राम : तुम्ही म्हणता. तो हिंदूंचा अपमान करतो. मुसलमान म्हणतात, तो मुसलमानांचे अहित करतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की, तो दोघांना सांभाळू शकतो. दोघांना संयमात राहा असे सांगतो. विशाल भारत उभारू इच्छितो. महात्मा गांधी वगैरे हिंदुधर्माचे का शत्रू आहेत? हिंदुधर्माला त्यांच्यामुळे सात्त्वि तेज चढले आहे.

बाप : त्यांच्याइतकी हिंदुधर्माची हानी कोणीही केली नाही.

राम : पुरव्याशिवाय बोलणे पाप आहे. हिंदुधर्माची सेवा दोन प्रकारची. एक हिंदुधर्मातील थोर तत्त्वे जीवनात आणणे, दुसरे म्हणजे हिंदू समाजाची सेवा करणे. महात्माजी दोन्ही प्रकारची सेवा करीत आहेत. जीवनात सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणण्याचे जीवनावधी प्रयोग करीत आहेत. आणि ज्या जातीतून लोक विशेषत: परधर्मात जातात ते स्वधर्मात राहावे म्हणून त्यांची सेवा करीत आहेत. भिल्ल, हरिजन वगैरे मागे पडलेल्या, तुम्ही उपेक्षिलेल्या शेकडो जातीतून कोटयवधी लोक परधर्मात गेले. ती भोके महात्माजी व त्यांचे सेवक ठायी ठायी आश्रम काढून आज २० वर्षे बुजवीत आहेत. परधर्मात गेलेली एखादी स्त्री वा पुरुष तुम्ही शुध्द करून घेता व टिप-या बडवता. परंतु लाखो जातीत ते जाऊ नयेत म्हणून मुकेपणाने महात्माजी सेवाद्वारा व्यवस्था करीत आहेत.

बाप : ते मुसलमानांना डोक्यावर घेतात.

राम : त्यांनी सत्याला डोक्यावर घेतले आहे. सेवेला डोक्यावर घेतले आहे. मुसलमान या देशात शेकडो वर्षे राहिले. त्यांच्याजवळ जर आपणास नीट राहता आले नाही, तर सदैव मारामा-याच होत राहणार. यासाठी दोघांनी स्नेहभावाने राहावे असे त्यांना वाटते. त्यांना चिडवणे किंवा डिवचणे हा तो मार्ग नव्हे.

बाप : मुसलमानांनी का चिडावे?

राम : कोण म्हणतो?

बाप : मग त्याचा निशेध तुम्ही का करीत नाही?

राम : मुसलमानांचा निषेध करणे म्हणजे तमाम सारा मुसलमान समाज वाईट म्हणणे असा नव्हे. तुम्ही सर्व समाजाला नावे ठेविता. सात कोटी लोक का सारे पै किंमतीचे? त्यांना का हृदय नाही? मुलमानांतील गुंडांचा किंवा हिंदूंतील गुंडांचा-सर्व गुंडांचा- निषेध काँग्रेस करते. वाईट लोक सर्वांमध्ये आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel