सविता बसची वाट पाहात उभी होती .दामू स्कूटरवरून जात होता .तिला पाहिल्याबरोबर त्यांच्या डोक्यात कुठेतरी चांदीची घंटा किणकिणली.एक दिवस तो लांबवर मुद्दाम थांबला होता .ती बसमध्ये चढल्यावर त्याने बसच्या पाठोपाठ तिचा पाठलाग केला .ती कुठच्या ऑफिसमध्ये काम करते ते पाहून घेतले .त्या ऑफिसमध्ये काहीतरी काम काढून एक दिवस तो गेला.तिची ओळख करून घेतली .कुठेतरी तिलाहि तो आवडला. हळूहळू भेटीगाठी वाढत चालल्या. फिरायला जाणे बागेत भेटणे कोणत्या ना कोणत्या मिषाने  पिकनिक सिनेमा नाटक एकत्र पाहणे यातून दोघांचे स्वभाव जुळतात हे लक्षात आले.त्याला आई वडील नव्हते .घरी कुणीच मोठे नव्हते.सर्वसाधारण प्रेमकथेची जशी वाटचाल असते तशीच ही वाटचाल होती.त्याने तिला प्रपोज केले .याची ती वाटच पाहात होती .तिनेही त्याला संमती दिली .तो त्यांच्या घरी वारंवार जाऊ लागला . त्याच्यामध्ये नाकारण्यासारखे काहीही नव्हते .उंचापुरा देखणा उच्चशिक्षित चांगली नोकरी भरपूर पगार सर्वकाही एखाद्या सिनेमात असावे त्याप्रमाणे होते .त्यांचे लग्न ठरले व झाले .

लग्नात तिने प्रथमच शामूला पाहिले .शामू हा दामूची  झेरॉक्स कॉपी होता .दोघेही जुळे भाऊ होते .एकाला लपवावा व दुसऱ्याला दाखवावा.कोण दामू आहे कोण शामू आहे हे कळू नये अशी परिस्थिती होती .तिला पाहिल्याबरोबर शामू चमकला होता .शामूनेही तिला अनेकदा पाहिले होते .त्यालाही ती आवडली होती .ती आपल्याला कधीही पसंत करणार नाही याची त्याला कल्पना होती .त्यामुळे त्या फंदात तो कधीच पडला नव्हता .पण तिच्याशी लग्न करावे निदान तिचा उपभोग घ्यावा अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात होती .आता ती त्याची वहिनी बनून आली होती. तिच्याकडे त्या दृष्टीने पाहणे हेही पाप होते.अर्थात या समाज कल्पना झाल्या .शामू  सर्व सामान्य सामाजिक कल्पना मानणारा नव्हता.

तो समाज विघातक कृत्यांमध्ये आकंठ बुडालेला होता .चोरी खून दरोडा शिंदळकी नशा-द्रव्यांचा व्यापार हा त्याचा जीवन व्यवसाय होता .थोडक्यात तो एक नामचीन गुंड होता .आपल्या धंद्यांमध्ये तो दादा होता .थोडक्यात शामू व दामू ही दोन टोके होती.

जुळी मुले झाल्यावर त्यांच्या आई वडिलांना अत्यंत आनंद झाला होता.दोघांनाही वाढविताना अर्थातच त्यांची धांदल उडत होती. शेजाऱ्यांना शामू कोण दामू कोण हे ओळखताना गोंधळ उडत होताच,परंतु  त्यांच्या आई वडिलांनाही पटकन ओळखताना गोंधळ उडत असे.हळूहळू ते जसे मोठे झाले तसतसा त्यांच्यातील फरक लक्षात येऊ लागला .दोघे  दिसायला जरी एकसारखे एक असले तरी स्वभावामध्ये महदंतर होते.दामू अभ्यासू व वर्गात नेहमी पहिला नंबर असणारा .तर शामू उनाड व जेमतेम पास होणारा.दामू सुस्वभावी होता.सर्वांशी तो आपुलकीने वागत असे.वर्गातील मुलांचा शिक्षकांचा शेजाऱ्यांचा सर्वांचा तो आवडता होता तर शामूची परिस्थिती त्याहून बरोबर विरुद्ध होती.वर्गातील मुलांना त्रास देणे, शिक्षकांच्या खोड्या काढणे,वर्गातील मुलांच्या दप्तरातील वह्या पुस्तके इत्यादीच्या चोर्‍या करणे क्षुल्लक कारणावरून मारामारी करणे यात शामू माहीर होता .कुणीतरी त्याच्या विरुद्ध तक्रार घेऊन आला नाही असा दिवस जात नसे.  त्याच्या उद्योगांना आईवडील कंटाळून गेले होते .त्याला समजून सांगून, धाक दाखवून,मारून, काहीही उपयोग होत नव्हता .

दामूला सर्वजण चांगले म्हणतात,त्याचे कौतुक करतात, यामुळे तो हळूहळू दामूचा द्वेष करू लागला होता .मोठे झाल्यावर मात्र त्याने हा द्वेष तिरस्कार कधीही प्रत्यक्ष  दामूला कळू दिला नाही .भोळा सज्जन सरळमार्गी दामू शामूवर प्रेम करीत होता.शामू नामचीन गुंड आहे याची दामूला कल्पना होती.परंतु आपल्याशी तो चांगलाच वागेल अशी दामूची मनोमन खात्री होती .सज्जन माणसाला सर्वच सज्जन वाटतात म्हणून सर्व सज्जन असतातच असे नाही .चार धाम यात्रेला गेलेले असताना त्यांचे आई वडील अपघातात मरण पावले .तोपर्यंत दामूला नोकरी लागली होती .आई वडील असताना शामू केव्हाच घरदार सोडून गेला होता .आई वडिलांनी आपल्याला शामू नावाचा कुणी मुलगा आहे  हे विसरण्याचा प्रयत्न चालविला होता .शामू नावाचा आपल्याला कुणी मुलगा नाही अशी ते आपल्या मनाची समजूत घालीत असत.

शामू पोलिसांच्या काळ्या यादीमध्ये होता .काही प्रकरणांमध्येही तो सापडला होता.मधून मधून काही कारणांनी चारसहा महिने तुरुंगात जाऊन येणे ही त्याची सवय झाली होती .असे असले तरी आपल्या लग्नांमध्ये दामूने शामूला बोलाविले होते .तोपर्यंत त्याने सविताला त्याला एक जुळा भाऊ आहे हे सांगितले नव्हते .लग्नात पहिल्यांदाच सविताने शामूला बघितले .स्त्रिया पुरुषांची नजर पटकन ओळखतात. शामूची नजर चांगली नाही हे सविताने एका दृष्टिक्षेपात ओळखले होते .तो जरी वहिनी वहिनी करीत असला तरी तो सगळा खोटा अभिनय आहे हे तिने ओळखले होते .लग्नानंतर शामूचे दामूकडे येणे जाणे वाढले होते .तिने तू माझ्याकडे येऊ नकोस हे सुचविण्याचा अनेक मार्गानी प्रयत्न केला होता .झोपलेल्याला जागे करता येईल परंतु जो झोपेचे सोंग घेतो त्याला जागे कसे करणार ?दामूच्या भोळ्या स्वभावामुळे त्याला सांगून विशेष  काही उपयोग नव्हता.शेवटी दामूला सांगून तिने त्याची बदली दिल्लीला करून घेतली .त्यानंतर शामूचे येणेजाणे अर्थातच बंद झाले .

दिल्लीला दामू, मुंबईमध्ये शामू, आपापल्या कामात दंग होते .एक दिवस शामूने मारामारी करता करता खूनही केला .मादक द्रव्यांच्या व्यापारासाठी त्याच्यावर खटला चालला होताच.या सर्वाचा अपरिहार्य परिणाम म्हणून त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली .आता निदान पंधरा वीस वर्षे तो तुरुंगाबाहेर येणे शक्य नव्हते .ही बातमी पेपरमध्ये वाचल्यावर सविताने सुटकेचा निश्वास सोडला .आपल्यावर घोंगावत असलेले वादळ आता दूर गेले म्हणून ती आनंदात होती.या सर्वाची भोळ्या साध्या सरळ सज्जन दामूला काहीच कल्पना नव्हती.सविताने ती कधी येवूही दिली नव्हती.सविता दिल्लीला दूर असली तरीही तिला आतून कुठेतरी भीती वाटत असे .आता ते सर्व दु:स्वप्न संपले म्हणून ती आनंदित होती.आणि तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला .एक दिवस ऑफिसातून येत असताना दामूला अपघात झाला .त्याला ताबडतोब  हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले.अपघातात त्यांच्या हृदयावर मोठा आघात झाला होता .डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले .परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही . प्रेताच्या डोक्यावर चादर ओढून ते बाहेर आले .आता सर्व काही संपले असे त्यानी सविताला सांगितले . 

इकडे मुंबईला त्याच वेळी शामू मरण पावला .एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात नेत असताना त्यांच्या गाडीला अॅक्सिडेंट झाला .त्यामध्ये शामू मृत्यू पावला .जुळय़ा भावांमध्ये काही ना काही घटना समान घडतात असे म्हणतात .हे त्यांचे क्लासिक उदाहरण सांगता येईल .एकाच वेळी दोघांचा अपघात झाला .आणि दोघांचाही त्यात मृत्यू झाला .

सविताला डॉक्टरनी दामू मृत्यू पावल्याचे  सांगितल्यावर तिला ते पटत नव्हते.ती धावत धावत खोलीमध्ये गेली .नवऱ्याचा हात पकडून ती ढसढसा रडू लागली .तिला दुःखाचा आवेग आवरत नव्हता .एवढ्यात तिला दामूच्या बोटांची किंचित हालचाल जाणवली.तिने डॉक्टरना हाक मारली .डॉक्टर धावत धावत आले .त्यांनी दामूला तपासल्यावर त्याचे हृदय किंचित हालचाल करीत आहे असे त्यांना आढळून आले .त्यांनी भराभर सिस्टर्सना बोलवून घेऊन वैद्यकीय उपचार चालू केले . उपचारांना दामू चांगला प्रतिसाद देऊ लागला .डॉक्टरांचा विश्वास बसत नव्हता .त्यांनी उपचार करताना पुन्हा पुन्हा तपासून तो नक्की मृत्यू पावला असे लक्षात आल्यावर आणि आता काहीही उपचार करून त्याचा उपयोग नाही अशी खात्री पटल्यावरच तसे सविताला सांगितले होते .हृदय पूर्णपणे बंद पडलेले असताना ,काहीही उपचार करून ते चालू होत नसताना, ते एकाएकी धडधडू कसे लागले ते त्यांना कळत नव्हते .न भूतो भविष्यती असा एक वैद्यकीय चमत्कार असे ते म्हणत होते.

काही दिवसात दामू पूर्णपणे बरा झाला .सविता त्याला घरी घेऊन आली .हॉस्पिटलमध्ये बरा होत असतानाच सविताला दामूमध्ये काहीतरी विचित्र बदल झाल्याचे जाणवू लागले होते .त्याची नजर पूर्वी प्रमाणे नाही असे तिला आढळून आले .तिला पहिल्यांदा कदाचित अपघातामुळे असे झाले असावे असे वाटत होते .परंतु त्याचे डोळे त्याची नजर त्याचा स्पर्श तिला नेहमीप्रमाणे वाटेना .त्याच्या बोलण्याची पद्धतही बदलली होती .घरी आल्यावर त्याच्या अनेक हालचालीमधून हा आपला दामू नाही असा तिचा पूर्वीचा ग्रह दृढ होत गेला.किंचित बरे वाटल्याबरोबर तो तिला आपल्या बाहुपाशात घेण्याचा प्रयत्न करू लागला.त्याचा स्पर्श आता तिला किळसवाणा वाटू लागला होता .दामूचे जे मित्र त्याला हॉस्पिटलमध्ये किंवा नंतर घरी भेटण्यासाठी येत असत त्यांना तो  ओळखत नसे . त्यांना कदाचित अपघातामुळे त्यांच्या स्मृतीवर परिणाम झाला असावा असे वाटत होते .परंतु खरे काय ते सविताला माहित होते, जाणवत होते .तिने तिच्या मुंबईच्या मैत्रिणीला शामूबद्दल माहिती काढायला सांगितले.शामूला वीस वर्षांचा तुरुंगवास झाला हे तिला माहीत होते .परंतु त्यानंतरची हकीगत सविताला माहीत नव्हती .थोड्याच दिवसात मैत्रिणीचा तिला फोन आला .ज्यावेळी दामूला अपघात झाला त्याच वेळी तिकडे शामूलाही अपघात झाला .आणि त्यात शामू मरण पावला  हे तिच्या मैत्रिणीने तिला कळविले .

हे कळल्यानंतर सविताची खात्रीच पटली .तिचा दामू मरण पावला होता.हा जो कुणी होता तो दामू नव्हता. कसे कोण जाणे परंतु शामूने दामूच्या शरीरात प्रवेश केला होता असा तिला जो संशय होता त्याची आता खात्री पटली होती.

इथे दिवसेन दिवस दामू झपाटय़ाने बरा होत होता .सविताला केव्हा कवेत घेऊ असे त्याला झाले होते .तिचा उपभोग घेण्यास तो आतुर झाला होता .त्याच्या दृष्टीमध्ये ते सर्व दिसत होते .सविताला तर त्याचा स्पर्शही नकोसा होता .तिला जे जाणवत होते,जे कळत होते, ते इतरांना कळणे शक्य नव्हते. दिवसेन दिवस दामू  (कि शामू) तंदुरुस्त होत होता .एकना एक दिवस तो आपला उपभोग घेणार हे तिला कळून चुकले होते. त्याची तिला किळस वाटत होती .तिला त्याची त्यांच्या लग्नातील पहिल्या भेटीतील नजर आठवत होती .त्यानंतर जेव्हा जेव्हा तो घरी येऊन वहिनी वहिनी करीत असे तेव्हाचा त्याचा विखारी आसुसलेलेपण तिला आठवत होते.त्याच्याशी संबंध ठेवण्यापेक्षा तिने आत्महत्या करणे पसंत केले असते. त्याच्या त्या विखारी स्पर्शापासून विखारी दृष्टी पासून दूर होण्यासाठी तर तिने दामूच्या पाठीमागे लागून आपली बदली दिल्लीला करून घेतली होती .जे टाळण्याचा तिने प्रयत्न केला होता तेच आता तिच्या समोर वेगळ्या रूपात उभे राहिले होते .प्राप्त परिस्थितीमध्ये त्याला टाळणे जवळजवळ अशक्य होते .

दामूच्या नोकरीमध्ये तो किती यशस्वी झाला असता माहित नाही.त्याची तिला पर्वाही नव्हती.

शेवटी तिला स्वतःला वाचविण्याचा एकच मार्ग दिसत होता.एक स्वतःला तरी संपविणे किंवा त्याला तरी संपविणे .तिने दुसरा मार्ग निवडला.त्याला जेवणातून गुंगीचे औषध दिले .रात्री गाढ झोपेमध्ये तो असताना तिने त्याच्या नाकावर उशी सर्व ताकद एकवटून दाबून धरली.गुंगीमध्ये  असल्यामुळे तो फार विरोध करू शकला नाही. 

* दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू कार्डिअॅक अॅरेस्टने झाल्याचे सर्वांना कळले*

१३/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel