प्रभातसमयीं नभा शुभ रविप्रभा फांकली ।  स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली ।।

म्हणोनि कर जोडूनी करुं अतां गुरुप्रार्थना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 1 ।।

तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता ।  परन्तु गुरुची करी न रविही कधीं साम्यता ।।

पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 2 ।।

रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा ।  तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा ।।

हरोनि अभिमानही जडवि तत्पदीं भावना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 3 ।।

गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी ।  कुठोनि मग येई ती कवनिं या उगी पाहुणी ।।

तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 4 ।।

समाधि उतरोनियां गुरु चला मशीदीकडे ।  त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ।।

अजातरिपु सदुरो अखिलपातका भंजना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 5 ।।

अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले ।  वोलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिलें ।।

असा सुहितकारि या जगतिं कोषिही अन्य ना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 6 ।।

असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुची कृपा ।  न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ।।

जरी गुरुपदा धरी सुदृढ़ भक्तिने तो मना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 7 ।।

गुरो विनति मी करीं हृदयमंदिरीं या बसा ।  समस्त जग हें गुरुस्वरुपची ठसो मानसा ।।

करो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना ।  समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 8 ।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel