''दादा मी साप होतो. तुम्ही माझी भूक शमवण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. आम्ही सापहि केलेले उपकार स्मरतो. येतो दादा, सुखी व्हा.'' असे म्हणून तो भाऊ साप होऊन फण् करीत निघून गेला.

थोडया अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला, ''दादा, मलाहि निरोप दे''
''का रे जातोस?''

''दादा, मी तो बेडूक. सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचविलेत. तुमचे उपकार फेडण्यासाठी मी तुमचा भाऊ बनलो. आम्ही य:कश्चित बेडुक. परंतु केलेले उपकार आम्ही स्मरतो.'' असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला व टुणटुण उडया मारीत निघून गेला.
पुन्हा थोडया अंतरावर बहिण म्हणाली, ''दादा, मलाहि निरोप दे.''

''तूहि चाललीस?''
''होय दादा, पाडसे वाट पहात असतील. मी ती हरिणी. तू माझ्यावर बाण सोडणार होतास. परंतु तुझे मातृप्रेम जागे झाले. तू मला मारले नाहीस. तुझे उपकार फेडायला मी हरिणी झाले. आता जाते. सुखी हो, असाच दयाळू मायाळू हो.''

बहीण हरिणी बनून कृतज्ञतेने मधून मधून मागे बघत वा-याप्रमाणे पाडसाकडे पळत गेली.
राजपुत्र आता एकटाच राहिला. विचार करीत तो निघाला. पशुपक्ष्यांतहि केवढी कृतज्ञताबुध्दि असे त्याच्या मनात येत होते. मग माणसाने किती चांगले वागले पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला. आणि या विचारात तो आपल्या घरी आला. पहाटेची वेळ होती.

मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे. ती गच्चीत उभी होती, देवाला प्रार्थीत होती.
''कोण आहे?'' पहारेक-यांनी दरडावले.
''मी राजपुत्र.''

''माझा बाळ, माझा बाळ'' म्हणत राणी धावतच खाली आली. तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. राजाहि आला. पुत्र पित्याच्या पाया पडला.

''शहाणा होऊन आलास?'' राजाने विचारले.

''होय तात'' तो नम्रतेने म्हणाला.

राजाने राजपुत्राला गादीवर बसविले. त्याचे लग्नही करून दिले. राजाराणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेली. नवीन राजाराणी उत्कृष्ट राज्यकारभार चालवू लागली. सारी प्रजा सुखी झाली. तुम्ही आम्हीही होऊ या.
गोष्ट आमची संपली. शेरभर साखर वाटली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel