विश्वादि-जनन-त्राण: स्वाहाशक्ति: सकीलक: ।
अमृत-अब्धि-कृत-आवास: मद-घूर्णित-लोचन: ॥६६॥
३४१) विश्वादिजननत्राण---विश्वाचा आदि जो हिरण्यगर्भ याचा जन्म व पालन ज्याच्याकडून होते तो. विश्वादिकांच्या उत्पत्तीचा त्राण;
३४२) स्वाहाशक्ति---जो साक्षात्‌ स्वाहाशक्ती आहे. स्वाहा म्हणजे सुवहा. ज्या शक्तिद्वारा देवतांप्रत प्रार्थना पोहोचविल्या जातात  ती स्वाहाशक्ती.
३४३) सकीलक---कीलक हा मंत्रशास्त्रातील एक विधी आहे. (कीलक म्हणजे खिळा. खिळ्याने वस्तू पक्की करावी तसा कीलकाद्वारे मंत्र पक्का, स्थिर होतो.) जो कीलकाने युक्त आहे असा.
३४४) अमृताब्धिकृतावास---अमृतसागरात ज्याचा निवास आहे असा. अमृतपाना रमलेला.
३४५) मदघूर्णितलोचन---गंडस्थळातून झरणार्‍या मदाने ज्याचे नेत्र धुंद (चंचल) झाले आहेत.
उच्छिष्टगण: उच्छिष्टगणेश: गणनायक: ।
सार्वकालिकसंसिद्धि: नित्यशैव: दिगम्बर: ॥६७॥
३४६) उच्छिष्टगण---ज्याचे गण उत्कृष्ट आणि शिष्ट (शिष्ट म्हणजे सुसंस्कृत, विद्वान्‌) आहेत.
३४७) उच्छिष्टगणेश---उत्कृष्ट आणि शिष्ट गणांवर ज्याची सत्ता चालते असा. तंत्रमार्गातले वामाचारी लोक या गणपतीची आराधना करतात. उच्छिष्ट गणपतिपंथाचे अनुयायी जातीपातींचा भेद मानीत नाहीत. ‘मद्य’ व ‘मैथुन’ हे दोन ‘म’ कार या पंथात विहित आहेत. या पंथाचे लोक कपाळावर लाल टिळा लावतात. (श्रीविद्यार्णवतंत्र)
३४८) गणनायक---समस्त गणांचा नायक.
३४९) सार्वकालिकसंसिद्धि---ज्याच्या सिद्धी सार्वकालिक, त्रिकालाबाधित आहेत.
३५०) नित्यशैव---सदैव कल्याणाचेच (शिव) चिन्तन करणारा. नित्य शिवाचेच चिंतन करणारा.
३५१) दिगंबर---दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा.
अनपाय: अनन्तदृष्टि: अप्रमेय: अजरामर: ।
अनानिल: अप्रतिरथ: हि अच्युत: अमृतम्‌ अक्षरम्‌ ॥६८॥
३५२) अनपाय---अपायरहित. अविनाशी. अपाय म्हणजे नाश, संकट या गोष्टींपासून रहित असणारा.
३५३) अनन्तदृष्टि---दृष्टीचा संबंध ज्ञानाशी येतो. ज्याची ज्ञानदृष्टी अमर्याद, असीम आहे. ज्याच्या ज्ञानदृष्टीला अन्तच नाही असा.
३५४) अप्रमेय---प्रमेय म्हणजे प्रमाणांचा विषय किंवा सिद्ध करण्याची गोष्ट. विषय हे इंद्रियगम्य असतात. जो इंद्रियगम्य नाही असा तो. ज्याला इंद्रियांनी जाणता येत नाही.
३५५) अजरामर---अजर + अमर = अजरामर: - जरा म्हणजे वृद्धत्व. ज्याला वृद्धपणा नाही व अमर म्हणजे मृत्यूही नाही असा.
३५६) अनाविल---आविल म्हणजे दूषित. अनाविल म्हणजे अत्यंत शुद्ध.
३५७) अप्रतिरथ---प्रतिरथ म्हणजे तुल्यबल प्रतिस्पर्धी. ज्याला कोणीही तुल्यबल प्रतिस्पर्धी नाही असा.
३५८) अच्युत---च्युत होणे म्हणजे मूळ स्थानावरून खाली येणे. अच्युत म्हणजे जो आपल्या मूळ स्थानापासून कधीही ढळला नाही. ज्याचे कधीही अध:पतन होत नाही.
३५९) अमृतम्‌---मृत्यूच्याही पलीकडे असणारा. मोक्षरूप.
३६०) अक्षरम्‌---क्षर म्हणजे कमी होणे, अक्षर म्हणजे कमी होणे, झिजणे हे विकार ज्याला नाहीत असा. अविनाशी.
अप्रतर्क्य: अक्षय: अजेय:अनाधार: अनामय: अमल: ।
अमोघसिद्धि: अद्वैतम्‌ अघोर: अप्रमितानन :॥६९॥
३६१) अप्रतर्क्य---ज्याच्याविषयी काहीही तर्क करता येत नाही. तर्काने अगम्य.
३६२) अक्षय---ज्याला क्षय नाही असा क्षयरहित. अविनाशी.
३६३) अजेय---अजिंक्य. ज्याला जिंकता येत नाही.
३६४) अनाधार---ज्याला कोणाचाही, कसलाही आधार लागत नाही. आधारशून्य.
३६५) अनामय---जो निरोगी आहे, सुदृढ आणि निकोप आहे.
३६६) अमल---जो शुद्ध, दोषरहित आहे. विकाररूपी मल नसणारा.
३६७) अमोघसिद्धि---ज्याच्या सिद्धी कधीही निष्फळ ठरत नाहीत. ज्याच्याजवळ अव्यय सिद्धी आहेत.
३६८) अद्वैतम्‌---प्रपंचरून द्वैताच्या जो अतीत म्हणजे पलीकडे आहे.
३६९) अघोर---भयानक नसलेला, सौम्य.
३७०) अप्रमितानन---अप्रमित म्हणजे मोजता न येणारे. आनन म्हणजे मुख ज्याची असंख्य मुखे आहेत.
अनाकार: अब्धि-भूमि-अग्नि-बलघ्न: अव्यक्तलक्षण: ।
आधारपीठ: आधार: आधार-आधेय-वर्जित: ॥७०॥
३७१) अनाकार---आकाररहित - कोणत्याही मर्यादेत न बसणारा. निराकार.
३७२) अब्धिभूम्यग्निबलघ्न---क्लेदन म्हणजे भिजविणे हे अब्धि म्हणजे जलाचे बल होय. स्तम्भन म्हणजे स्तब्धता, प्रतिबंध, नियमन हे भूमी म्हणजे पृथ्वीचे बल आणि दहन म्हणजे जाळणे हे अग्नीचे बल होय. ही बले निष्प्रभ करणारा.
३७३) अव्यक्तलक्षण---मानवाच्या बहिर्मुखबुद्धिने ज्याच्या स्वरूपलक्षण तथा तटस्थ लक्षणाची अभिव्यक्ती होत नाही असा बाह्यलक्षणांनी ज्याची ओळख होत नाही. जो स्व-रूप लक्षण आहे.
३७४) आधारपीठ---विश्वादी समस्त तत्त्वांचे आधारस्थान असणारा. पृथ्वीपासून शिवापर्यंत छत्तीस आधारभूत तत्त्वांचाही (शिव-शक्ती-सदाशिव-ईश्वर-शुद्धविद्या-माया-विद्या (अविद्या)-कला-राग-काल-नियती-जीव-प्रकृती-मन-बुद्धी-अहंकार-श्रोत्र-त्वक्‌ (त्वचा)-चक्षु-जिह्वा-घ्राण-वाक्‌-पाणी (हात)-पाद (चरण)-पायु (गुदद्वार)-उपस्थ (जननेंद्रिये) शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध-आकाश-वायू-तेज-जल आणि पृथ्वी ही आधारभूत तत्त्वे आहेत.) आधार असणारा.
३७५) आधार---अनंतकोटी ब्रह्माण्डांचा आधार स्थान असणारा. अ = विष्णू आणि आ = ब्रह्मा यांना धारण करणारा.
३७६) आधाराधेयवर्जित---आधार-आधेय भावरहित, अद्वैतस्वरूप.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel