दिल्या आहेत. या रसाळ व प्रेमळ ओव्या वाचून ज्याचे हृदय उचंबळणार नाही असा माणूस क्वचित असेल. बहिणीचे भावासाठी हृदय किती तुटते, तिचे त्याच्यावर किती प्रेम, भावाचे वर्णन करताना तिला सार्‍या उपमा कशा कमी वाटतात, ते सारे या ओव्यांत पहावयास मिळेल. सासरी गेलेली बहीण माहेरच्या प्रेमासाठी, भावाच्या भेटीसाठी, त्याच्याकडून निरोप वा पत्र यावे यासाठी कशी अधीर झालेली असते ते या ओव्यांतून फार सुरेख रीतीने दाखविले गेले आहे. पावसाळा संपत आलेला असावा, नदी-नाले शांत झालेले असावेत, शेतेभाते पिकलेली असावी, दिवाळी जवळ आलेली असावी. मग बहिणीचे डोळे भावाकडे लागतात. ती म्हणते :

“पूर ओसरले,                     नदीनाले शांत झाले
अजून कां न भाई आले                बहिणीसाठीं ॥
नवरात्र गेलें                       दसरा दूर गेला
नेण्याला कां न आला                  भाईराया ॥”

इतर भाऊ आपल्या बहिणी नेतात. बहिणींना आणण्यासाठी प्रेमळ भाऊ रंगीत गाडया पाठवतात. ते सारे पाहून जिचा भाऊ येत नाही तिच्या जिवाची फार तगमग होते. त्यात शेजारच्या बायका आणखी विचारू लागतात :

“शेजी मला पुसे                 येऊन घडी घडी
कधीं माहेराची गाडी                 येणारसे ॥”

असे कोणी विचारले म्हणजे फारच वाईट वाटते. घरात मुलेही विचारू लागतात, “आई, केव्हा ग मामा येईल ?” आई काय उत्तर देणार ? ती मामाची बाजू घेते. “बाळांनो, त्याला काम असेल, नाही तर आल्याशिवाय राहता ना” असे सांगते:

“मुले पुसताती                 येई ना कां ग मामा
गुंतला कांही कामा                     माय बोले ॥”

ती असे उत्तर देते. परंतु तिच्या मनाचे त्याने समाधान होत नाही. तिचा भाऊ आजारीबिजारी तर नसेल असे तिच्या मनात येते. परंतु या मनातील दुष्ट शंकेचे ती स्वत:च निरसन करते. माझा भाऊ आजारी असता तर हा वारा शीतल व सुगंधी असा येता ना, असे ती म्हणते. किती सहृदय व रम्य कल्पना :

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel