(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

आज मकरंद लवकर घरी आला होता .फॅक्टरी सुटल्यावर तो संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत घरी येत असे .तो नेहमी सायकलने ये जा करीत असे .सायकलने अर्धा पाऊण तास वेळ सहज लागत असे.मित्र ट्रॅफिक जॅम यामध्ये आणखी काही वेळ जात असे .

आल्या आल्या त्याने डोक्याला अमृतांजन चोळले आणि एक घट्ट रुमाल  बांधला.सुषमाला त्याने  कडक चहा करायला सांगितला.चहा पिताना सुषमाने आज लवकर कां आले म्हणून विचारले .त्यावर त्याने दुपारपासून डोके भयंकर दुखत आहे. असह्य झाल्यामुळे परवानगी काढून मी घरी आलो असे सांगितले .गेले तीन चार महिने मकरंदचे डोके अधूनमधून दुखत होते .परंतु आजच्या सारखा ठणका अजूनपर्यंत कधीही लागला नव्हता . पेनकिलर गोळी घेतली की जरा कमी होई किंवा केव्हा पूर्ण थांबे.रोजच दुखत असे असे नाही .तीन चार दिवसांनी किंवा कधी एका आठवडय़ाने  दुखत असे.डॉक्टरांनी स्कॅनिंग करा म्हणून सांगितले होते परंतु मकरंद टाळाटाळ करीत होता .सुषमाच्या मनात नाही नाही त्या शंका येत होत्या .मकरंद उठला की त्याला आज डॉक्टरांकडे नक्कीच घेऊन जायचे असे तिने ठरविले .

मकरंद व सुषमा यांचा विवाह होऊन पंधरा वर्षे झाली होती .मकरंद एका मोटार निर्मितीच्या कारखान्यात काम करीत होता .त्याला बर्‍यापैकी पगार होता . एक मुलगा व ही दोघे असा तिघांचा टुमदार संसार होता.सुषमा बारावी पास झाली होती .एवढ्या कमी शिक्षणावर तिला कुठे चांगली नोकरी मिळणे शक्य नव्हते .ती घर सांभाळीत असे.गृहिणीची भूमिका उत्कृष्ट प्रकारे संभाळीत असे.दिवसभर नोकरी करणाऱ्या बऱ्याच बायका असतात त्यांना आपली मुले कुठे ठेवावी असा स्वाभाविक प्रश्न पडतो.मुलांचे बालवाडी किंवा शाळा यात काही तास जातात .उरलेल्या वेळासाठी जिथे मुलांवर संस्कार चांगले होतील,जिथे मुलांना दुपारी व्यवस्थित खायला प्यायला मिळेल,जिथे मुले खात्रीशीर  घरच्यासारखी आनंदाने राहतील,अश्या एखाद्या जागेची गरज अश्या स्त्रियांना वाटते .अशी काही मुले सुषमा सांभाळीत असे .तीनपेक्षा जास्त मुले सांभाळायची नाहीत अशी तिने मर्यादा घालून घेतली होती .जास्त मुले म्हणजे  गडबड गोंधळ ,स्वतःवर जास्त ताण,स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष , आणि कुठल्याच मुलाकडे नीट लक्ष दिले जात नाही असा तिचा अनुभव होता .कमी मुले असली की प्रियदर्शनच्या(मुलाच्या) अभ्यासाकडेही तिला व्यवस्थित लक्ष देता येई.प्रियदर्शनकडेच काय परंतु  सर्वांकडेच व्यवस्थित लक्ष देता येई.

तिचा संसार तसा ठीक चालला होता .मिळणार्‍या  पगारामध्ये त्यांचे व्यवस्थित भागत असे.त्यांचे घर कनिष्ठ मध्यमवर्गीय होते असे म्हणता येईल .मुले सांभाळून मिळणाऱ्या पैशातून तिने हळूहळू एकेक वस्तू जमा केली होती.विशेषत: तिला मिळणाऱ्या पैशांच्या जोरावरच घेतलेल्या ब्लॉकचे हप्ते जात होते.घरखर्चातून वाचविलेल्या पैशातून तिने एक दोन दागिन्यांची भर तिच्या जवळ  असलेल्या दागिन्यांमध्ये घातली होती. मध्यमवर्गीयांकडे असलेल्या सर्व गोष्टी फ्रीज मिक्सर गॅस टीव्ही सोफा वगैरे तिच्याकडे होत्या.हप्ते फिटल्यावर ब्लॉक स्वतःच्या मालकीचा झाला असला.  

असे सर्व कांही छान चाललेले असताना विशेष काही मोठ्या इच्छा नसतांना अकस्मात हे मकरंदचे दुखणे उद्भवले होते .

मकरंद उठल्यावर संध्याकाळी दोघेही प्रथम स्कॅन करण्यासाठी गेली.रिपोर्ट घेऊन नंतर डॉक्टरांकडे गेली .रिपोर्ट पाहून डॉक्टरांचा चेहरा थोडा गंभीर झालेला वाटला .त्यांचा गंभीर चेहरा पाहून सुषमाच्या हृदयाचा एक ठोका चुकला .डॉक्टरनी लहान मेंदू जवळ एक गाठ आहे तिचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले.  ट्यूमर वाढत आहे असे सांगितले.डॉक्टरनी चिठी  देऊन त्यांना एका मोठ्या प्रख्यात सर्जनकडे पाठविले.  

त्या सर्जननी आणखी काही टेस्ट करायला सांगितल्या .सर्व रिपोर्ट पाहिल्यावर त्यानी ऑपरेशन करावेच लागेल व शक्य तितक्या लवकर करावे तितके चांगले असे सांगितले . ऑपरेशनचा खर्च विचारता त्यांनी सुमारे पाच लाख रुपये खर्च येईल असे सांगितले .खर्चाचा आकडा ऐकूनच दोघेही हबकून गेली.त्यांच्याजवळ बँकेत तीस चाळीस हजार रुपये नगद होते.निरनिराळ्या मार्गाने कर्ज, एफडीआर एनकॅश करणे, इत्यादी मार्गानी तीन लाख रुपयांपर्यंत जमा करता येतील असे त्यांच्या लक्षात आले . डॉक्टरनी पाच लाख रुपये अंदाज दिला म्हणजे आपल्याला एखाद्या  लाख रुपयांची जास्त व्यवस्था केली पाहिजे .एवढे तीन लाख रुपये कुठून आणायचे असा दोघांसमोर प्रश्न होता. सुषमाच्या माहेरची परिस्थिती बेतास बात असल्यामुळे तिकडून काही मदत होणे शक्य नव्हते.तिच्या थोरल्या बहिणीची आर्थिक स्थिती भक्कम होती परंतु तिच्या जवळ पैसे मागावे असे त्यांना वाटत नव्हते.नाती टिकवायची असतील तर नात्यात शक्यतो आर्थिक व्यवहार असू नयेत अशा मताची ती दोघे होती .मकरंदचा थोरला भाऊ जरा संपन्न होता परंतु त्याच्याकडेही पैसे मागावेत असे त्याला वाटत नव्हते.पुन्हा डोक्याचे मेंदूचे ऑपरेशन काय होईल कसे होईल पूर्णपणे बरे वाटेल की नाही सगळ्याच काळज्या व चिंता.

डॉक्टरनी लवकर निर्णय घ्या असे सांगितले होते. दिवस जातील तसतसा ट्युमर वाढत जाईल आणि ऑपरेशन जास्त बिकट होत जाईल म्हणून सांगितले होते .जर ऑपरेशन अयशस्वी झाले तर मकरंदच्या जिवाला धोका होता अश्या परिस्थितीत सुषमाला एकट्याला आयुष्य काढावे लागले असते. हीही एक मोठी  काळजी होती .क्षणात सुषमाने निर्णय घेतला आपले सर्व दागिने विकून टाकायचे किंवा  ते गहाण टाकून कर्ज मिळाले तर घ्यायचे असे तिने ठरविले .

अश्याप्रकारे शेवटी पैसे गोळा झाले.ऑपरेशन यशस्वी झाले .मकरंद तीन महिने विश्रांती घेऊन  फॅक्टरीत कामावर  रुजू झाला .सर्व काही ठीक झाले फक्त सुषमा लंकेची पार्वती झाली.मंगळसूत्रातील काही मणी सोडले तर तिच्या अंगावर काहीही सोने राहिले नाही.

सर्व काही ठीक चाललेले असताना लग्नाची एक पत्रिका आली .तिच्या सख्ख्या पुतणीचे लग्न ठरले होते.मकरंदचा थोरला भाऊ सुस्थितीत होता.दोघा भावांचे एकमेकांकडे विशेष येणे जाणे नव्हते.याला कारण थोरल्या भावाची बायको होती .ती श्रीमंतांच्या घरची असल्यामुळे तिला आपण श्रीमंत असल्याचा गर्व होता .थोरल्या भावाकडे ऑपरेशनसाठी पैसे न मागण्याचे वहिनी हेही एक कारण होते .

लग्नाला जायचे म्हणजे अंगावर चार दागिने असणे आवश्यक होते .नाही तर जाऊबाईनी व तिच्या  माहेरच्यांनी कुसके बोलून तिला नको नकोसे केले असते.तिचे दागिने गहाण पडले होते .कर्ज फेडल्याशिवाय दागिने परत मिळणे शक्य नव्हते.लग्नाला जाणे आवश्यक होते .ती गेली नसती तर तिकडून बोलून बोलून तिचे भुस्कट पाडले असते.तिलाही आपण चांगले दिसावे ,चार दागिने अंगावर असावेत, आपला संसार छान चालला आहे असे सर्वांना वाटावे, लग्नामध्ये पैठणी नेसून चार दागिने अंगावर घालून मिरविता यावे असे स्वाभाविकपणे वाटत होते.

तिला काय करावे ते लक्षात येत नव्हते .आणि तिला आपल्या बहिणीची आठवण झाली.दोघी बहिणींचे लहानपणापासून परस्परांशी मेतकूट होते .तिची थोरली बहीण सुस्थितीत होती. तिचे सासर श्रीमंत होते तिच्याजवळ खूप दागिने होते .विविध प्रकारचे विविध धाटणीचे अनेक दागिने  तिच्याजवळ होते.ती तिच्याकडे कधी तरी गेलेली असताना तिने ते आपले भांडार तिला दाखविले होते. तिच्याकडे जाऊन चार दागिने घेऊन यावेत असे तिच्या मनात आले .तिच्याकडे काही कार्य असले, तिला कुठे जायचे असले, तरी तिच्या जवळ नेहमी घालण्यासाठी आणि समारंभांमध्येही घालण्यासाठी भरपूर दागिने होते .

ती एक दिवस आपल्या बहिणीला भेटायला गेली .बहिणीला तिने सर्व परिस्थिती सांगितली.बहिणीने तिच्या पुढ्यात तिचे सर्व दागिने ठेवले.तुला जे हवे असतील ते खुशाल घेऊन जा म्हणून सांगितले .चपला हार कानातील हिर्‍यांच्या कुड्या आणि आणखी एक दोन दागिने घेऊन ती परत आली.

पुतणीचे लग्न व्यवस्थित पार पडले .ती लग्नात व्यवस्थित मिरवली .तिच्या चपलाहाराचे तर सर्वांनीच पुन्हा पुन्हा कौतुक केले.केव्हा केला ?किती तोळ्यांचा? कुणाकडे घेतला ?तुला फारच खुलून दिसतो?वगैरे चौकशाही झाल्या .तिच्या चपलाहारामुळे सर्वजण तिच्याकडे पुन्हा पुन्हा वळून पाहात होते .तिच्या अंगावर मूठभर मांस चढले .हिच्या नवऱ्याचे एवढे मोठे ऑपरेशन नुकतेच झाले.ही नोकरी करीत नाही .हिच्या नवऱ्याला चांगला पगार मिळत असला पाहिजे.वगैरे कुजबूजही तिच्या कानावर पडली .तिची जाऊही तिच्याकडे असूयेने  पाहात होती .जे आपल्याला जमले नाही ते हिला कसे काय जमले असे प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर व डोळ्यात दिसत होते.चपलाहारामुळे सर्व बायकांमध्ये सुषमा उठून दिसत होती .एकंदरीत सुषमा आपले जबरदस्त इम्प्रेशन सर्वांवर पाडून परत आली.

चार दिवसांनी  बहिणीकडे जाण्यासाठी तिने दागिन्यांची कपाटात ठेवलेली पेटी काढली . तिच्यात हार नव्हता 

( क्रमशः)

१६/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel