आई, दार उघड

किती धडपडलो किती भागलो मी। किती श्रमलो यावया तुझ्या धामी
किती रडलो मी सतत धायिधायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

तुझ्या पायांशी देइ आस-याला। नको दूर करु आई वासराला
तुझ्या पायांविण काहि नको पाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

मला भिवविति हे वृक व्याघ्र घोर। मला घाबरविति उग्र दुष्ट चोर
खाऊखाऊ करितात धीर नाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

थंडिवा-याचा बाळ उभा दारी। सकळ थरथरते अंग बघे भारी
घेइ पोटाशी ऊब मला देई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

ठेव मजला तू निजवुनी कुशीत। मला अंगाई गाइ गोड गीत
कितिक जन्मावधि झोप मला नाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

अमित जन्मांची लागली तहान। कसे तडफडती प्राण हीन दीन
तव प्रेम- पयोधर गोड देई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

तुला करुणेचा बोलतात सिंधु। मला का देशी एकही न बिंदु
मीच नावडते पोर सांग कायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

अनेकांना तू सतत पावलीस। परी मजवरती का ग कावलीस
तुझ्यावीणे आधार अन्य नाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

अनेकांना तू देशि साउलीस। का ग माऊली! मजवरी रुसलीस
तुझ्यावीण मला ओस दिशा दाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

बाळ दारी रडतसे दीनवाणा। तुला ये ना का आज प्रेमपान्हा
कसे आईचे हृदय कठिण होई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

चकोराते तो आइ! असा इंदु! चातकाला तो जेवि नीरबिंदु
तुझे दर्शन मज तसे प्राणदायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

बोल माझ्याशी,आइ! एक बोल सुधा- सागरकल्लोळ
तुझा शब्द मला नवप्राणदायी। दार उघड अता,आइ! जीव जाई।।

आइ! गेले हे खोल किती डोळे। तुझ्यासाठी मत्प्राण हे भुकेले
अहर्निश त्वद्विरहग्नि फार दाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

पिके पाण्याविण जाति गे सुकून। मुले मातेविण जाति गे झुरुन
तुझ्याविण माझा जीव सुकुन जाई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

कामधेनू होईल का कठोर। ताप देइल का कधी चंद्रकोर
कशी गंगा होईल तापदायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

मातमहिमा ना आज मालवावा। मातृगरिमा ना आइ! घालवावा
ब्रीद सांभाळी ते न लया नेई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

आइ! माझी ही शेवटील हाक। आइ! बाहेरी येउनिया टाक
अजुन बाहेरी तू जरी न येशी। तुझ्या पोराचे प्रेत तू पहाशी।।

-नाशिक तुरुंग, मे १९३३

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel