(पुढील कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कुणालाही साधर्म्य वाटल्यास तो योगायोग समजावा )        

लहानपणी वाचलेली एक गोष्ट मला आठवते . गावातील आठ दहा  लोक एकत्रित यात्रेला गेले होते.वाटेत त्यांना वाळवंटातून प्रवास करावा लागला .त्यांच्या जवळील पाण्याचा साठा संपून गेला.जवळजवळ मरणोन्मुख झाल्यावर त्यांना एक विहीर लागली .त्यांच्या जवळ पाणी पिण्यासाठी भांडे नव्हते .पाणी शेंदण्यासाठी काहीही साधन नव्हते .उपरण्याला उपरणे बांधून व जोड्याचा भांडे म्हणून वापर करून त्यांनी पाणी शेंदले. त्या दहाजणांतील नउजण जोड्याच्या साहाय्याने  पाणी प्याले .दहावा कर्मठ असल्यामुळे तो पाण्याशिवाय राहिला .आपल्या गावी पोचल्यावर नऊ जणांना असे वाटू लागले की जर याने आम्ही चामड्याच्या जोड्याने पाणी प्यालो हे सांगितले तर लोक आम्हाला वाळीत टाकतील.  त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली .गावात पोचल्यावर सर्वांना याने जोड्याने पाणी प्याले असे सांगितले.परिणामी त्या नऊ जणांचे बोलणे सत्य मानून या एकाच्या बोलण्याकडे लक्ष न देता लोकानी त्याला वाळीत टाकले .

तात्पर्य :प्रवाहाविरुद्ध जाऊ नये .चार लोक जसे वागतील तसे वागावे.पाचामुखी परमेश्वर असे जरी म्हणत असले तरी बहुमत नेहमीच योग्य असते असे नाही. 

ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे  माझा मित्र मनोज याच्या बाबतीत घडलेली गोष्ट होय.

मनोज हा लहानपणापासून साधा सरळ प्रामाणिक मुलगा होता .तो सत्यवचनी होता .चिमणरावांचे सत्याचे प्रयोग त्याला वाचायला देऊनही त्याच्यात काहीही बदल झाला नव्हता.तो स्वतः जसा कधीही खोटे बोलत नसे त्याचप्रमाणे दुसऱ्या कुणीही खोटे बोललेले त्याला आवडत नसे.कधी कधी सत्य बोलणे योग्य असतेच असे नाही .एखादा मनुष्य मरणोन्मुख असेल आणि त्याला आपण भेटायला गेलो तर  त्याला तू थोडेच दिवसात मरणार आहेस असे सत्य सांगणे बरोबर ठरेल काय? एखादा मनुष्य आपल्याला आवडत नसेल तरीही त्याला तसे तोंडावर सांगणे उचित ठरणार नाही.त्याच्याकडून आपल्याला त्रासही होऊ शकतो . त्याच्याकडून होणारे आपले एखादे काम होणार नाही .जर कोणाचीही हानी होणार नसेल आणि जर एखाद्याला बरे वाटणार असेल तर लटके पण नेटके या नियमानुसार खोटे बोलण्याला हरकत नाही असे बर्‍याच  जणांचे म्हणणे आहे.दुसऱ्या कुणालाही त्रास न होता जर एखाद्याचा फायदा होणार असेल तरीही खोटे बोलायला हरकत नाही .समजा एखाद्या खाटिक सुरा घेऊन गायीच्या मागे लागला आहे त्याने आपल्याला गाय कुठे गेली असे विचारले आपल्याला गाय उजव्या बाजूला गेली हे माहित आहे तरीही जर आपण ती डाव्या बाजूला गेली असे सांगितले तर ते असत्यही योग्य ठरणार नाही काय?  आपण खरे सांगणे योग्य ठरेल का?अशा प्रकारची अनेक उदाहरणे देता येतील . खरे बोलणे स्पष्टवक्तेपणा याला मर्यादा असतात .एवढेच काय तर प्रत्येक चांगल्या व वाइट गोष्टीला मर्यादा असतात . सत्य असत्य खरे खोटे चांगले वाईट अशा प्रत्येक द्वंदामध्ये प्रत्येकाला मर्यादा असतात. मनोजला हे तत्वज्ञान मुळीच पटत नसे .तसेच लाचलुचपतीबद्दल बातमी वाचली की त्याचे डोके तडकत असे .लाच देणे आणि लाच घेणे या दोन्ही गोष्टी बद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता . या गोष्टींबद्दल तो नेहमी तावातावाने बोलत असे.काही लोक व्यावहारिक असतात तर काही जण एकांगी असतात.अव्यावहारिक असतात. मनोज दुसऱ्या प्रकारातील होता आणि हट्टीही होता . 

असा हा आमचा मनोज एमपीएससीची परीक्षा पास झाला .त्याला सरकारी खात्यामध्ये चांगल्या पगारावर नोकरी लागली. एका ऑफिसमध्ये त्याला प्रमुख पदी नेमण्यात आले.स्वतंत्र केबिन मिळाली. त्याने आपला सत्य वचनी व लाचलुचपतविरोधी नारा इथेही चालू ठेवला .

ज्यावेळी कंट्रोल राज्य होते त्या वेळची गोष्ट आहे .उत्पादन उपभोग आयात निर्यात प्रत्येक गोष्टींवर जवळजवळ प्रत्येक वस्तू व सेवेवर नियंत्रण होते .सरकारी खात्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागे.रेशनिंग चालू होते.साखर तांदूळ गहू प्रत्येक गोष्ट नियंत्रणात होती.कच्चा माल पक्का माल प्रत्येक गोष्टींवर सरकारी नियंत्रण होते.

आपला हा मनोज इम्पोर्ट लायसन्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होता .दर सहा महिन्याला असंख्य वस्तू आयात करण्यासाठी लायसन्स घ्यावे लागे.प्रत्येक उत्पादन करणाऱ्या युनिटला मग ते उत्पादन वस्तूंचे असो किंवा सेवेचे असो परवाना घ्यावा लागे. त्यासाठी अगोदरच योग्य त्या सरकारी डिपार्टमेंटकडे अर्ज करावा लागे.अर्ज आल्यानंतर ते अर्ज अनेक इन्स्पेक्टर्स मध्ये वाटले जात.अर्जामध्ये तुमचा उद्योग किंवा व्यवसाय यासंबंधी बरीच माहिती द्यावी लागे.ती सर्व माहिती तपासून खरी आहे की नाही ते पाहून त्यावर आधारित शिफारसी करण्याचे काम इन्स्पेक्टरचे असे .प्रथम ज्युनिअर इन्स्पेक्टर्स नंतर सिनियर इन्स्पेक्टर्स नंतर डिपार्टमेंटल हेड नंतर डायरेक्टर अशा चाळणीमधून उद्योग किंवा व्यावसायिकाचा अर्ज व शिफारशी जात असत .या प्रक्रियेमध्ये दोनतीन महिने सहज जात. आयात परवाना उत्पादन परवाना फक्त सहा महिन्यांसाठी मिळे.पुढच्या सहा महिन्यांसाठी पुन्हा अर्ज पुन्हा सर्व चाळणीतून जावे लागे.यामुळे उद्योगांची वाढ होत नव्हती. सर्व व्यावसायिक त्रासून गेले होते.उत्पादनावर व्यवसायावर उद्योगावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सरकारी बाबूंना पटविण्यात त्यांचे समाधान करण्यात त्यांची अर्धी ताकद खर्च होत असे .

अर्जदारांची प्रवृत्ती सर्व आकडेवारी फुगवून सांगण्याकडे असे.त्याला कात्री लागत लागत शेवटी काही आकाराचा परवाना अर्जदाराच्या हातात पडे.ही सर्व प्रक्रिया थोडीशी सविस्तर सांगण्यामागचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेलच .आपले काम लवकर व्हावे आपले कागदपत्र जास्त तपासले जाऊ नयेतआपल्याला जास्त त्रास दिला जाऊ नये , यासाठी प्रत्येक अर्जदार प्रयत्न करीत असे.थोडक्यात लाच दिली जात असे.जेवढ्या किमतीची आयात करायची असे त्यातील काही टक्के या कामासाठी राखून ठेवले जात .हा पैसा निरनिराळ्या स्तरांवर वाटला जात असे.खाते म्हणजे जिथे ते सतत खात असते ते असे विनोदाने म्हटले जात असे .या अर्थाने काही सरकारी खाती फारच खाती पिती असत तर काही कमी किंवा मुळीच नाही अशा स्वरूपात असत.

अशा या अंतर्बाह्य़ बरबटलेल्या खात्यामध्ये आपला साधासुधा  निर्मळ मनोज  नोकरीला लागला .येथील पैशांची प्रचंड उलाढाल पाहून तो स्तंभित झाला .त्याच्या स्वभावानुसार आपण लाच घ्यायची नाही .शक्यतो दुसऱ्याला लाच घेऊ द्यायची नाही.  लाच देणाऱ्याला त्यापासून परावृत्त करायचे .असा धडाका त्याने सुरू केला .जिथे साध्या प्यून पासून मोठ्या साहेबांपर्यंत वजन ठेवल्याशिवाय कागदपत्र सरकत नसत,फायली हलत नसत कोणतेही काम होत नसे,त्या ठिकाणी हा पठठ्या रामराज्य आणण्याचा प्रयत्न करीत होता.सर्वस्वी संपूर्ण  अशक्य असा हा प्रयत्न होता.मनोज कुणाकडूनही लाच घेत नसे .कोणताही कागद किंवा फाईल अडवून ठेवीत नसे.आणि शक्यतो दुसऱ्यांना अडवू देत नसे. खाऊ देत नसे.न खाउंगा न खाने दूंगा असा त्याचा नारा होता. एमपीएससी मधून उत्तम गुण मिळवून आल्यामुळे तो वरच्या पदावर होता.

त्याचा प्रामाणिकपणा निस्पृहता सचोटी कामाचा अावांका धडाडी सर्व स्टाफला खड्याप्रमाणे काट्याप्रमाणे सलू लागली होती . कुणालाही काहीही खाणे मुश्किल झाले .खायचे नाही तर जगायचे कसे असे प्रत्येक जण म्हणू लागला.खायला न मिळाल्यामुळे प्रत्येकजण पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखा तडफडू लागला. आपण बदललो तर ती जग बदलण्याची सुरुवात असेल अशा मताचा मनोज होता .स्वतः योग्य मार्गावर राहावे व इतरांना योग्य मार्गापासून ढळू देउ नये असा त्याचा नारा होता. हा त्याचा नारा सर्वांना मुळीच पसंत नव्हता. 

हा काटा जर वेळीच दूर केला नाही तर तो खोलवर रुतून बसेल आणि मग तो काढणे कठीण होऊन बसेल असे सर्व स्टाफचे मत होते.याला दूर केले पाहिजे फक्त कसे करावे एवढाच प्रश्न होता.अँटी करप्शन ब्यूरोकडून लाचलुचपतविरोधी खात्याकडून याला अडकविला पाहिजे. अशा निर्णयावर शेवटी सर्व आले.त्याशिवाय या सर्वांना मनसोक्त चरणे हुंदडणे शक्य झाले नसते.

*शेवटी सर्वांच्या मताने एक योजना आखण्यात आली*

(क्रमशः)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel