वंदन

मी वंदितो पदरजे विनये तयांची
ज्यांची मने विमल सुंदर सोनियाची
जे संकटास न भिती न जयास पाश
आशा सदैव अमरा न कधी उदास।।

कार्ये करून, वदती न कधी मुखाने
उत्साहमूर्ति मति सांद्र दयारसाने
जे ठेविती निजसुखावरती निखारा
त्या वंदितो नरवरा विमला उदारा।।

स्वार्थी खरोखर तिलांजलि देउनीया
संतोषवीत पर कष्टहि सोसुनीया
श्रद्धा जया अविचला रघुनाथपायी
माझी नमून मति जात तदीय ठायी।।

ज्या मोह ना पडतसे पदवीधनांचा
ज्या धाक ना कधि असे रिपुच्या बळाचा
अन्याय ना कधि बसून विलोकतील
ते वंदितो नरमणी गुणि पुण्यशील।।

ना पाहतील नयनि कधि सत्यखून
ना दीनभंजन तसे बघती दुरुन
जाळावयास उठती सगळा जुलूम
ऐशा नरांस करितो शतश: प्रणाम।।

त्यांच्यापरी मति मदीय विशुद्ध राहो
त्यांच्यापरी हृदय कष्टदशास साहो
त्यांच्यापरी परहितास्तव मी झिजावे
त्यांच्यापरी जगि जगून मरुन जावे।।

-अमळनेर, छात्रालय १९२७

मदीय त्या नमस्कृती


विशुद्ध भाव अंतरी
कृती उदार यत्करी
सदैव जो असे व्रती
मदीय त्या नमस्कृती।।

न पापा यन्मना शिवे
शिवे तरी झुरे जिवे
करी सदा निजोन्नती
मदीय त्या नमस्कृती।।

परोपकार आवडे
स्तुती जयास नावडे
सुनिर्मळा सदा मती
मदीय त्या नमस्कृती।।

सदैव ईश्वरस्मृती
स्वदेशकारणी रता
तयास वर्णु मी किती
सदैव त्या नमस्कृती।।

-अमळनेर, छात्रालय १९२८

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel