( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

शिवराम, महादेव व कृष्णकांत यांच्या मृत्यूदंडाची योजनाही त्यांच्या मनात तयार होती.

फक्त त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे करायची होती .

मृत्यूदंडाची शिक्षा अपूर्ण राहून जर अण्णासाहेबांना मृत्यू आला असता तर ते त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत राहिले असते. 

कोणत्याही परिस्थितीत त्या तिघांनाही मृत्यूदंड होणे आवश्यक होते .

आईच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून मोहिनी व शिरीष कॅनडाहून परत आले होते.त्यांना हा अपघाती मृत्यू नाही तर हा खून आहे हे कळू द्यायचे नव्हते .सुमनच्या मृत्यूची बातमी ऐकून घरात बरीच नातेवाईक मंडळी जमा झाली होती .दिवस वार पूर्ण होऊन सर्व मंडळी आपापल्या घरी जाईपर्यंत काहीही करणे योग्य नव्हते .शक्यही नव्हते .बाबा एकटेच खोलीत बसलेले असतात. सतत आईच्या  फोटोकडे पाहत असतात हे पाहून मोहिनी चिंतीत झाली होती .बाबांच्या डोक्यावर काही परिणाम तर झाला नाही ना अशी शंका तिला व शिरीषला येऊ लागली होती .आपण नॉर्मल आहोत असे दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी बाबा आतून अस्वस्थ आहेत, कुणावर तरी रागावलेले आहेत, हे मोहिनीच्या लक्षात येत होते.कॅनडाला जाण्यापूर्वी दोघांनीही अण्णासाहेबाना त्यांच्याबरोबर कांही दिवस तरी कॅनडाला येण्याचा खूप आग्रह केला .तुम्ही पुढे व्हा. मी येथील आवराआवर करून पाठोपाठ येतोच असे सांगूनन त्यांनी दोघांनाही निरोप दिला .घरातील सर्व पाहुणे मंडळीही यथावकाश आपापल्या घरी रवाना झाली .आता अण्णासाहेब व नोकर चाकर एवढेच घरात होते.

अण्णासाहेबांना आणखी एक काळजी घ्यायची होती.त्यांच्या मनातील वादळाचा कुणालाही थांगपत्ता लागू द्यायचा नव्हता .

शिवराम आणि कंपनीला अण्णासाहेबाना त्यांचा संशय आला आहे असे कुठेही जाणवणे धोक्याचे होते .ते बेसावध राहणे अत्यावश्यक होते .ते बेसावध असले तरच अण्णासाहेबांना त्यांची योजना अंमलात आणणे सहज शक्य होणार होते .

ते तिघे रोज किंवा एक दिवसाआड अण्णासाहेबांच्या समाचाराला येत असत .त्यावेळी नक्राश्रू ढाळीत असत .आपण दुःखात पिचून गेले आहोत असे नाटक त्यांना वठवायचे होते.आपण सैरभैर झाल्याचे नाटक त्यांनी झकास वठविले.त्यांना बेसावध ठेवण्यात ते शंभर टक्के यशस्वी झाले .

शिवराम आणि कंपनीला बेसावध ठेवण्यासाठी त्यानी आणखी एक युक्ती केली.पैसे एका महिन्यात न भरता थोडे थोडे तीन महिन्यांत भरले तरी चालतील मी तोपर्यंत पोलिसांत जाणार नाही  असे तिघाना सांगितले.  

आणखी एक काळजी घेणे त्यांना आवश्यक होते .त्या त्रयीकडून अण्णासाहेबांचा कोणत्याना कोणत्या मार्गाने काटा काढला जाण्याचा संभव होता.  स्वतःच्या संरक्षणाची काळजी घेणे जरूरीचे होते. 

त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी दोन तगडे बाऊन्सर्स नेमले .जेव्हा जेव्हा ते घराबाहेर पडत त्यावेळी ते त्यांच्या सोबत असत.बंगल्याची सुरक्षा व्यवस्था सुद्धा त्यानी कडक केली. यातून दोन गोष्टी साध्य होणार होत्या .ते बाहेर गेले नाहीत त्याचा पुरावा अनेकजणांकडून दिला जाणार होता.जेव्हाजेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार होती त्यावेळी  अण्णासाहेब आपल्या घरात होते हे सांगणारे अनेक जण असणार होते .पोलिसांना त्यांचा संशयही आला नसता.

आता सर्व तयारी झाली होती .मृत्यूदंड प्रत्येकाला कसा द्यायचा त्याचीही योजना तयार झाली होती .

त्यांच्या शयनगृहातील कपड्यांच्या कपाटात एक कळ होती.ती दाबल्याबरोबर कपाटाच्या मागचा भाग भिंतीत सरकत असे.तळघरात जाण्यासाठी जिना होता.तेथून एक भुयार शिवमंदिरापर्यंत होते.  शिवमंदिर त्यांच्या मालकीचे खासगी होते.या भुयाराचा शोधही त्यांना अपघातानेच लागला होता .कपाटात काहीतरी शोधत असताना ती कळ दाबली गेली होती .कपाटाची पाठीमागची फळी सरकल्यावर त्यांना जिना दिसला होता.  त्या जिन्याने ते थेट त्यांच्या खासगी मालकीच्या शिव मंदिरापर्यंत आले होते.याच भुयाराचा वापर ते त्यांच्या कार्यसिद्धीसाठी करणार होते.

(शिवराम)

शिवराम पहाटे  जॉगिंगसाठी  जॉगिंग ट्रॅकवर जात असे.अण्णासाहेबांना शिवरामला तिथेच शिक्षा द्यायची होती .पहाटे ते आपल्या खोलीत नाहीत ही गोष्ट कुणालाही कळणे धोक्याचे होते.हल्ली मला रात्री नीट झोप लागत नाही.पहाटे गाढ झोप लागते .मला सकाळी कुणीही हाक मारू नये अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. जागे झाले तरी ते सकाळी नऊ शिवाय खोलीबाहेर येत नसत .त्यांना पहाटे उठण्याची सवय होती.उठल्याबरोबर त्यांना सकाळी चहा लागत असे .ही गोष्ट सर्वांना माहीत होती.अण्णासाहेब उशिरा उठू लागल्यामुळे सर्व नोकरमंडळी निवांत झाली .पूर्वी सर्वांना सकाळी लवकर उठून अण्णासाहेबांबरोबर धावपळ करावी लागे.

असे सात आठ दिवस गेल्यावर एके दिवशी पहाटे पाच वाजता त्यानी नेहमीप्रमाणे खोलीचा दरवाजा आतून बंद आहे ना हे पाहून भुयारात  प्रवेश केला .निघण्यापूर्वी त्यांनी किंचित वेषांतर केले होते.डोक्यावर टोप(विग) घातला होता.अण्णासाहेबांचे केस विरळ होते .त्यांना जवळपास टक्कल पडले होते.विगमुळे ते निराळेच दिसू लागले होते. त्यानी छोटीशी दाढी लावली होती.आता त्यांना कुणीही ओळखणार नव्हते.

मंदिरातून बाहेर पडून रिक्षाने ते जॉगिंग ट्रॅकवर आले. जॉगिंग ट्रॅकवर विशेष गर्दी नव्हती .जो तो आपल्या रंगात दंग होता .त्यानी शिवरामला हाक मारली .त्यापूर्वी त्यानी दाढी व विग  खिशात ठेवला होता.अण्णासाहेबांना येथे पाहून शिवरामला आश्चर्य वाटले .अण्णासाहेब फिरण्यासाठी सकाळी कधीच बाहेर पडत नसत.अण्णासाहेबानी जरा तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगून शिवरामला कोपऱ्यातील एका बाकाकडे नेले.अण्णासाहेबांना आपल्याजवळ आता काय बोलायचे असेल असा विचार करीत शिवराम  त्यांच्याबरोबर गेला.दोघेही बाकावर बसले .अण्णासाहेब,त्यांची पत्नी सुमन हिच्या आठवणी सांगू लागले.शिवराम ऐकता ऐकता   त्यांचे सांत्वन करीत होता.आपला नूर त्यानी एकदम फिरवला.सुमनच्या हत्येसाठी तुम्ही तिघेही जबाबदार आहात असा थेट आरोप त्यांच्यावर केला.मेकॅनिक मार्फत सैल केलेले ब्रेक, दोघांच्याही हत्येचा  त्यांनी केलेला कट त्याना समजला आहे हेही सांगितले .आर्थिक अफरातफर ,फसवणूक,खून, खुनाचा प्रयत्न,कट यासाठी तुमच्यावर केस करण्याऐवजी मी स्वतःच तुम्हाला शिक्षा देण्याचे ठरवले आहे असेही सांगितले . काहीही अपराध नसताना माझी पत्नी तुमच्या कटाला निष्कारण बळी पडली या गुन्ह्याला माफी नाही . हे सर्व शिवराम अवाक् होउन ऐकत होता. अण्णासाहेब आपल्याला काय शिक्षा देणार याचाच तो विचार करीत होता.अण्णासाहेबांना सर्व काही माहीत झाले आहे. त्यांच्याजवळ त्यासंबंधी पुरावाही आहे . हे ऐकून शिवराम जागच्या जागी थिजून गेला होता.

उजाडू लागले होते .ट्रकवरील गर्दी हळूहळू  वाढत होती.आणखी जास्त वेळ दवडणे धोक्याचे होते.क्षणार्धात त्यांनी खिशातून रेशमी रुमाल काढला.पुरातन काळी ठग आपल्या सावजाचा खून करताना जसा रुमालाचा वापर करीत असत तीच पद्धत अवलंबण्याचे त्यांनी ठरवले होते .रुमालाला गाठ कशी मारावी  क्षणार्धात तो गळ्याभोवती कसा टाकावा याची सवय त्यांनी अगोदरच एक पुतळा पुढ्यात ठेवून  केली होती .अण्णासाहेब काय करणार आहेत हे  शिवरामच्या लक्षात येण्याअगोदर,त्याने काही प्रतिकार करण्या अगोदर,रुमालाचा फास त्याच्या गळ्यात टाकून रेशमी रुमालाने त्याचा जीव घेतला होता.

त्याला तसाच सोडून अण्णासाहेब आपल्या घरी गुप्त मार्गाने परत आले . 

कुणीतरी अज्ञात इसमाने शिवरामला गळ्याभोवती फास टाकून ठार मारले हे उरलेल्या द्वयीला कळले.शिवरामला ठार कुणी मारले असावे याचा त्यांना काहीही अंदाज आला नाही.पोलिस त्यांच्याकडे चौकशी करून गेले .पोलीस अण्णासाहेबांकडेही येऊन गेले.

(कृष्णकांत )

सर्व काही शांत झाल्यावर दोन महिन्यानंतर अण्णासाहेबांनी कृष्णकांतला शिक्षा देण्याचे ठरविले .  

कृष्णकांतची फॅमिली गावाला गेलेली आहे हे पाहून त्यांनी त्याला घरातच गाठण्याचे ठरविले . 

एके दिवशी रात्री आठ वाजता ते कृष्णकांतच्या ब्लॉकवर गेले.अण्णासाहेब  कुणाच्याही घरी निमंत्रणाशिवाय क्वचित जात असत.अण्णासाहेबांना पाहून कृष्णकांतला आश्चर्य वाटले.त्याने त्यांचे स्वागत केले . अनेक विषयांवर दोघेही बराचवेळ गप्पा मारीत होते .अण्णासाहेबांचा चांगला मूड पाहून कृष्णकांतला बरे वाटत होते .अण्णासाहेबांचा आदर सत्कार करण्यासाठी त्याने मोसंबी ज्यूस दोन ग्लासामध्ये आणला .अण्णासाहेबांनी एकाएकी  कटाचा आरोप केला .शिवराम जवळ ते ज्या गोष्टी बोलले होते. त्याच त्यानी कृष्णकांतला सांगितल्या.अण्णासाहेबांना कटविषयक सर्व गोष्टी माहीत आहेत व त्यांच्याजवळ पुरावाही आहे हे ऐकून कृष्णकांत हादरला .

अण्णासाहेबांनी पिण्यासाठी पाणी मागितले .कृष्णकांत आत जावून फ्रिजमधून पाण्याची बाटली व ग्लास घेऊन आला .तेवढ्यात कृष्णकांतच्या ग्लासमध्ये अण्णासाहेबांनी  एक गोळी टाकली होती .गप्पा मारता मारता कृष्णकांतला मूर्छा येऊ लागली .त्यानी त्याला तुझा शेवट जवळ आला आहे .तू केलेल्या पापकर्माची शिक्षा आहे असे सांगितले .अण्णासाहेबांचे बोल एेकता ऐकता कृष्णकांत बेशुद्ध झाला .त्याने डोळे फिरविले. त्याला जोरदार हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्याचा मृत्यू झाला होता.

अण्णासाहेब त्यानी सोडलेला संकल्प  पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेले होते .

त्यानी त्यांच्या ग्लासमधील सरबत पिऊन टाकले.ग्लास विसळला.ग्लासवरील ठसे पुसून टाकले.ग्लास जाग्यावर ठेवला.फ्लॅटचा दरवाजा शांतपणे ओढून घेतला.घरी गुप्त मार्गाने  निघून आले.आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून त्यानी या वेळीही  अर्थातच वेषांतर केले होते.    

महादेव

आपल्या दोन्ही मित्रांचा  कुणीतरी खून केला  हे पाहून महादेव हादरला होता.याच्या पाठीमागे अण्णासाहेब असतील असा त्याला संशयही आला नव्हता. त्या तिघानी आपल्या कर्माने अनेक शत्रू करून ठेवले होते. यातील कुणी खून केला असेल असा विचार तो करित होता.आपण सावधगिरीने वागले पाहिजे अशी खूणगाठ त्याने मारली होती .तो बाहेर जात नसे .फक्त ऑफिसमध्ये जात असे .त्याने संरक्षक ठेवले होते.ही सर्व माहिती अण्णासाहेबांनी काढली होती.

महादेवला कसे गाठावे असा विचार ते करीत होते.  महादेव धार्मिक आहे .दर सोमवारी तो उपास करतो.ठराविक शिवमंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेतल्याशिवाय तो रात्री जेवत नाही.ही माहिती त्यांनी काढली .त्याला शिवमंदिरात गाठण्याचे ठरविले . सोमवारी रात्री साडेसात वाजता ते शिवमंदिरात पोचले .थोड्याच वेळात महादेव मंदिरात आला असता .त्याची ते वाट पहात होते.थोड्याच वेळात महादेव आला.दोन संरक्षक त्याच्या डाव्या उजव्या बाजूला होते .अण्णासाहेबांना पाहून त्याने  त्यांना प्रणाम केला .लोक येत जात होते .शिवमंदिरात गर्दी होती .अण्णासाहेब व महादेव थोडे बाजूला कोपऱ्यात बोलत उभे राहिले  होते.दोघांवरही लक्ष ठेवून दोघांचेही संरक्षक होते.चला देवदर्शन घेऊ या असे म्हणून ते त्याच्या हातात हात घालून गाभार्‍याकडे चालू लागले.चालता चालता त्यांनी महादेवला ,मला व माझ्या पत्नीला ठार मारण्याच्या कटामध्ये तू सहभागी होतास हे मला कळले आहे असे सांगितले .याच कारणासाठी मी शिवराम व कृष्णकांत यांना ठार मारले. त्यासाठीचं  मी तुला शिक्षा करीत आहे. तुम्हा तिघांनाही मारण्याचा मी पण केला होता .असेही सांगितले. महादेवने पळण्याचा प्रयत्न केला.  गर्दीमध्ये तो पळू शकला नाही.अण्णासाहेबांनी त्यांच्या हातात   टोकाला विष लावलेली सुई सुरुवातीपासून पकडली होती .ती त्यांनी महादेवला टोचली . महादेवला  कांहीतरी टोचल्याचा भास झाला. विषाचा परिणाम सावकाश होणार होता .महादेव  आपल्या पायांनी चालत घरी गेला .

घरी गेल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले .नंतर त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले .विषाचा जसा परिणाम होत होता तशी त्याची प्रकृती जास्त बिघडत जात होती.त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.डॉक्टरांची उपाययोजना चालू असतानाच त्याला मृत्यू आला .

शवविच्छेदन करण्यात आले. विषाचा पत्ता लागला नाही.हृदय विकाराच्या झटक्याने  मृत्यू असा अहवाल आला. 

अण्णासाहेबांनी त्यांचे कार्य पूर्ण केले होते .

*महादेवच्या मृत्यूची बातमी ऐकली त्या रात्री ते समाधानाने शांतपणे झोपले.*

* दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजले तरी त्यानी दरवाजा उघडला नाही.*

*पोलिसांना बोलवण्यात आले .*

*दरवाजा बळाने उघडण्यात आला .*

*अण्णासाहेब चिरनिद्रेत होते.*

*सुमनला भेटण्यासाठी ते निघून गेले होते.*  

(समाप्त)

३१/८/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel