१९२५ जूनची १६ तारीख

सोमवारी अशी स्थिती होती आणि मंगळवार उजाडला. १९२५ जूनची १६ वी तारीख. हळूहळू मंत्रोच्चारण, रामनाम बंद होत चालले, शरीर थंड होत चालले. वाणी बंद झाली. सारे घाबरले. कलकत्त्यास तारा गेल्या. परंतु त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सारे संपले. ते महान जीवन अनंतात बुडून गेले. हिमालयाच्या महान शांतीत देशबंधूंच्या जीवनाचे करुणगंभीर सागरसंगीत, मधुर उत्कट सागरसंगीत, विलीन झाले.

तपस्विनी वासंतीदेवी

दाजिर्लिंगहून तो पवित्र देह कलकत्त्यास न्यावयाचा होता. वासंतीदेवी दुःख गिळून गंभीर झाल्या होत्या. दार्जिलिंग सोडताना मुलेबाळे जवळ घेऊन त्यांनी पुढील प्रार्थना म्हटली.

'तुमि बंधु, तुमि नाथ, निशिदिन तुमि आमार
तुमि सुख, तुमि शान्ति, तुमि हे अमृत पाथार
तुमि तो आनन्दलोक, जुडाओ प्राण, नाशो शोक
तापहरण तोमार चरण असीम शरण दीन जनार'

(हे प्रभो, तूच बंधू, तूच नाथ, रात्रंदिवस तू आमचा आहेस. तू सुख; तू शांती; तूच अमृतधारा; तू आनंदाचा ठेवा; माझा शोक दूर कर; नवजीव दे; ताप हरण करणारे तुझेच चरण; गरीब जनांचा तूच एक थोर आधार.)

अशी प्रार्थना म्हणून नंतर शव उचलण्यात आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel