सर्व कामे करीत असले तरी नवीन ज्ञान मिळविण्याबद्दल ते उत्सुक असत. २५ व्या वर्षी ते इंग्रजी शिकले आणि त्यात त्यांनी अप्रतिम प्राविण्य मिळविले. मोठमोठी पुस्तके इंग्रजीत त्यांनी लिहिली. तत्त्वज्ञानावरचे अगदी अर्वाचीन ग्रंथही ते वाचायचे. त्यांच्या हृदयाच्या खिडक्या उघड्या असून मनाचे दरवाजे नूतन प्रकाश घेण्यास सदैव उघडे असत. ज्या फ्रेंच तत्त्वज्ञाचे तत्त्वज्ञान नुकतेच इंग्रजीत प्रसिद्ध होऊ लागले होते, त्या कॉम्टच्या तत्त्वज्ञानाची त्यांची माहिती पाहून एक बडे विद्वान कसे स्तंभित झाले हे पूर्वी एके ठिकाणी सांगितलेच आहे. ते ज्ञानाचे अधाशी होते. कणकण विद्या मिळवून ते खरे विद्यासागर झाले. गटेप्रमाणे More light, ‘आणखी प्रकाश’ हेच त्यांचे जीवनसूत्र होते. मरेपर्यंत त्यांचा अभ्यास, वाचन चालले होते. ते विद्यादेवीचे एकनिष्ठ उपासक होते. हिंदुस्थानचा इतिहास ते मरताना लिहीत होते. हे पुस्तक आपण पुरे करू शकणार नाही हे पाहून त्यांनी ते दुस-याच्या हवाली केले. परंतु ते तसेच कोठे  तरी काळाच्या पोटात आज गडप झाले आहे. सारांश, नेहमी त्यांचे मन ज्ञानोत्सुक असे.

विद्यासागरांमध्ये काही दोषही असतील परंतु ते आम्हास माहीत नाहीत. एकच त्यांचा दोष कोणी दाखवितात की, त्यांस आपल्या बरोबरीच्या लोकांत काम करता येत नसे. दोन सिंह एकत्र राहू शकत नाहीत, दोन तलवारी एका म्यानात राहणार नाहीत. टिळकांच्यावरही असाच आरोप आहे. सामान्य लोकांत मोठे होऊन मिरवावे असा टिळकांवर आरोप आहे. परंतु विद्यासागरांवर हा आरोप का येतो हे समजत नाही. यंगसाहेबांबरोबर त्यांचे पटले नाही. बेथून मेल्यावरती त्या इन्स्टिट्यूटच्या मालकांजवळ, चालकांजवळ न पटल्यामुळेच विद्यासागरांस संस्थेशी संबंध सोडावा लागला. परंतु विद्यासागरांचे बिनसण्याचे कारण अहंकार किंवा, स्वतःच्या कर्तबगारीची फाजील घमेंड हे नसून त्यांच्या नीतीबद्दलच्यी तीव्र कल्पना हे आहे. दुसरा मनुष्य जरा अन्याय करतो आहे असे जर त्यांस दिसून आले तर ते तेथून निघून जात. बेथून व विद्यासागर यांचे नाही का आजन्म प्रेम व स्नेहसंबंध राहिले? बेथून हाही एक मोठा कर्तबगार व थोर पुरुष होता. परंतु बेथून यांच्या ठिकाणी घाण विद्यासागरांस दिसली नाही. तेथे सर्व सोने दिसले म्हणून ते त्यांस चिटकून राहिले.

तेव्हा वरील आरोपसुद्धा खरा असेल असे वाटत नाही. त्यांच्या गुणांचा अतिरेक हा दुर्गुण फार तर त्यांच्या अंगी चिकटवता येईल; आणि समजा काही किरकोळ दोष असले, तरी या गुणरत्नाकराकडे पाहता ते कोठल्या कुठे लपून जातात, अदृश्य होतात. ‘एकोहि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोः किरणेष्विवांकः’ हेच खरे. डागामुळे चंद्रास शोभा आहे. देदिप्यमान सहस्त्रकरावरही म्हणे डाग आहेत. जे मर्त्य आहे, जे भौम आहे, त्यात थोडा फार भूमीचा अंश, लघुत्वाचा अंश असणारच. परंतु दैवी अंश किती थोर आहे हे पाहून आपण त्यांस वंदावे. ईश्वरचंद्रांमध्ये हे दैवी गुण पराकाष्ठेस पोचले होते. ते भव्य व सुंदर आहेत; पवित्र व निष्कलंक आहेत. विद्येचे सागर व प्रेमाचे आगर असे ते आहेत. ते भूतदयेचे सिंधू आहेत; कर्तव्याचे मेरू आहेत. त्यांच्याकडे पाहून सर्वांनी थोर होण्याचा प्रयत्न करावा; पापापासून परावृत्त होऊन सच्छील, कर्तव्यरत आणि परोपकारपरायण होण्याचा, शक्त्यनुसार दुःखितांचे अश्रू, पुसण्याचा आपण सर्वांनी निश्चय करावा म्हणजे झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to ईश्वरचंद्र विद्यासागर


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
कथा: निर्णय
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
रत्नमहाल
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य