“मी नवरदेव शोभतो.” तो म्हणाला.

“नवरी कोठे आहे?” एका मुलीने विचारले.

“स्वच्छता ही माझी नवरी. जन्मोजन्मी ही नवरी मिळो. वाजवा टाळ्या. लावा माझे लग्न. स्वच्छतेचा जयजयकार करा!” तो म्हणाला.

सेवेचे ते प्रात्यक्षिक होते. निरहंकारी होऊन काम करायचे असते. कोणावर रागावणार? कोणावर रुसणार? आपलेच ओठ. आपलेच दात!

तुका म्हणे एका देहाचे अवयव।

आपण सारे एकच आहोत. एकच आत्मा सर्वत्र भरून राहिला आहे, ही जाणीव ज्याला झाली-त्याला क्रोध कसा येईल?

आज शेवटचा दिवस. कामगारांच्या चाळीतून आज स्वच्छता करण्यात आली. येथील लोकांनी सहकार्य केले. घनाने दोन शब्द सांगितले. त्याने मुलामुलींना धन्यवाद दिले.

“आता पुन्हा कोणता सप्ताह पाळायचा?” मुलांनी विचारले.

“आपण साक्षरतासप्ताह पाळू. सर्वांना का शिकावे ते दाखविणारी ३० चित्रे एका मित्राने तयार केली आहेत. बडोद्यास आहे तो मित्र. तो ती पाठवणार आहे. आपण सकाळी गावातून साक्षरतेची गाणी गात फेरी काढू सात दिवस, आणि प्रदर्शनात येणा-या प्रेक्षकांची चित्रे समजावून देऊ.

“कधी घ्यायचा हा सप्ताह?”

“दिवाळीच्या सुट्टीत.”

त्याप्रमाणे ठरले.

मुले दिवाळीच्या सुट्टीची वाट पाहात होती. बडोद्याहून ती चित्रे आली. नगरमंदिराची जागा घेऊन तेथे प्रदर्शन मांडण्याचे ठरले. नागेश, रमेश, उज्ज्वल, भुला – वगैरे बालचित्रकार तेथे सजावटीला धावले. ती चित्रे नीट मांडण्यात आली. पताका, तोरणे, तिरंगी झेंडे यांची शोभा होती. ठायी ठायी ब्रीदवाक्ये होती. राष्ट्रपुरुषांची चित्रे काढली. सर्वांना काही तरी करावे असे वाटत होते. घनाने साक्षरतेची गाणी केली. सुटसुटीत म्हणण्यासारखी ब्रीदवाक्ये त्याने दिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel