( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

[ खोलीचा दरवाजा बंद असताना,वसतिगृहात प्रत्येक मजल्यावर व तळमजल्यावर बाहेर जाण्याच्या रस्त्यावर, सरकते दरवाजे व त्याला दोन दोन कुलूपे असताना, खिडक्यांना गज असताना ,रात्री सुनिता कुठे जाते? कशी जाते?कां जाते?सुनिता खरेच माणूस आहे का?असे अनेक प्रश्न अनिताला पडले होते.?

कदाचित कुठे जाते? कां जाते?याचा अंदाज लावणे ,तर्क करणे, शक्य होते.कदाचित त्याचा शोधही लावता आला असता.परंतु या सर्व कडेकोट बंदोबस्तातून ती बाहेर कशी जाते?याचा उलगडा होणे अशक्य होते.

सुनीताला अनिताच्या मनातील वादळाची चांगलीच कल्पना आली होती.

तिची अस्वस्थता तिला स्पष्टपणे जाणवत होती.

अनिताच्या जागी सुनीता असती तर तीही अशा विचारचक्रात सापडली असती.    

सुनीताने दुसर्‍या  दिवशी अनिताजवळ सर्व रहस्य सविस्तर उलगडून सांगितले.

तिलाही आपल्या रहस्यात सामील करून घेतले.]

कॉलेजचे प्राचार्य गोडबोले यांचे देसाई शिक्षण संस्थेच्या सर्व पसाऱ्यावर बारीक लक्ष असे.संस्थेच्या संचालक मंडळाचेही ते अध्यक्ष होते.प्राचार्य म्हणून, संचालक म्हणून,आणि संचालक मंडळाचा अध्यक्ष म्हणून, त्यांच्या हातात प्रचंड सत्ता एकवटलेली होती  एक दिवस ते "अश्रूंची झाली फुले"  हे नाटक पाहायला गेले होते. त्यांनी काशीनाथ घाणेकरचे काम बालपणी  पाहिले होते .सुबोध भावे वेगळ्याच ढंगात ते काम करतो असे त्यांनी वाचले होते.त्याचे काम पाहायला ते आवर्जून गेले होते.एक अंक संपल्यावर स्टॉलवर चहा पीत असताना त्यांना एक मुलगी दिसली.ती मुलगी त्यांच्या मित्राची मुलगी होती.या संस्थेची ख्याती  ऐकल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला मुद्दाम या संस्थेत शिक्षणासाठी ठेवले होते.मुलीसह प्राचार्यांना ते भेटायला आले होते.अॅडमिशन वगैरे झाल्यावर त्यांनी मुलगी तुमच्याकडे सोपविली आहे तुम्हीच तिचे आता पालक आहात.असे सांगून तिची ओळख त्यांच्याशी करून दिली होती.ती मुलगी दुसर्‍या  एका मुलीबरोबर कॉफी पिताना दिसली.ती मुलगी सुनीता होती.

एकदा पाहिल्यावर तो चेहरा प्राचार्य गोडबोलेंच्या मनात कायमचा कोरला जात असे.माणसे पारखण्यात आणि लक्षात ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता.  एवढा कडक बंदोबस्त असताना ही मुलगी नाटक पाहायला कशी येऊ शकते असा प्रश्न त्याना पडला.बहुधा रेक्टरची परवानगी घेऊन  ती गावातील  नातेवाइकांकडे गेली असावी,व तिथून ती येथे नाटकाला आली असावी,असे त्यांनी मनाचे समाधान करून घेतले.सुनीता अनिताजवळ  गप्पा मारण्यात दंग होती.तिचे प्राचार्यांकडे लक्ष नव्हते.

दुसर्‍या  दिवशी ऑफिसला आल्यावरही तो प्रश्न त्यांच्या मनात रेंगाळत होता.त्यांनी मुलींच्या वसतिगृहाच्या रेक्टरला बोलावणे पाठवले.सुनीताची चौकशी केली.ती परवानगी घेऊन बाहेर गेलेली नाही असे त्यांना कळले.त्यांनी रखवालदार सुरक्षारक्षक यांनाही बोलावून घेतले.वसतिगृहातून रात्रीं कुणीही बाहेर गेले नाही किंवा आंत आले नाही याची त्यांनी खात्री करून घेतली.आपले डोळे आपल्याला फसवतात की काय असे त्यांना वाटू लागले.

त्यांनी त्या रात्रीचे सीसीटीव्ही चित्रण पाहिले.त्यात कुठेही सुनीता दिसली नाही.मुलींच्या वसतिगृहात कॉरिडॉरमध्येही सीसीटीव्ही लावले होते.त्यातही सुनिता कुठेच दिसली नाही.त्या दिवशी नाट्यगृहात पाहिलेली मुलगी   सुनिताच होती यावर ते ठाम होते.

त्यांनी थोडा वेळ विचार केला.सुनिताच्या खोलीत तिला कळणार नाही अशा प्रकारे सीसीटीव्ही बसविण्याचे त्यांनी ठरविले.हा सीसीटीव्ही इन्फ्रारेड किरणांचा होता.रात्री काळोख असताना किंवा अल्प प्रकाश असतानाही होणाऱ्या सर्व हालचाली कळल्या असत्या.सुनीता व अनिता दोघीही कॉलेजात गेलेल्या असताना त्यांनी ते काम गुप्तपणे करून घेतले.

आता थोड्याच दिवसांत उलगडा होणार होता.

दर चार दिवसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहिले जात असे. सीसीटीव्ही फुटेज पाहताना पुढील उलगडा झाला.

बाहेर जाण्याचा पोशाख करून नट्टापट्टा करून दोघीही तयार होत होत्या.  रात्री दहा वाजता दोघीही पद्मासन घालून बसल्या.मन एकाग्र करून त्या कोणतातरी मंत्र पुटपुटत होत्या.एकाएकी  तिथून त्या अदृश्य झाल्या.दोघी जिथे बसल्या होत्या तिथे दोन पोपट दिसू लागले होते.ते पोपट खिडकीतून बाहेर उडून गेले.रात्री दीड वाजता पुन्हा दोन पोपट खोलीमध्ये आले.खोलीत आल्या आल्या त्यांचे रूपांतर सुनीता व अनिता यामध्ये झाले.

हे सर्व पाहून प्राचार्य गोडबोले आश्चर्यचकित झाले.ही किमया ही जादू या दोघींनी कशी साध्य करून घेतली तेच त्यांना कळत नव्हते.कोणतीतरी जादू, भूतपिशाच्च ,त्यांना अनुकूल झाले होते एवढे मात्र खरे.

दोन चार दिवसांनी, कधीकधी लागोपाठ दोन तीन दिवस, दोघीही पोपटामध्ये आपले रूपांतर करून  बाहेर जात असत.ही गोष्ट अर्थातच नियमबाह्य होती.याला प्रतिबंध कसा करावा याचा विचार प्राचार्य गोडबोले करू लागले.

सुनीताला मुळातच जादूची आवड होती.रहस्यकथा भूतकथा वाचून ती आणखीच वाढली होती.त्या दिवशी वाचनासाठी कादंबर्‍या दिवाळी अंक लघुकथासंग्रह खरेदी करीत असताना तिला अकस्मात बंगाली जादूचे पुस्तक दिसले होते.केवळ कुतूहलाने तिने ते विकत घेतले होते.पुस्तक वाचत असताना त्यातील अनेक क्रिया प्रक्रिया यासाठी फार प्रयास व साहित्याची गरज असते असे तिला आढळून आले.कवटीची हाडे, स्मशानातली माती,केस' कस्तुरी,अशा प्रकारचे साहित्य गोळा करणे कठीण आहे.त्यात कितीतरी अप्राप्य गोष्टींची यादी दिली होती.  स्मशानभूमी, कब्रस्थान, दफनभूमी, अशा ठिकाणी मध्यरात्री जाणे अशक्य आहे.मनात कितीही असले तरी भौतिक अडचणी व भीती यामुळे तसे करता येणार नाही असे तिच्या लक्षात आले.

वाचता वाचता तिला एक असा मंत्र सापडला की जो काही साहित्याशिवाय सिध्द करता येणे शक्य होते.सबंध दिवस उपास करून ,काळी वस्त्रे परिधान करून  मध्यरात्री बारा वाजता पद्मासन घालून, पुढय़ात कब्रस्तानात आणलेला दगड  खवीस  म्हणून  ठेवून,स्पष्ट उच्चारासह तो मंत्र दहा हजार वेळा म्हणायचा होता. 

मंत्र सिद्ध झाल्याबरोबर त्या दगडाचे रूपांतर एका मण्यात होणार होते.तो मणी सोन्याच्या चेनमध्ये घालून गळ्यात कायम ठेवायचा होता.तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही तो मंत्र म्हणताच तुमचे रूपांतर पोपटामध्ये होणार होते.तुम्ही पुन्हा तो मंत्र म्हणताच तुमचे रूपांतर मनुष्यामध्ये झाले असते.अनिता तिच्या घरी गेलेली असताना सुनिताने तो मंत्र सिद्ध केला.त्यानंतर तिचे काम सोपे होते.जेव्हा इच्छा होईल त्यावेळी ती त्या मंत्राचा उच्चार करीत असे.पोपट रूपाने खिडकीतून बाहेर गेल्यावर ती पुन्हा मंत्र म्हणून आपले  रूपांतर करून घेई.नंतर ती तिला हवे असेल तेवढे हवे त्या ठिकाणी फिरू शकत असे.

परत येताना मंत्रोच्चाराने तिचे रूपांतर पोपटामध्ये व खोलीत आल्यावर पुन्हा रूपांतर सुनीतामध्ये होत असे.अशा प्रकारे ती तिला हवे तेव्हा अनेक महिने रात्रीची खिडकीतून बाहेर फिरायला जात होती.तिने मित्रमैत्रिणीही जोडल्या होत्या .चित्रपट नाटक रेस्टॉरंट सर्वत्र ती मुक्तसंचार करु शकत असे.

एके दिवशी तिचे गुपित अनिताला कळले.सुनिताने तिच्याकडून सर्व साधना करून घेतली.अनिताही तिचे रूपांतर पोपटामध्ये करू लागली.तेव्हापासून दोघीही त्यांना हवे तेव्हां बाहेर मुक्त संचार करीत असत. एकीला दोघी झाल्यामुळे त्या जास्त मोकळेपणाने फिरू शकत असत.दोघींची मैत्रीही जास्त घट्ट झाली.त्या दिवशी त्या अशाच नाटकाला गेलेल्या असताना प्राचार्य गोडबोले यांच्या दृष्टीस पडल्या.त्यांनी सुनीताला ओळखले.

नंतर त्यांनी इन्फ्रारेड सीसीटीव्ही बसवून त्यांचे रहस्य शोधून काढले.

प्राचार्य गोडबोले यांनी त्या दोघींना आपल्या ऑफिसमध्ये बोलाविले.त्या तिथे गेल्या तेव्हा वसतिगृहप्रमुख हजर होते.काहीही न बोलता सीसीटीव्ही चित्रण त्यांना दाखविण्यात आले.दोघीही गडबडून गेल्या.आता आपल्याला कॉलेजमधून काढून टाकणार याची त्यांना पक्की खात्री पटली.आपल्याला दुसर्‍या  शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळणार नाही .आपण उच्च शिक्षणाला मुकणार.आपली सर्वत्र नाचक्की होणार. हेही त्या समजून चुकल्या .आपल्या घरी भरपूर निर्भत्सना होणार, दाट खावी लागणार ,दोघीही घाबरून गेल्या.   

प्राचार्यांनी त्यांना तुम्ही ही विद्या कशी साध्य केली असा प्रश्न केला.दोघींना सर्व खुलासा करावा लागला.पुन्हा असे करणार नाही. पुन्हा असे  होणार नाही. असे वचन तुम्ही देऊ शकता का? प्राचार्य गोडबोले यांनी त्यांना विचारले.त्यानी रडत रडत लगेच तसे वचन दिले.प्राचार्यांना हवे त्याप्रमाणे लिखित स्वरूपात सही करून  दिले.

दोघींच्या गळ्यातील लॉकेट्सह मणी त्यांनी काढून घेतले.पुन्हा असे काही माझ्या निदर्शनास आले तर तुम्हाला रस्टिकेट केले जाईल असेही त्यांना सांगितले.

दोघींनीही खाली मान घालून आम्ही पुन्हा असे करणार नाही असे सांगितले.कृपा करून आमच्या घरी कळवू नका अशी विनंती केली.ते तुमच्या वागणुकीवर ठरविले जाईल असे प्राचार्यानी सांगितले.ही सर्व गोष्ट गुप्त ठेवण्यात आली.  

देसाई शिक्षण संस्थेच्या परिसरातील सर्व वसतीगृहांच्या खिडक्यांना जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.जाळीतून पोपट बाहेर जाऊ शकत नाही!

*  सुनीता व अनिता या दोघींची बंगाली  व इतर जादू वरील मंत्र तंत्रावरील श्रद्धा दूर झालेली नाही.*

*त्या अशा एखाद्या मंत्राच्या   शोधात आहेत की बारीक कीडा किंवा पाल होऊन जाळीतून  बाहेर जाता येईल !!!*   

(समाप्त)

२४/११/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel