सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण
तिथं आमच्या सासुबाई कुंकु लावीत होत्या
सासुबाई सासुबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या सासर्‍याला, सासर्‍याला ॥१॥

सोन्याची दऊत बाई मोत्याची लेखणी
तिथं आमचे मामंजी लिहीत होते
मामंजी मामंजी मला आल मुळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपल्या जावेला, जावेला ॥२॥

सोन्याचा डेरा बाई मोत्याची रवी
तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
जाऊबाई जाऊबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरिच दिसतीस
पुस जा आपल्या दीराला, दीराला ॥३॥

सोन्याची विटी आणि मोत्याचा चेंडू
तिथं आमचे भाऊजी खेळत होते
भावोजी भावोजी मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस जा आपुल्या नणंदेला, नणंदेला ॥४॥

सोन्याची सुपली बाई मोत्यांनी गुंफीली
तिथं आमच्या वन्स पाखडत होत्या
वन्सबाई वन्सबाई मला आलं मूळ
मला काय पुसतीस बरीच दिसतीस
पुस ज्या आपुल्या पतीला, पतीला ॥५॥

सोन्याच पलंग बाई मोत्याचे खूर
तिथं आमचे पतिराज झोपले होते
पतिराज पतिराज मला आलं मूळ
आणा फणी घाला वेणी जाऊ दे राणी माहेरा

जाती तशी जाऊ दे, निळ्या घोडीवर बसु दे
निळी घोडी हसली, सखुबाई सुंदर दिसली ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel