चिन्तामणिद्वीपपति: कल्पद्रुमवनालय: ।
रत्नमण्डपमध्यस्थ: रत्नसिंहासनश्रय: ॥३४॥
१९१) चिन्तामणिद्वीपपति---चिन्तिले ते क्षणात देणारा तो चिन्तामणी. अशा चिन्तामणिरत्नांच्या द्वीपाचा म्हणजे जणू काही बेटाचाच अधिपती.
१९२) कल्पद्रुमवनालय---कल्पवृक्षांचे वन हेच ज्याचे निवासस्थान आहे असा.
१९३) रत्नमण्डपमध्यस्थ---रत्नजडित मंडपात मध्यभागी विराजमान असलेला.
१९४) रत्नसिंहासनाश्रय---रत्नजडित सिंहासनावर विराजमान असलेला.
तीव्राशिरोद्‌धृतपद: ज्वालिनीमौलिलालित: ।
नन्दा-नन्दित-पीठश्री: भोगदा-आभूषित-आसन: ॥३५॥
१९५) तीव्राशिरोद्‌धृतपद---तीव्रा नामक पीठशक्तीने ज्याचे चरण आपल्या मस्तकावर धारण केले आहेत असा.
१९६) ज्वालिनीमौलिलालित---ज्वालिनीनामक शक्तीने आपले मुकुटधारी मस्तक मोठया प्रेमाने ज्याच्या चरणांवर ठेवले आहे असा.
१९७) नन्दानन्दितपीठश्री---नन्दा नामक शक्ती ज्याच्या पीठाच्या शोभेची आनंदाने स्तुती करीत आहे असा तो.
१९८) भोगदाभूषितासन---ज्याचे सिंहासन भोगदा नामक शक्तीने सुशोभित केले आहे असा.
सकामदायिनीपीठ: स्फुरत्‌-उग्रासन-आश्रय: ।
तेजोवतीशिरोरत्न: सत्य-अनित्य-अवतंसित: ॥३६॥
१९९) सकामदायिनीपीठ---ज्याचे पीठ कामदायिनी शक्तीने अलंकृत केले आहे असा.
२००) स्फुरदुग्रासनाश्रय---उग्रा नामक शक्तीने चमकणार्‍या सिंहासनावर जो विराजमान आहे असा.
२०१) तेजोवतीशिरोरत्न---तेजोवती नामक शक्ती ज्याच्या मस्तकावर रत्नरूपात सेवा करते असा तो.
२०२) सत्यानित्यावतंसित---सत्या नामक शक्ती ज्याला नित्य आपल्या मस्तकावर आभूषण म्हणून धारण करते असा.
सविघ्ननाशिनीपीठ: सर्वशक्ति-अम्बुज-आश्रय: ।
लिपि-पद्मासन-आधार: वह्मि-धाम-त्रय-आश्रय: ॥३७॥
२०३) सविघ्ननाशिनीपीठ---विघ्ननाशिनी शक्तीने ज्याचे पीठ सुशोभित केले आहे असा. वरील अष्टशक्तींनीयुक्त. तीव्रा-ज्वालिनी-नन्दा-भोगदा-कामदायिनी-उग्रा-तेजोवती-सत्या. कमळाच्या मध्यभागी विघ्ननाशिनी पीठदेवता असते.
२०४) सर्वशक्त्यम्बुजाश्रय---अम्बुज म्हणजे कमळ. सर्व शक्तींनीयुक्त अशा कमलासनावर जो विराजमान आहे असा.
२०५) लिपिपद्‌मासनाधार---जो अक्षरयुक्त कमलासनावर (मातृकापद्‌मावर) विराजमान आहे असा. क पासून ज्ञ पर्यंतचे वर्ण हे मंत्रशास्त्रातील बीजरूपात अतीव दिव्य प्रभावशाली आहेत. अशा समस्त मंत्रांवर श्रीगणेशाचीच सत्ता चालते.
२०६) वह्निधामत्रयाश्रय---वह्नि म्हणजे अग्नी. वह्निधाम म्हणजे अग्निकुण्ड. यज्ञकुण्ड. अग्नीच्या तीन धामांचे म्हणजे स्थानांचे म्हणजे सूर्य, चन्द्र व अग्नी या तिघांचे आश्रयस्थान असलेला.
उन्नतप्रपद: गूढगुल्फ: संवृत्तपार्ष्णिक; ।
पीण-जङ्घ: श्लिष्टजानु: स्थूल-ऊरु: प्रोन्नमत्कटि: ॥३८॥
२०७) उन्नतप्रपद---भरगच्च पावले असणारा. ज्याच्या पायांचा चवडा कूर्मपीठाप्रमाणे उंच आहे असा.
२०८) गूढगुल्फ---ज्याचे घोटे मांसात लपले आहेत. गुबगुबीत पावलांचा. (गुल्फ = घोटे)
२०९) संवृत्तपार्ष्णिक---ज्याच्या पायांच्या टाचा मांसल आहेत. गोलाकार आहेत असा. (पार्ष्णि = टाच)
२१०) पीनजङ्घ---ज्याच्या पोटर्‍या मांसल आहेत असा. पीन म्हणजे पुष्ट. (जङ्घा = पोटरी)
२११) श्लिष्टजानु---ज्याचे गुडघे मांसात लपले आहेत. स्पष्ट दिसत नाहीत असा. (जानु = गुडघा)
२१२) स्थूलोरु---ज्याच्या मांडया स्थूल म्हणजे मांसल आहेत असा. (ऊरू = मांडया)
२१३) प्रोन्नमत्कटि---ज्याची कंबर (कटिप्रदेश) उंच व बाकदार आहे.
निम्ननाभि: स्थूलकुक्षि: पीनवक्षा: बृहद्‌भुज: ।
पीनस्कन्ध: कम्बुकण्ठ: लम्बोष्ठ: लम्बनासिक: ॥३९॥
२१४) निम्ननाभि---न्याची नाभी खोल आहे असा. (निम्न = खोल)
२१५) स्थूलकुक्षि---ज्याचे पोट अतिविशाल आहे असा.
२१६) पीनवक्षा---ज्याची छाती भरदार आहे असा. (पीन = पुष्ट, वक्ष = छाती)
२१७) बृहद्‌भुज---ज्याचे हात लांब आहेत.
२१८) पीनस्कन्ध---ज्याचे खांदे भरदार आहेत.
२१९) कम्बुकण्ठ---कम्बु म्हणजे शंख. ज्याचा गळा शंखाप्रमाणे गोलाकार व वर निमुळता होत जाणारा आहे. शंखाकार आहे.
२२०) लम्बोष्ठ---ज्याचे ओठ पसरट किंवा लोंबणारे आहेत.
२२१) लम्बनासिक---ज्याचे नाक (सोंड) लोंबणारे आहे असा.
भग्न-वाम-रद: तुङ्ग-सव्य-दन्त: महाहनु: ।
र्‍हस्वनेत्रत्रय: शूर्पकर्ण: निबिडमस्तक: ॥४०॥
२२२) भग्नवामरद---ज्याचा डावा दात तुटला आहे. डावा शब्द मायेसाठी वापरतात. ज्याच्यापाशी मायेची सत्ता खंडीत होते किंवा संपते. (वाम = डावा, रद = दात)
२२३) तुङ्गसव्यदन्त---ज्याचा उजवा दात लांब व उंच आहे.
२२४) महाहनु---ज्याची हनुवटी मोठी आहे, पुष्ठ आहे असा.
२२५) र्‍ह्स्वनेत्रत्रय---ज्याचे तीन डोळे बारीक आहेत. सूक्ष्मदृष्टीचे प्रतीक आहेत.
२२६) शूर्पकर्ण---ज्याचे कान सुपासारखे आहेत. ज्याचे कान वाईटाचा त्याग करून चांगल्याचेच श्रवण करतात.
२२७) निबिडमस्तक---ज्याचे मस्तक घट्ट व टणक आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel