तू दुष्ट आहेस. तुला कुणाची पर्वा नाही. मी मेलो तर तुझे काय बिघडले ?

तू मला आता ताबडतोब घरात घेऊन ये म्हणून तो सांगत होता.

नाहीतर मी मरेन आणि तू खुनी ठरशील.तुला फाशी होईल. असेही तो सांगत होता .

सुधा जागी झाली ती घामाने थबथबलेली होती .

सुधाला दरदरून घाम फुटला होता .ती पूर्णपणे जागी झाली .आपण कुणाचा तरी खून केला आपल्याला फाशी होणार अशा कल्पनेने ती घामाने भिजून ओलीचिंब झाली होती .आपण तो आरसा उगीच घेतला असे तिला एकदा वाटले .त्या आरशाबद्दल एवढे आकर्षण आपल्याला का वाटावे तेच तिला कळेना.पहाटेचे पाच वाजले होते .सुधीर डाराडूर झोपला होता.तो घोरत होता त्याचा सुधाला हेवा वाटला.आता तिला झोप येणे शक्य नव्हते.सुधीरला झोपेतून उठविण्याचे तिच्या जीवावर आले.गाढ झोपेतून उठवल्याबद्दल कदाचित तो रागावेल अशीही भीती तिला वाटली.

ती उठली.मुखमार्जन इत्यादी करून तिने कडकडीत चहा बनविला .स्वयंपाकघरात चहा घेण्यापेक्षा तो दिवाणखान्यात सोफ्यावर बसून आरामशीरपणे  प्यावा असे तिने ठरविले .ती चहाचा कप घेवून दिवाणखान्यात आली.तिने बटण दाबून खोली प्रकाशमान केली.

तेवढ्यात तिची नजर समोरच्या भिंतीवर गेली .तिथे भिंतींवर तो आरसा डौलात लटकत होता.  तो आरसा आपल्याकडे बघून छद्मी हसत आहे असे तिला वाटले.आपण रात्री तो आरसा घरात आणला नाही हे तिला पक्के आठवत होते .आपण झोपल्यावर कदाचित रात्री श्रीधरने तो आरसा घरात आणला असेल असे एकदा तिला वाटले परंतु श्रीधरचा स्वभाव पाहता ती गोष्ट अशक्य होती .तो एकदा झोपला की सकाळपर्यंत डाराडूर सोबत असे .रात्री एकट्याने उठून आपल्याला सांगितल्याशिवाय जाऊन त्याने तो अारसा आणणे अशक्य होते .आरसा आपणहून आपोआप घरात आला होता .तो घरात आला कसा याचे तिला आश्चर्य वाटत होते .थरथरत ती सोफ्यावर बसली .तिच्या हातातून कपबशी निसटणार होती.ती कशीबशी तिने सांभाळली .अंगातील त्राण गेल्यासारखी ती मटकन सोफ्यावर बसली .आरशाकडे ती एकटक बघत होती.  एखाद्याने संमोहित केल्यासारखी ती आरशाकडे पहात होती .ती चहा पिण्याचेही विसरली .

आरशामध्ये काहीतरी सैतानी पाशवी शक्ती होती .तो स्वप्नात येवून बोलू शकत होता .

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या आपण जाऊ शकत होता .

विचित्र चेहरे करू शकत होता .

एखाद्याचे प्रतिबिंब  दाखवणे किंवा न दाखवणे हे त्याच्या 

मर्जीवर अवलंबून होते .

त्याचे व्यवस्थित पॅकिंग केलेले असतानाही तो त्यातून बाहेर पडू शकत होता 

अापण अारसा आणला हे   ठीक केले नाही असे तिला तीव्रतेने अंतर्यामी वाटत होते .

किती वेळ गेला कोण जाणे .श्रीधर जागा झाला . शेजारी सुधा नव्हती.नेहमी सुधा उशिरा उठत असे. आज तर रविवार होता. ती नेहमी सुद्धा  लोळत पडत असे.आज तर रविवार होता .आज तो चहा करून नंतर तिला उठवत असे . आज ती लवकर उठल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले . कामावर जाण्याची दोघांनाही घाई नव्हती .नेहमी प्रमाणे बेडवर सुधा लोळत पडणे अपेक्षित  होते .कदाचित तिला झोप आली नसेल, म्हणून ती लवकर उठली असेल,असा विचार त्याने केला.आणि तो पुन्हा कुशीवर वळला .

परंतु त्याला झोप येईना. काही तरी अनैसर्गिक अनपेक्षित घडत आहे असे त्याला वाटत होते.त्याला खोलवर कुठेतरी अनामिक काळजी वाटत होती .शेवटी तो उठला. सुधा स्वयंपाक करत असेल किंवा न्हाणीघरात असेल अशा विचाराने तो तिकडे तिला शोधत गेला.शेवटी तो दिवाणखान्यात आला . तिथे त्याला सुधा काल घेतलेल्या आरशाकडे एकटक पहात असलेली आढळली.ती भानावर नव्हती .संमोहित केल्यासारखी, गारूड झाल्यासारखी, ती एकटक अारशाकडे पाहात होती.तिची पापणीही लवत नव्हती. शेजारी बसून त्याने तिच्या खांद्यावर किंचित थापटले.दचकून ती किंकाळी फोडणार होती.शेजारी श्रीधरला पाहून तिने त्याला घट्ट मिठी मारली.ती हमसून हमसून रडू लागली .ती कोणत्यातरी अनामिक भीतीने थरथरत होती .

एवढे घट्ट आलिंगन सुधाने आतापर्यंत  त्याला केव्हाही दिले नव्हते.

तिची मिठी सैल झाल्यावर तो म्हणाला एवढ्या लवकर उठून तो आरसा तू का आणला? मी उठल्यावर तो घेऊन आलो असतो .त्यावर सुधा म्हणाली मी आरसा आणला नाही .तूच मला सरप्राइज देण्यासाठी आरसा पहाटे घेऊन आलास आणि नंतर झोपेचे सोंग घेऊन पडलास . आणि मलाच निष्पापपणाचा आव आणून विचारतोस कि तू आरसा कशाला अाणलास?

त्यावर सुधीरने मी अारसा आणला नाही असे किंचित रागावून ठामपणे सांगितले  सांगितले .

*मग अारसा आणला कुणी असे म्हणत दोघांनीही भिंतीकडे पाहिले .*

* भिंतीवरून आरसा नाहीसा झाला होता .*

*भिंतीवर आरसा दोघांनीही पाहिला होता .*

*मग आरसा गेला कुठे?

दोघांनाही आता भीती वाटू लागली .आपण तो आरसा उगीच विकत घेतला  असे दोघांनाही वाटू लागले. आरसा प्राचीन होता. दुर्मिळ होता. त्याचे डिझाइन आकर्षक होते.त्याची चौकट अत्यंत सुबक व कोरीव काम केलेली होती .सर्व गोष्टी खऱ्या .परंतु त्या आरशांत  काहीतरी अमानवी होते .तो अारसा आपला घात करणार  असे दोघांनाही वाटत होते .

अारसा घरातून निघून गेला असल्यास फारच उत्तम .परंतु तो चिकट आरसा असा घरातून सहजासहजी निघून जाईल यावर दोघांचाही विश्वास बसत नव्हता .तो घरातच कुठे  तरी लपून बसला असेल असे त्यांना वाटत होते.

त्या आरशाला शोधून काढावा व नष्ट करावा असे दोघांनीही ठरविते . तो घरातच कुठे तरी लपून बसलेला असणार याची त्यांना खात्री होती.त्याचा शोध घेण्याला त्यांनी सुरुवात केली .शेवटी तो त्याना बाथरूममध्ये लटकत असलेला दिसला.हा बाथरूममध्ये आहे तर बाथरूम मधला आरसा गेला कुठे हाही एक प्रश्न होता .या अमानवी आरशाने त्या आरशाचा खून तर केला नसेल?कि त्याला कुठे लपविला?

ते नंतर पाहू असा विचार करून त्यांनी प्रथम तो आरसा उचलून दिवाणखान्यात आणला .दिवाणखान्यात तो आरसा श्रीधरने रागारागाने खाली फेकला.तो फुटून सर्वत्र काचा होतील असा विचार दोघांच्याही मनात एकाच वेळी आला.त्यापेक्षा त्याला गॅलरीतून खाली फेकला असता तर बरे झाले असते  असेही त्यांना वाटले .प्रत्यक्षात त्या आरशाला काहीही झाले नाही .जागच्या जागी उसळी मारून तो खाली पडला .

श्रीधरने रागारागाने त्याला उचलले आणि गॅलरीत जाऊन खाली फेकले .तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला .वरून पाहता त्याला काहीही झालेले दिसत नव्हते.चला बला गेली.कुणी तरी तो आरसा उचलून आपल्या घरी नेईल.नेणाऱ्याचे व आरशाचे जे  काही व्हायचे असेल ते होईल असे म्हणून दोघेही दिवाणखान्यात परत आले.तिथे पाहतात तो, तो आरसा डौलाने भिंतीवर लटकत होता.

दोघेही मटकन सोफ्यावर बसले .वाटेल ते करून त्या आरशापासून मुक्ती मिळवायचीच अशा दोघांनीही निश्चय केला.त्यानी पटकन आपले आवरून घेतले. एकजण त्या आरशावर लक्ष ठेवून होता .दुसरा स्नानगृहात स्नान करीत होता .आपली नजर त्याच्यावर नसेल तर तो बाथरूममध्ये येऊन आपल्याला पाहील अशी  भीती दोघांनाही वाटत होती .

आज बाहेरच जेवू असा विचार करून त्यांनी तो आरसा बरोबर घेतला .ते दूर गावाबाहेर नदीवर गेले. आपल्याकडे कुणी पाहात नाही असे पाहून त्यांनी तो आरसा पुलावरून नदीत टाकून दिला.आरसा नदीत बुडताना दोघांनीही पाहिला .नंतर जेवून दुपारचा मॅटिनी शो पाहून  समाधानाने दोघेही घरी आले.

घरात शिरताना दोघांनाही अनामिक भीती वाटत होती .कुणीही कुणाजवळही काहीही बोलत नव्हते .एकमेकांचा हात घट्ट धरून त्यांनी दिवाणखान्यात प्रवेश केला .

दिवाणखान्यात आरसा नव्हता.त्यांनी बाथरूमध्ये जावून पाहिले .तिथेही तो अारसा नव्हता .

*घरात सर्वत्र हिंडून त्यांनी शोध घेतला .कुठेही आरसा नव्हता .त्यानी समाधानाचा सुस्कारा सोडला.*

*हे समाधान क्षणिक होते.आजच्या दिवसापुरते होते. हे त्या दोघांनाही माहित नव्हते!*

* तो आरसा त्यांचा असा पिच्छा सोडणार नव्हता.*

(क्रमशः)

११/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel