महाबोधी विहार हे बिहार राज्यातील बोधगया (बुद्ध गया) मधील एक महा बौद्ध विहार आहे. यास जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. शाक्य वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान (संबोधी/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध' बनले, व 'बुद्ध' म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. बोधगया ही बिहार राज्यातल्या पाटना शहरापासून ९६ कि.मी. अंतरावर आहे. महाबोधी विहाराच्या पुढे, पश्चिम दिशेला पवित्र असा बोधीवृक्ष आहे. पाली भाषेत या ठिकाणाला 'बोधीमांद' असे म्हणतात आणि तीथे असलेल्या मठाला 'बोधीमांद–विहार' असे म्हणतात. इथल्या सर्वात उंच गोपुराची उंची ५५ मीटर म्हणजे १८० फूट आहे.