जगातील सत्ता फाशी देतील, गोळी घालतील. ते माझे शरीर नष्ट करतील, परंतु माझ्या मनावर सत्ता कोण गाजवणार? जुलमी कायद्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही मला चिरडाल, परंतु तुमच्या अन्याय्य कायद्यांसमोर मी मान वाकवणार नाही. घना ते स्वातंत्र्य अनुभवीत होता. सखाराम व मालती यांच्या स्वागताला आपण जाऊ शकत नाही म्हणून त्याला वाईट वाटले. त्याने दोघांच्या गळ्यांत घालण्यासाठी स्वत:च्या हातच्या सुताचे हार ठेवले होते, घाईघाईतही त्याने तसे लिहून ठेवले होते.

त्याच्या खोलीत रामदास बसला होता.

‘हे हार येणा-या मित्रांना—’ असे तेथे चिठ्ठीवर होते.

दुसरे मित्र आले. ते पत्रक सायक्लोस्टाइल प्रती काढण्यासाठी ते घेऊन गेले.

रामदासने खोलीची नीट व्यवस्था लावली.

तो आता जरा झोपला. तिकडे घनाही झोपला.

परंतु मालती उठली आहे. सखाराम व ती निघणार. घनासाठी तिने खाऊ करून घेतला आहे. थोडी फळफळाव तिने घेतली आहे.

“दादा येते—” त्याच्या पाया पडून ता म्हणाली.

“वैनी आल्यावर मग जातीस?” तो म्हणाला.

“परंतु दोन दिवस थांबले. आणखी किती थांबायचे? त्यांना कदाचित तिकडे अटकही झाली असेल. वैनीला माझा नमस्कार सांग. जयंता, पारवी यांना माझा पापा. तू प्रकृतीस जप. दादा माझी चिंता नको करू. सारे सुंदर होईल. नवी दृष्टी, नवीन सृष्टी,-- आईचा आशीर्वाद आहेच.”

“सखाराम पत्र पाठवीत जा. मुलेबाळे सोडून मी काही येऊ शकणार नाही.”

तुमचे प्रेम असले म्हणजे सारे काही आहे.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel