भजन - ११

येइ रे भोळिया ! भेट झडकरी ।

पाहु दे डोळिया मूर्ति गोजिरी ॥धृ॥

कुंजविहारी ! गिरिवरधारी !

मनमोहन ! राधा-मनहारी ! ॥भोळिया ! ० ॥१॥

या भवधारी, मन दुःखारी ।

तुजविण कोण दुजा कैवारी ? ॥॥भोळिया ! ० ॥२॥

मधुर बासरी, ऎकवि तारी ।

तुकड्यादासा आज निवारी ॥भोळिया ! ० ॥३॥

भजन - १२

बोलु काय ? बोलवेन , आपुलिया दोषा ।

तूचि सर्व-साक्षी आदी, अनादी परेशा ! ॥धृ॥

त्रिविध तापांचा संग, न पाहावे डोळा ।

रिपु क्लेश त्रास देती, वाढवोनि ज्वाळा ॥१॥

आसक्ति गुंतवी, तुझ्या सोडुनिया प्रेमा ।

कर्म-धर्म नष्ट होती, ढासळिता नेमा ॥२॥

ऎसिया चिंतनी वेळ, जातसे निधाना !

लाज वाटे सांगताचि, तुज घनश्यामा ! ॥३॥

करि कृपा त्रास टाळी, जाचणी यमाची ।

तुकड्यादास ठाव देई, मागणे ते हेची ॥४॥

भजन - १३

असं वेड लावशिल कधी ? मी विसरिन माझी सुधी ॥धृ॥

तुज वाचुनि कवणा रुसू ? गे माय ! कुणाला पुसू ? ॥१॥

'हा देह मी' म्हणता भला, स्वात्मता न उरली मला ॥२॥

संशयी वृत्ति पाहुनी, अग ! लाज वाटते मनी ॥३॥

नच विरे गर्व बापुडा, सोडिचना अपुला धडा ॥४॥

जाणीव वाढली जरी, तरि अंधपणा वावरी ॥५॥

तुकड्यास ठाव दे अता, नच भासो देहात्मता ॥६॥

भजन - १४

सुखशांति या जगि ना दिसे । जन हे पिसे, फिरे वायसे ॥धृ॥

अति थोर राजा, जयाचा अगाजा !

धरि लोभ तोही, मनासी रुसे, दुःख-सायसे ॥१॥

रमे रम्य लोकी, मुखासी विलोकी ।

झुरे अंतरीही,'करावे कसे ?' दुःख-सायसे ॥२॥

गडी तुकड्याचा, कुणी ना कुणाचा ।

झरा स्वारथाचा, मुळाशी वसे, दुःख-सायसे ॥३॥

भजन - १५

समाधान हे विषयी नसे । पाहता दिसे, कळे सायसे ॥धृ॥

विचारी मना रे ! त्यजी सर्व वारे ।

धरी संत-पाया, सुख देतसे, कळे सायसे ॥१॥

सुखी कोण झाला ? जगी या निवाला ?

न राजा दिसे बा ! प्रजाही नसे, कळे सायसे ॥२॥

गडी तुकड्याचा, हरी हा सुखाचा ।

धरा भाव याचा, सुखी व्हा असे, कळे सायसे ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel