रात्री घना व त्याचे मित्र बसले होते. गिरणीच्या फाटकाजवळ कोणी आत जाऊ लागलेच तर आडवे पाडायचे. मग अंगावरून लॉरी नेवोत की काही करोत, -- असे ठरले. आपणास पकडलेच तर सर्वांनी कसे वागावे ते सांगणारे एक पत्रक घनाने तयार करून ठेवले.

“याच्या हजारो प्रती करून वाटा.” तो म्हणाला.

“सखाराम येत आहेत ना?”

“हो, त्याची बहीणही येत आहे. ती स्त्रियांत जाईल. खूप काम करील.”

“छान होईल! कधी येणार दोघे?”

“उद्या सकाळी येतील. उद्याच्या सभेत त्यांची भाषणे ठेवू. त्यांची ओळख करून देऊ. सखाराम म्हणजे देवमाणूस! कामाचाही त्याला उरक आहे. मी पकडला गेलो तर काळजी करू नका. शेवटी आपला धीर हाच आपला मार्गदर्शक. आपली हिम्मत हीच मैत्रीण.” घना गंभीरपणे बोलत होता.

“बाबू कालच गेला. शेवटच्या गाडीने गेला.” रामदास म्हणाले.

“अमरनाथ काय म्हणतो बघावे. तो दिलदार माणूस आहे.”

“आठदहा दिवस तरी संप चालेल. पुढचे कोणी सांगावे!”

“बघू या. धडपड हे कर्तव्य.”

कार्यकर्ते गेले. घना काही तरी लिहीत होता. ती का कविता होती का ते पत्र होते? अटक झालीच तर सखाराम व मालती याना ती पत्रे होती. दोन पाकिटांत ती घलून वर पत्ता लिहून ठेवली त्याने. तो अंथरुणावर पडणार इतक्यात रामदास पळत आला.

“काय रे रामदास?”

“पोलिस येत आहेत. तयारी करा. मला सांगा काम.”

“तू या खोलीतच झोप. सखाराम व मालती यांना येथेच उतरायला आणा. ही दोन पत्रे त्यांच्यासाठी आहेत. ही तुझ्या खिशात ठेव. ती पत्रके व ते कागद घेऊन जा. ते सारे ठेवून ये. मी लिहिलेल्या पत्रकांच्या रातोरात प्रती काढा. सर्वांनी शांती राखा. जा हे कागदपत्र घेऊन.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel