(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

त्या मोकळ्या रानमाळावर प्रतीक एकटाच बसला होता.समोर हिरवेगार बारीक गवत लांबवर पसरलेले होते .पाऊस नुकताच पडून गेला होता .क्षितिजावर तुरळक काळे व पांढरे ढग होते.प्रतीकच्या पाठीमागे घनदाट आमराई होती .शहरातून या मोकळ्या माळरानावर यायला आमराईतून वाट होती. आमराईतून बऱ्याच वेळा दोघे हातात हात घालून येत व येथे येऊन बसत असत.आज तो एकटाच होता .आज साधना येणार नव्हती .आजच काय कदाचित पुढे कधीही ती येणार नव्हती . महिन्याभरापूर्वीच्या भेटीत तिने ते सांगितले होते .तिचा नाईलाज होता .

त्याला तिची पहिली भेट आठवली.वर्ष झाले असावे.असेच पावसाळी दिवस होते .तो ऑफिसात चालला होता.त्याच्या पुढे एक मुलगी चालत होती .तेवढ्यात अकस्मात पाऊस सुरू झाला .तिने आपल्या पर्समधील छत्री काढली व ती उघडू लागली .बरेच दिवस न वापरल्यामुळे छत्रीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा .छत्री उघडत नव्हती. ती भिजत होती.तिने आसपास कुठे शेल्टर आहे का ते पाहिले परंतु कुठेही आसरा मिळण्याची शक्यता नव्हती .

एवढय़ात तो पुढे झाला आणि त्याने आपली छत्री तिच्यावर धरली .त्याने अदबीने आपल्याला कुठे जायचे आहे असे विचारले.तिने एकदा त्याच्याकडे रोखून पाहिले त्याच्या प्रामाणिकपणाची तिला त्याच्या नजरेतून खात्री पटली. तिने एलआयसी ऑफिस म्हणून सांगितले .तोही त्याच ऑफिसमध्ये काम करीत होता .त्याने तिला ऑफिसपर्यंत आपल्या छत्रीतून नेले.त्यानेही मी याच ऑफिसमध्ये काम करतो म्हणून सांगितले .ती अकाऊंट्स डिपार्टमेंटला होती तर हा फायनान्स डिपार्टमेंटला होता .निरनिराळ्या मजल्यावर ही डिपार्टमेंट्स होती .तो तिथे आज दोन वर्षे होता तर ती नुकतीच लागली होती .

पावसात झालेली ओळख हळूहळू पुढे वाढत गेली .दोघेही एकाच बसने येऊ लागली.ऑफिसमध्ये येताना एकच बस शक्य झाली नाही तरी परत जाताना मात्र दोघेही एकाच बसने जात असत.दुपारी तो कॅन्टीनमध्ये लंच घेत असे.तो इथे एकटाच राहात होता .ती घरून डबा आणीत असे .तो एकटाच लंच घेतो हे पाहिल्यावर तिने त्याच्यासाठीही मधूनमधून एखादा पदार्थ  आणायला सुरुवात केली. ज्या दिवशी ती एखादी डिश आणीत असे त्या दिवशी ती त्याला मी तुझ्यासाठी खास डिश आणली आहे आपण बरोबरच जेवू असे सांगत असे . सुरुवातीला त्याला संकोच वाटे परंतु हळूहळू त्याचा संकोच दूर होऊ लागला . तिचा मनमोकळा स्वभाव त्याला आवडला होता .तिच्या आतबाहेर काही नव्हते. तिचा स्वभाव रोखठोक होता. 

ऑफिस संपल्यावर सुरवातीला तो तिला कॉफी घेण्याचा आग्रह करीत असे .ती चहा घेत नाही कॉफी घेते हे त्याला माहीत झाले होते .तोही हळूहळू तिच्या बरोबर कॉफी घेऊ लागला होता .तिला केवळ दुधाची, नेसकॅफे घालून कॉफी आवडत असे .तोही हळूहळू तिच्या बरोबर तशीच दुधाळ कॉफी पिऊ लागला . हळूहळू दोघेही एकमेकांबरोबर लंच व ऑफिस सुटल्यावर एकत्र एखादी डिश व कॉफी घेऊ लागले .नंतर त्यांचे एकत्रच घरी जाणे होई .ती वाटेत बसमधून उतरून जाई.

त्याला पगार चांगला होता .तो ऑफिसर्स पोस्टवर होता .त्याने मोटार घेण्याचे ठरविले .त्याने संध्याकाळी ड्रायव्हिंग क्लास सुरू केला होता .थोड्याच दिवसात त्याने मोटार घेतली. त्याला सरप्राइज द्यायचे होते.मोटारीचे तो तिच्याजवळ बोलला नव्हता . एक दिवस तो मोटार घेऊन बस स्टॅंडवर आला .ती बसची वाट पाहत उभी होती .मोटार थांबवून त्याने हॉर्न दिला.असेल कुणीतरी म्हणून तिने तिकडे दुर्लक्ष केले .त्याने हात बाहेर काढून साधना म्हणून हाक मारली .त्याचा आवाज लगेच ओळखून तिने चमकून तिकडे पाहिले .तो मोटारीत पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला .धावतच ती मोटारीत येऊन बसली .त्या दिवसापासून दोघेही बरोबरच मोटारीतून ऑफिसमध्ये जात व परत येत असत .तो तिला सोडून  पुढे घरी जात असे.

दोघेही हळूहळू बरोबरच सिनेमाला जाऊ लागली .मधून मधून ती घरी उशिरा येईन ऑफिसमध्ये ज्यादा काम आहे असे सांगून त्याच्याबरोबर संध्याकाळी फिरायला जाऊ लागली .शहरापासून जरा दूर असलेले हे माळरान त्यांची आवडती फिरण्याची जागा होती .माळरानाकडे येण्याला रस्ता नव्हता.आमराईतून केवळ पायवाट होती . दोघेही आमराई पलीकडे मोटार पार्क करून आमराईतून पायवाटेने हातात हात घालून गप्पा मारीत या माळरानावर येऊन बसत असत .इथे वाहणारा मंद वारा चित्त उल्हसित करीत असे. असेच काही हौशी प्रेमिक किंवा इतर इकडे येत असत .शहरातील बागेसारखी किंवा जॉगिंग ट्रॅक सारखी इथे गर्दी नसे.दोघांनाही इथला एकांत, शांतता व माळरानावरील सौंदर्य आवडत असे.संध्याकाळी सूर्यास्त होताना पश्चिमेला मनोरम चित्र दिसे .ढग असल्यास त्यांचे चित्रविचित्र आकार त्यावर पडलेले सूर्यकिरण मनोहारी दृश्य मालिका  दाखवत असत .

दोघांचाही स्वभाव तसा थोडा अबोल होता .तरीही त्यांच्या एकमेकांबरोबर खूप गप्पा होत असत .परंतु काही वेळा स्तब्ध शांत बसून एकमेकांच्या हातात हात गुंफून त्या जवळकीचा त्या प्रेमाचा त्या उबेचा आस्वाद घेण्यात दोघेही मग्न असत .रात्र झाली चांदण्यात चमकू लागल्या की मग दोघे परत फिरत असत.

त्यांच्या मित्र मैत्रिणीनी या दोघांची  परस्पर मग्नता पाहून  दोघे विवाह बंधनात अडकणार हे केव्हाच ओळखले होते .आपल्याला केव्हां पत्रिका देतात त्याची ते वाट पाहात होते.दोघांपैकी कुणीही दुसर्‍याला  प्रपोज केले नव्हते.मनाची मनाशी गाठ पडली. एका हृदयाचे मर्म दुसर्‍या हृदयाने ओळखले. त्यात आणखी काय प्रपोज करायचे असे दोघेही मनोमन धरून चालले होते .

आता फक्त दोघांनी आपल्या घरी त्यांचे गुपित उघड करायचे होते .घरून परवानगी मिळेल याची दोघांनाही खात्री होती .जात धर्म वय पैसा हुद्दा कशाचीच अडचण येण्याचे कारण  नव्हते. 

एक दिवस त्या दोघांनी आपापल्या घरी सांगायचे ठरविले .त्याने आपल्या आई वडिलांना  फोन केला.त्याचे वडिलांशी  मित्रासारखे  संबंध होते . त्याने आई वडिलाना सर्व हकीगत  सांगितली.मोबाइलवर फोटोही पाठवून दिला .आई वडिलांनी संमती दिली .फक्त ते एवढेच म्हणाले की आम्ही दोघे तिकडे येऊ .एकदा तिच्या आई वडिलांना भेटू आणि मग सर्व काही निश्चित करू.

* थोडक्यात त्याच्या आई वडिलांची कोणतीही हरकत नव्हती.*

*सर्व काही रीतीप्रमाणे व्हावे एवढेच त्यांचे म्हणणे होते.त्यात काहीच गैर नव्हते .*

*प्रतीकला माळरानावर बसून क्षितिजाकडे  पाहताना वरील सर्व गोष्टी आठवत होत्या.*

*त्याची स्मरणमालिका पुढे चालू झाली .*

(क्रमशः)

७/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel