(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

भवानरावांच्या  विनाशाची दुर्दम्य इच्छा तिच्याजवळ होती .

याशिवाय तिच्याजवळ काहीही नव्हते.

ही दुर्दम्य इच्छाच तिला शक्ती व युक्ती देणार होती.

भवानरावांच्या वाड्यासभोवती तिने दोन चकरा मारल्या. तिला आत जाता येत नव्हते .तिने आत जाण्याचा प्रयत्न केल्यावर तिला कोणती तरी अदृश्य  शक्ती अडवीत होती .त्या शक्तीला दूर करून आत जाण्याला तिची शक्ती कमी पडत होती .दिवस असल्यामुळे असे होत असेल असे तिच्या मनात आले .रात्र झाल्यावर आपल्या शक्ती जास्त तीव्र होतील आणि आत जाता येईल म्हणून तिने रात्र होईपर्यंत वाट पहाण्याचे ठरविले. रात्र झाली. तिने पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला .ती आत जाऊ शकली नाही.

आपण स्वतःहून आत जाऊ शकत नाही असे तिच्या लक्षात आले.आहे या परिस्थितीत कुणीतरी आपल्याला आत घेऊन गेले पाहिजे हे तिच्या लक्षात आले .ती इतस्ततः रस्त्यावरून फिरत राहिली .आपल्याला आत कोण घेऊन जाईल असा विचार तिच्या मनात होता .रस्त्याच्या एका कोपऱ्यात एक फेरीवाला दुकान मांडून बसला होता .हातगाडीवर विविध प्रकारची खेळणी होती .त्यात निरनिराळ्या प्रकारच्या व आकाराच्या ,लहान मुलींच्या खेळण्यातील बाहुल्या होत्या.यातील एखाद्या बाहुलीत जर आपण प्रवेश केला आणि ती बाहुली कुणीतरी जर त्या वाड्यात घेऊन गेले तर आपणही वाड्यात प्रवेश करू असे तिच्या लक्षात आले . प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे असा विचार तिच्या मनात आला .समोरून वाड्यात काम करणारी एक बाई येत होती .वाड्याच्या परिसरातच त्या बाईला राहण्यासाठी जागा देण्यात आली होती.तिची मुलगी सुषमा तिच्याबरोबरच होती .त्या बाईला राहण्यासाठी दिलेली जागा फारच लहान होती .सुषमा वाड्याच्या परिसरात व वाड्यातही इतस्ततः फिरत असे .तिची व रमाची चांगली गट्टी होती .रमा वाड्यांमध्ये काम करीत असताना ही सुषमा तिच्या आगेमागे ताई ताई करीत फिरत असे.

रमाने हळूच सुषमाच्या शरीरात प्रवेश केला .त्या हातगाडी जवळून जात असताना सुषमाने आईला मला बाहुली पाहिजे म्हणून हट्ट धरला .सुषमा ऐकत नाही असे पाहून तिच्या आईने तिला आवडणारी एक बाहुली विकत घेतली .बाहुली घेण्याची इच्छा  रमानेच निर्माण केली होती . सावित्रीकाकू ,सुषमा, तिच्याबरोबर रमा व बाहुली सर्व अल्लद वाडय़ामध्ये पोहोचले.यावेळी रमाला कुणीही अडथळा केला नाही .

सर्व वाडा रमाच्या पूर्ण ओळखीचा होता.ती वाड्यात सर्वत्र भिरभिर फिरली .ती भवानरावांना शोधीत होती .भवानराव गावात नव्हते काही कामानिमित्त ते दिल्लीला गेले होते .जवळ आलेल्या निवडणुकीत लोकसभेचे तिकीट मिळविण्याच्या खटपटीत ते होते .सर्वत्र फिरून ती पुन्हा त्या बाहुलीत येऊन स्थिर झाली .तिला सुषमामध्ये राहायचे नव्हते .सुषमा शाळेत गेली किंवा दुसऱ्या काही कारणाने बाहेर पडली तर तिला तिच्या बरोबर बाहेर जायचे नव्हते.सुषमात आपण घर केले तर कदाचित आपल्याला त्यातून बाहेर पडता येणार नाही अशी तिला भीती वाटत होती .आपल्यामुळे सुषमावर काही वाईट परिणाम होऊ नये अशीही तिची प्रामाणिक इच्छा होती. सजीव सुषमापेक्षा निर्जीव बाहुलीतून आपल्याला आत बाहेर सहज करता येईल अशी तिची खात्री होती .

एखाद्या श्वापदाप्रमाणे ती भवानारावांची वाट पाहत होती.तिला तूर्त काम नव्हते.ती त्या बाहुलीत झोपी गेली .रोज आपली शक्ती वृद्धिंगत होत आहे असे तिच्या लक्षात येत होते .पूर्वी कोणत्याही निर्जीव वस्तूत शिरताना आणि बाहेर पडताना तिला त्रास होत असे. एखाद्या मनुष्यात शिरताना आणि त्याचा ताबा घेताना तर तिला खूपच कष्ट पडत असत .

थोड्याच दिवसात ती कोणत्याही मनुष्यात,कोणत्याही प्राण्यात ,निर्जीव वस्तूत ,आतबाहेर लीलया  करू लागली.त्यासाठी ती प्रयत्नपूर्वक सराव करीत होती .थोड्याच दिवसांत तिने आंत बाहेर कसे करायचे त्यात प्राविण्य मिळविले. भवानरावांचा प्राण कसा घ्यायचा, त्यांना मृत्युदंडाची शिक्षा कशी द्यायची,याचा ती सतत विचार करीत होती. भवानरावांचा प्राण घेणे एवढेच तिचे उद्दिष्ट नव्हते.त्या दुष्ट कुटील गर्विष्ट उद्दाम माणसाला आपण का मरत आहोत हे लक्षात आणून देणे आवश्यक होते .त्याचबरोबर सुखासुखी मृत्यूदंड तिला मान्य नव्हता .हाल हाल होऊन तळमळत राहून आपल्या कृत्याचा पश्चाताप करीत त्याला मृत्यू  आला पाहिजे अशी तिची इच्छा होती.

दहा बारा दिवसांनी भवानराव वाड्यावर परत आले .प्रवास व अनेक लोकांना भेटून त्यांना शीण आला होता.ते दमले होते .त्यांना विश्रांतीची गरज होती.चार आठ दिवस विश्रांती घेऊन नंतरच ते त्यांच्या नेहमीच्या उद्योगांना सुरुवात करणार होते .तोपर्यंत त्यांचे कारभारी सर्व व्यवहार सांभाळणार होतेच. वाड्यावर आपल्यापुढे काय ताट वाढून ठेवले आहे याची त्यांना अर्थातच कल्पना नव्हती .रमाने जीव दिला. आता सर्व प्रकरणाला पूर्णविराम मिळाला अशी त्यांची कल्पना होती.प्रत्यक्षात रमा त्यांच्या वाड्यातच दबा धरून त्यांची वाट पाहत होती .हे जर त्यांना कळले असते तर त्यांनी तात्काळ तो वाडा कायमचा सोडला असता .रमाचा बंदोबस्त करण्याचा शंभर टक्के खात्रीलायक मार्ग सापडल्यावर आणि त्याचा वापर करून रमाचा बंदोबस्त केल्यावरच ते वाड्यात परत आले असते.

अशुभ शक्ती वाड्यात येऊ नयेत म्हणून त्यांनी काही उपाय केले होते .वाड्याला एक प्रकारचे कवच निर्माण केले होते.हे कवच मांत्रिकामार्फत निर्माण करताना वाड्यात अशुभ शक्तींनी प्रवेश करू नये असा उपाय त्यांनी केला नव्हता.अशुभ शक्ती आत आली नाही म्हणजे आपण सुटलो अशी त्यांची कल्पना होती.(हे थोडेसे पूर्वी असुर तप करून देवांकडून वर मागत .देव वर देताना त्यात एक लहानशी पळवाट  ठेवीत असे . तसेच हे होते.)

अशुभ शक्ती वाड्यात सरळ प्रवेश न करता एखाद्या माध्यमामार्फत प्रवेश करील याची त्यांना व मांत्रिकाला सुतराम कल्पना आली नव्हती.आपण केलेल्या अनेक नीच कृत्यामुळे आपल्या जीवाला वाड्यात व वाड्याबाहेर धोका आहे याची त्यांना जाणीव होती .बाहेर फिरताना ते संरक्षक कवचाशिवाय फिरत नसत.संरक्षक कवच दोन प्रकारचे होते .त्यांनी मंतरलेला ताईत गळ्यात बांधला होता .त्याच बरोबर  बॉडीगार्डस, बाऊन्सर्स, बरोबर घेवून ते नेहमी फिरत असत.

त्या गळ्यातील ताईतामुळे अशुभ शक्तींपासून ते सुरक्षित होते.वाड्या सभोवतील संरक्षण कवचामुळे अशुभ शक्ती प्रवेश करू शकणार नाहीत.यदाकदाचित त्यांनी प्रवेश केला तरी त्या आपल्याला स्पर्श करू शकणार नाहीत असा बंदोबस्त त्यांनी केला होता .याची कल्पना रमाला नव्हती.ती वाड्यात काम करीत असताना तिने त्यांच्या गळ्यातील ताईत अनेकदा पाहिला होता .परंतु त्या ताईताचे सामर्थ्य तिला माहित नव्हते.

भवानराव वाड्यात परत आले आहेत असे कळल्याबरोबर ती त्या बाहुलीतून बाहेर पडून भवानरावांच्या खोलीत आली.भवानरावांच्या गळ्यातील ताईत बघितल्याबरोबर ती चमकली.मनुष्य योनीत असताना तिला त्या ताईताचे सामर्थ्य जाणवले नव्हते.परंतु या योनीत तिला त्या ताईताचे सामर्थ्य लगेच लक्षात आले. त्यांच्या गळ्यातून तो ताईत दूर केल्याशिवाय आपल्याला काहीही करता येणार नाही हे तिच्या लक्षात आले .

ती तिच्या घरी, त्या बाहुलीत आली आणि विचार करू लागली . थोड्याच वेळात तिला एक युक्ती सुचली .एक खाज येणारा किडा उचलून तिने तो त्यांच्या मानेवर अलगद सोडून दिला.किडा मानेवर फिरू लागल्यावर त्यांनी तो हाताने मारला. त्यांच्या मानेला प्रचंड खाज सुटली .खाजवता खाजवता त्यांची मान भप्प सुजली . मंतरलेला ताईत मानेत रुतल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला.त्यांनी तो ताईत काढून बाजूला टेबलावर ठेवला .याचीच वाट रमा पाहात होती .

खोली बाहेरून एक कुणीतरी कामकरी बाई जात होती .रमाने त्या बाईत पटकन प्रवेश केला.

आपल्या कामाला जाणारी ती बाई गरकन वळली .भवानरावांच्या पुढ्यात येऊन ती उभी राहिली.दोन्ही हात कमरेवर ठेवून तिने भवानरावांसमोर त्यांच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली.त्यांच्या इतर दुष्कृत्यांकडे त्या बाईने म्हणजेच रमाने दुर्लक्ष केले होते . स्त्रीच्या संदर्भातील रमाला माहीत असलेली सर्व दुष्कृत्ये ती ताडताड त्यांच्यासमोर बोलत होती.आतापर्यंत खाली मान घालून काम करणारी व वाड्यात फिरणारी ही बाई अकस्मात  ताडताड कशी बोलू लागली .तिला या सर्व गोष्टी कशा माहीत ,तेच भवानरावाना कळत नव्हते.

त्यांच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचून झाल्यावर रमा पुढे म्हणाली. या तुझ्या सर्व अनन्वीत दुष्कृत्यांसाठी,प्रदीर्घ काळ हाल हाल होऊन मृत्यू  याशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा योग्य ठरणार नाही . आणि ती शिक्षा मी रमा तुला देणार आहे. एवढे बोलल्याबरोबर रमा त्या बाईच्या शरीरातून लगेच बाहेर आली .

ती बाई भानावर आली .आपण भवानरावांच्या  खोलीत कसे काय आले तेच तिला कळेना.भवानरावांसमोर ती गोंधळल्यासारखी खाली मान घालून उभी होती.भवानरावाना काय झाले ते कळले नाही." मी रमा तुला शिक्षा देणार आहे" हे वाक्य त्यांना नीट ऐकूच आले नव्हते.  संतापाने ते वेडेपिसे बहिरे झाले होते. ती बाई उद्दामपणे आपली मर्यादा सोडून बोलली असा त्यांचा ग्रह झाला.त्यांनी ताबडतोब कारभाऱ्यांना बोलाविले .त्या बाईला कामावरून लगेच काढून टाकले .तिचा हिशोब पूर्ण करण्यास त्यांना सांगितले .त्या बाईला काय झाले ते कळत नव्हते. आपण भवानरावांच्या खोलीत कसे आलो ते तिला माहीत नव्हते. आपली नोकरी गेली एवढेच तिला कळले .रमाला वाईट वाटले पण तिचा इलाज नव्हता .  

रमाला आता लवकर सूड घेण्याची गरज होती.अन्यथा भवानरावानी एखाद्या तगड्या मांत्रिकाला बोलावून रमाचा बंदोबस्त केला असता.

वाड्याबाहेर भवानरावांचा अल्सेशियन कुत्रा साखळदंडाला बांधलेला होता. रमाने बाहेरील रक्षकाच्या शरीरात प्रवेश करून साखळदंडापासून  कुत्र्याला मुक्त केले .

दुसऱ्याच क्षणी ती त्या अल्सेशियन कुत्र्याच्या शरीरात शिरली .आतापर्यंत वाड्यात कधीही न शिरलेला तो कुत्रा उड्या मारीत  भवानरावांच्या खोलीत पोचला . 

त्या कुत्र्याच्या मागून सेवक धावत होते .त्या कुत्र्याने भवानरावांच्या गळ्याचा वेध घेतला .

*प्रत्यक्षात कुत्र्याच्या मार्फत रमाने त्यांच्या गळ्याचा वेध घेतला होता .*

*मानेचा काही भाग, छाती, हात, खांदे, कुत्र्याने फाडून टाकले.*

*प्राणांतिक वेदनेने कळवळत भवानराव जमिनीवर कोसळले . *

*त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जवळजवळ एक महिना भवानराव मृत्यूशी झगडत होते .

*त्या काळात वेदना भोगत असताना क्षणोक्षणी त्यांना रमा आठवत होती. 

*त्यांनी केलेली दुष्कृत्ये आठवत होती .*

* शेवटी तडफडत तडफडत भवानरावानी प्राण सोडला. *

*रमाचा सूड पूर्ण झाला होता .*

(समाप्त)

१७/२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel