"वास्तू पुरुषास"
"साष्टांग नमस्कार विनंती विशेष,".......!!!!!!

झालं असं की, एकजण घरी आले होते ते बोलता बोलता म्हणाले "वास्तू प्रसन्न आहे हं तुमची" आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली
तुझी "शांत" करून जमिनीत पुरून जेवणावळी केल्या की तुला विसरूनच जातो रे आम्ही मग उरत ते फक्त  "घर"' तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा !!!
अगदी अपराधी वाटलं मग काय तुझ्याशी "पत्र संवाद" करण्याचं ठरवलं म्हणून आज हे "पत्र" !

सध्याच्या या विषाणूजन्य बदलाच्या   या परिस्थितीत  घर म्हणजे खरा आधार याची हक्काने जाणीव झाली वास्तूचे महत्त्व  पटले रे!! बेघर होणं काय असतं हे ही  अनुभवलायला लावलयं पण आज तू हक्काने तुझ्या छायेत राहतेय  यासाठी कृतज्ञता!! हक्काचा आधार ही वास्तू ......!पूर्वीही घर या संकल्पनेबदृल   तुझ्या विषयी  विचार आलाय ..तो करताना ....

कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस ते घरकुल खरंच सोडवत नाही
घरात बसून कंटाळा येतो म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो तर 4 दिवस मजेत जातात पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते आता तर या कोरोना काळात गेले अनेक दिवस तू सावली देतोयस
आजारपणात डॉक्टर म्हणतात आराम व्हावा म्हणून ऍडमिट करा पण तुझ्या कुशीत परतल्या शिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही हेच खरं

तुझ्या निवाऱ्यात अपरिमित सुख आहे अंगणातील छोटीशी "रांगोळी" स्वागत करते , दारावरच "तोरण" हसतमुखाने सामोरं येतं , तर उंबरा" म्हणतो थांब "लिंबलोण" उतरू दे ---या कोरोना महामारीने ही नकळत लक्ष्मणरेषा आखून उंबरठ्याचे महत्व मर्यादेची जाणीव करुन दिली च....
बैठकीत "विश्वास" मिळतो तर माजघरात "आपुलकी" ! स्वैपाकघरातील "प्रेम" तर दुधाच्या मायेनं ऊतू जात !
तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील "भीती" पळवून लावते , खरंच "वास्तुदेवते" या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते
तुझी शिकवण तरी किती बहुअंगी,  "खिडकी" म्हणते "दूरवर बघायला शिक", "दार" म्हणत येणाऱ्याच "खुल्या मनाने स्वागत कर,  "भिंती" म्हणतात मलाही कान आहेत "परनिंदा" करू नकोस, "छत" म्हणत माझ्यासारखा "उंचीवर" येऊन विचार कर, "जमीन" म्हणते कितीही मोठा झालास तरी "पाय" माझ्यावरच असू देत तर बाहेरच "कौलारू छप्पर" सांगत "स्नेहाच्या पंखा खाली" सगळ्यांना असं काही "शाकारून" घे की बाहेर शोभा दिसेल आणि  ऊन, वारा लागणार नाही !
इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी  यांचाही "आश्रयदाता" आहेस त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि निसर्गाच्या "अन्न साखळीला" हातभार लावतोस इतकं "मोठं मन" आमचंही व्हावं असा आशीर्वाद  "घर देता का कोणी घर"' ही "नटसम्राटाची" घरघर आठवते  ! कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या  खाणाखुणा नाही ते घर नसतं बांधकाम असतं रे विटा मातीच...

"वास्तू देवते" पूर्वी आई आजी सांगायची "शुभ बोलावं" नेहमी आपल्या बोलण्याला "वास्तूपुरूष "नेहमी "तथास्तु" म्हणत असतो

मग आज इतकंच म्हणते की
"तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी  मित्रमैत्रिणी आप्तेष्ट एकत्र वास्तव्यास येऊ दे" .......

तुझ्या असण्याची जाणीव अजून दृढ होवू देत घराच घरपण टिकू देत  या पडत्या काळात    महामारीच्या संकटात धीराने सगळ्यांना आधार देणारा तू खरा पाठीराखा .... तुझे आभार मानून परकं व्हायचं नाही मला अनेक वर्षे तुझी साथ हवीय पण या संकटातून लवकर मुक्त कर..!!

.कारण तुझा आधार नसणाऱ्या चे काय रे !!...त्यांना रस्त्यावर राहावे लागते त्यांनाही तू   अदृश्य रुपात सावली द्यावीस "तथास्तु" म्हणावेस ही इच्छा!!!

आणि या माझ्या मागण्याला तू "तथास्तु "असच म्हण हा माझा आग्रह आहे....!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel