"उठ! उठ रे झोपाळू प्राण्या.. उठ!! "

अशीच एक शनिवारची दुपार होती. दुपार कसली, संध्याकाळच म्हणा ना. पाच वाजायला आले होते. सूर्याने लाल रंग धारण करायला घेतला होता. मी अल्फाला गदागदा हलवून उठवित होतो. त्याची 'वामकुक्षी ' आज जरा गरजेपेक्षा जास्तच वेळ झाली होती. अल्फा म्हणजे चालता बोलता कुंभकर्णच! एकदा झोपला की झोपला! त्यामुळे मला नेहमीच त्याला उठविताना कष्ट पडायचे.

"काय रे! झोपू दे ना! " अल्फाने वैतागून कूस बदलली, " मी झोपलो की तुझ्या डोळ्यांत नेहमी खुपायला लागतं बाबा प्रभू.. "

" हो का? बरं बरं. मग प्रधान सरांना सांगू का, की मी एकटाच येतोय आणि अल्फा झोप काढण्यात मग्न आहे म्हणून? "

प्रधान सरांचे नाव काढताच अल्फा स्प्रिंगसारखा टुमकन उठून बसला.

" अरे देवा, विसरलोच होतो की मी! किती वाजलेत? " त्याने प्रश्न केला.

" पावणेपाच. " मी शांतपणे उत्तरलो. ते ऐकताच अल्फाने बेडवरून खाली जवळपास उडीच मारली.

" काय तूपण ना प्रभू! लवकर उठवशील की नाही जरा. " त्याने पळत जाऊन तोंड धुतले.

" हं! लवकर म्हणे! अर्धा तास झाला उठवतोय. आता ढोल बडवायचेच काय ते बाकी होते. " मी निर्विकारपणे म्हणालो. अखेर दहा मिनिटांनी महाशयांचा आवराआवरीचा कार्यक्रम झाला आणि आम्ही बस स्टॉपच्या दिशेने चालू लागलो. प्रधान सरांनी खरे तर शार्प पाच वाजता बस स्टँडवर येण्यास सांगितले होते. पण अल्फाची झोप! शेवटी उशीर झालाच. श्री भालचंद्र प्रधान- सांगली जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक. अल्फाचे गुरू. अल्फा त्यांच्याबद्दल बरेच काही सांगायचा. पण त्यांना भेटायची ही माझी पहिलीच वेळ होती. मंगळवारी त्यांचा अल्फाला फोन आला होता -

'या शनिवारची संध्याकाळ राखून ठेव. आपल्याला जयसिंगपूरला जायचे आहे. माझ्या एका घनिष्ठ मित्राची पंच्याहत्तरीची पार्टी आहे आणि त्याने आवर्जून तुला सोबत घेऊन येण्यास सांगितले आहे. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता तयार रहा. कुठे कडमडू नकोस आणि दुपारी झोपू तर अजिबातच नकोस! '

माझ्या मित्राने त्या सूचना अगदी 'तंतोतंत' पाळल्या, ती गोष्ट वेगळी. अखेर उशिरा का होईना, पण आम्ही बस पकडण्यासाठी जायला निघालो. या प्लॅनमध्ये मी अंतर्भूत होण्याचे कारण म्हणजे अल्फाचा आग्रह! त्याने फोनवर प्रधान सरांना मला न विचारताच सांगून टाकले, "सर, माझा नवीन रूममेट तुम्हाला भेटण्यास उत्सुक आहे. त्यालाही येताना सोबत घेऊन येतो."!!

झालं. मग माझा वीकेंडला घरी जाण्याचा प्लॅन रद्द झाला आणि मी 'बिनबुलाए मेहमान' सारखा एका अनोळखी माणसाच्या पंच्याहत्तरीला जाण्यासाठी रूमवरच थांबलो. मला हा प्लॅन मुळीच आवडला नव्हता. पण अल्फा ऐकायला तयारच नव्हता.

" तुला जरा हे विचित्र नाही का वाटत, अल्फा? " मी शेवटच्या क्षणी कटता येते का, ते पाहण्यासाठी विचारले, " ते कोण महाशय पंच्याहत्तरीचे आणि त्यांची पार्टी तरी कसली.. माझी ओळख ना पाळख. मी येण्याचे मुळातच काही कारण नाहीये. मी इथूनच इचलकरंजीची बस पकडून घरी जाऊ का? "

" गपचूप उभा रहा. " अल्फा एखादी बस येतेय का, ते पहात म्हणाला, " मला ठाऊकाय तू घरी जाऊन काय करणार आहेस ते. कुठल्यातरी जाडेल्या पुस्तकात डोके खुपसून बसशील. त्यापेक्षा चल माझ्यासोबत. मला हा पार्ट्या वगैरे प्रकार जाम बोअर होतो बुवा. एकतर कोणाशी ओळख नसते आणि माझ्या वयाचे तेथे कोणीच नसते. त्यामुळे तू बरोबर असलास, की जरा वेळ चांगला जाईल. "

अखेर बस आली आणि आम्ही सांगली बस स्थानकाकडे निघालो.

" प्रधान सर येऊन थांबले असतील. " मी म्हणालो. ते आम्हाला स्टँडजवळ पिकअप करणार होते, "तुझ्या झोपेने विलंब केला."

अल्फाने एक मोठ्ठी जांभई दिली.

" झोप झोप झोप! " अल्फा म्हणाला, " देवाने आयुष्यात जर कुठली सुंदर गोष्ट बनविली असेल, तर ती म्हणजे झोप आहे, प्रभू. शांत झोप म्हणजे सुखाची निशाणी. मला तर एकवेळ जेवायला दिले नाही तरी चालेल, पण झोप मात्र भरपूर पाहिजे. त्यातच दुपारची झोप तर कधीतरीच आपल्या नशिबी असते. त्यामुळे मी आज तर मस्त ताणून दिली बाबा! आणि झोप आरोग्याला किती चांगली आहे, हे काही सांगायला नकोच. "

" हो, पण झोप माणसासारखी असावी. तुझ्या झोपेला झोप मुळीच म्हणता येत नाही. " मी म्हणालो.

" उलट तीच तर खरी झोप आहे! " अल्फा म्हणाला, " भरपूर झोपण्याचे फायदे ठाऊक आहेत का तुला? मोठी झोप घेतल्याने तब्येत तर चांगली रहातेच, शिवाय एक असे सर्वेक्षण आहे, की मोठी झोप तुमची स्मरणशक्तीदेखील वाढविते. झोपेमुळे तुमचे 'ग्रास्पिंग' वाढते, म्हणजेच तुम्ही जागेपणी एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करीत असाल, तर जास्त झोप घेतल्यामुळे तुम्ही ती गोष्ट लवकर शिकू शकता. जास्त झोपल्याने आपले आयुष्य वाढते. याखेरीज तुम्ही कमी झोपलात, की तुमच्या शरीरातील हानिकारक प्रोटिन्सची लेव्हल वाढते, ज्यामुळे ब्लड प्रेशर आणि हार्ट अ‍ॅटॅकसारख्या समस्या उद्भवू शकतात. झोपेत तुमचा विस्कटलेला मेंदू पुन्हा व्यवस्थित होतो, ज्यामुळे तुमची कल्पकता वाढते. शिवाय तुम्हाला वजन नियंत्रित ठेवायचे असेल, तर उत्तम झोप हवीच हवी. आणि ही गोष्ट तर तुला आवर्जून सांगायलाच पाहिजे, की भरपूर झोप काढली, की परिक्षेत चांगले ग्रेड्स मिळतात असेही अभ्यासकांना दिसून आलेय. त्यामुळे तू दिवसरात्र जागरण करून जो अभ्यास करतोस, तो अगदीच निरर्थक म्हणायला हवा. त्याऐवजी निवांत ताणून देत जा- माझ्यासारखी! "

अखेर मी अल्फासमोर हात जोडले.

" चूक झाली महाराज, माफ करा! " मी म्हणालो. 'झोपेचे फायदे' या विषयावर लांबलचक बडबड ऐकण्यापेक्षा अल्फाला झोपेतच ठेवणे जास्त सुखकर होते, " इथून पुढे आपल्याला झोपेतून उठविण्याची घोडचूक चुकूनही करणार नाही! "

अल्फा हसला, " चला. म्हणजे तुला मुद्दा तरी पटला. माझी बडबड वाया गेली नाही म्हणायची."

आम्ही काही मिनिटांतच बस स्टँडवर उतरलो. बाजूच्या चौकात एक रुबाबदार शेव्हरोलेची गाडी उभी होती. आम्ही तिच्या जवळ जाताच आतून एका वैतागलेल्या वृद्धाने खिडकीतून डोके बाहेर काढले.

"अरे काय करत काय होता इतका वेळ? " त्यांचा आवाज करडा होता आणि त्याला एक वेगळीच धार होती. चेहरा सुरकुतलेला, पण तेजस्वी होता. डोळे पाणीदार होते. हेच ते अल्फाचे गुरू - श्री. भालचंद्र प्रधान. "मला वाटलं आता शंभराव्या वाढदिवसालाच येताय की काय थेट! "

" सॉरी सर.. थोडा डोळा लागला होता. "अल्फा म्हणाला. ('थोडा' या शब्दावर मी भुवया उंचावून अल्फाकडे पाहिले.)

" हं.. वाटलंच मला. नेहमीचंच आहे तुझं. बसा आत पटकन. "

क्षणातच आमची गाडी जयसिंगपूरच्या दिशेने धावू लागली.

" हा प्रभव, सर. माझा नवा रूममेट. " अल्फाने माझी ओळख करुन दिली.

" हॅलो. अल्फा नेहमी सांगत असतो तुझ्याबद्दल. " प्रधान म्हणाले, " गेल्या आठवड्यात परिक्षा होती वाटते तुमची. "

" अं.. हो. परवाच संपली आहे, सर. मिड - टर्म एक्झाम. " मी म्हणालो.

" अच्छा. तळवलकर जिमला गेला नाहीस बरेच दिवस म्हणून विचारले. संध्याकाळी सहाची बॅच, बरोबर ना? "

" अं.. होय. तुम्हीही येता का तिथे? दिसला नाहीत कधी. " मी विचार करीत म्हणालो.

" नाही रे. या वयात तिसऱ्या मजल्यावरील जीममध्ये येऊन कसला व्यायाम करतोय मी! त्यामुळे तुला तेथे पाहण्याचा तर सवालच उपस्थित होत नाही. ते तर मी असंच तुझ्याकडे पाहून सांगितलं. "

" क्काय? माझ्याकडे पाहून?? " मी थक्क होऊन विचारले, " ते कसे काय? "

" फार काही खास विचार करावा लागला नाही रे यासाठी. " प्रधान सहजपणे म्हणाले, "तुझ्या हाताच्या तळव्याच्या बाजूला झालेली छोटीशी जखम बघ. त्यावरून मी हा निष्कर्ष काढला. तुझ्या दणकट शरीरयष्टीवरून हे तर दिसतेच आहे, की तू नियमित जिमला जातोस. आता सांगलीतील इतक्या साऱ्या जिम्समधून तळवलकर जिमच मला दिसण्याचे कारण म्हणजे तिथे असलेला एक खराब डंबेल्सचा सेट. त्या सेटमधील एका डंबेल्सचा कड जरा तुटका आहे. त्या उचलून व्यायाम करताना हाताच्या बाजूला ते तुटलेले लोखंड घासून थोडे खरचटते, जे हुबेहुब तुझ्या हातावर झाले आहे. सहाचीच बॅच का, तर तेथे संध्याकाळी सहा वाजता सर्वात जास्त गर्दी असते. त्यामुळे चांगले असलेले सेट बाकीचे लोक पटापटा घेत असणार आणि शेवटी तो खराब डंबेल्सचा सेटच तुझ्यासाठी उरत असणार. आणि बरेच दिवस तू तेथे गेला नसावास, कारण तुझ्या हातावरील जखम ताजी नाहीये आणि ती आता भरत आलेली आहे. याचा अर्थ गेले काही दिवस तू तेथे जात नाहीयेस. मग याला कारण म्हणजे तुमची परिक्षा सुरू असावी आणि अभ्यासातून तुला वेळ मिळत नसावा. बरोबर आहे ना? "

" माईंड ब्लोईंग!!! " मला क्षणभर काय बोलावे, हे सुचलेच नाही, " अप्रतिम!! खुपच उत्कृष्ट तर्क होता हा. "

" धन्यवाद! " प्रधान स्तुती स्वीकारत म्हणाले, " मी पूर्वी काही वेळा तळवलकर जीममध्ये गेलेलो आहे. त्यामुळे तेथील थोडीफार माहिती मला आहे. "

" अच्छा अच्छा. आता मला कळतंय, की अल्फाच्या निरीक्षणशक्तीचे उगमस्थान कोठे आहे ते! " मी प्रभावित होऊन म्हणालो.

"तसं काही नाहीये. एखादी कला कोणाच्यात तयार करता येत नाही. ती उपजतच असते. त्यामुळे अल्फाच्या निरीक्षणशक्तीचे श्रेय मला तरी जात नाही."

" हा तुमचा मोठेपणा म्हणायला हवा." मी म्हणालो,  "मी अल्फाकडून तुमच्याबद्दल खूप काही ऐकले आहे. तुम्हाला भेटण्यास मी खूपच उत्सुक होतो, सर."

" पण आज नक्कीच नसशील, होय ना? " प्रधान सरांनी मिश्कीलपणे विचारले, "वीकेंडला घरी जाण्याऐवजी जर एखाद्याला अनोळखी माणसाच्या पार्टीला ओढून नेले, तर त्याला ते नक्कीच आवडणार नाही."

"नाही नाही, तसं काहीही नाहीये सर. " मी थोडासा ओशाळून म्हणालो. माझ्या चेहर्‍यावरचे भाव इतके बोलके झालेत की काय, असा मला प्रश्न पडला.

" काही हरकत नाही रे. स्वाभाविकच आहे. " प्रधान सर म्हणाले, "हा अल्फा असाच नेहमी कटकट करतो का तुझ्यामागे? तसं असेल तर सांग. मी तंबी देऊन ठेवतो त्याला."

"करतो. पण आता सवय झालीये." मी अल्फाकडे पाहून डोळा मारला.

" चांगली गोष्ट आहे. " प्रधान म्हणाले, " आणि आज इतकंही बोअर होणार नाही तुम्हाला. आपण जिकडे निघालोय, ती जागा रहदारी आणि शहराच्या गजबजाटापासून आलिप्त अशा एका ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या निसर्गात मुक्तपणे फिरायला वाव आहे. काळजीचे काही कारण नाही. "

" आपण चाललोय तरी कुठे? " अल्फाने विचारले.

" आपण श्री मिरासदार यांच्या फार्महाऊसवर जाणार आहोत. मी तुम्हाला मिरासदारांबद्दल काहीच सांगितले नाही, नाही का! " प्रधान म्हणाले, " सांगलीतले एक मोठे व्यापारी आणि माझे घनिष्ठ मित्र- माधव मिरासदार. खूपच श्रीमंत माणूस. सुरुवातीला बेदाण्यांचा व्यापार करायचे. त्यात प्रगती करत करत आता बरंच काही उभं केलेलं आहे. अगदी साधा आणि सरळमार्गी माणूस. तुम्हाला नक्कीच तो आवडेल. "

चला, निदान कोणाच्या वाढदिवसाला निघालो आहोत, हे तरी कळालं, मी मनात म्हटलं. सांगलीपासून ते ठिकाण फारसं लांब नव्हतं. अर्ध्या तासाने, जयसिंगपूर गाव सोडल्यानंतर आमची गाडी मुख्य रस्ता सोडून एका वळणावर वळली. आता वाहनांची वर्दळ मागे राहिली आणि आम्ही ओसाड माळरानाच्या मधून जाणाऱ्या एका छोट्या रस्त्यावरून जाऊ लागलो. दिवस लहान असल्यामुळे सर्वत्र अंधारून आले होते. त्यात रस्त्यावर दिवे नाहीत. त्यामुळे आमचा वेग मंदावला. आजूबाजूला मध्ये मध्ये शेते लागत होती, पण बराचसा भाग ओसाडच होता. वस्ती फारच कमी होती. मधूनच शेतात दडलेले एखादे घर आम्हाला दिसायचे. अखेर, त्या रस्त्याने बरेच अंतर कापल्यनंतर आम्ही एका टोलेजंग फार्महाऊससमोर येऊन थांबलो. अंधूक प्रकाशात आम्हाला त्या फार्महाऊसवर लिहिलेले दिसले -  'देखावा'.

आम्ही गाडीतून खाली उतरलो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel