(४)  संयुक्त प्रांतात म्हणे मुसलमानांना सवलती किती?  तुमचे लोकशाही पक्षाचे श्री जमनादास मुंबइर्त मंत्री असतां सोन्यामारुति प्रकरण झालें.  जमनादासांनी कां मुसलमान झोपडले? हिंदु सत्याग्रही त्यांच्या कारकीर्दीत तुरुंगांतच घातले ना? मग संयुक्त प्रांतांत तर अधिकच परिस्थिति कठीण आहे.  तेथे केवळ लोकसंख्येची हिशेबी वृत्ति ठेवून भागत नाहीं.  तुम्ही मंत्री असता तर काय केलें असतेंत हें तुमच्या जमनादासी सोन्या मारुति प्रकरणांतील इतिहासानें कळून येत आहे.

(५) काँग्रेस मुसलमानधार्जिणी आहे असें तुम्ही म्हणतां.  मुस्लीम लीगवाले काँग्रेस हिंदुधार्जिणी आहे असें म्हणतात.  तेव्हां हे दोन्ही आरोप परस्पर खंडिले जाऊन काँग्रेस सर्वांचा सांभाळ करणारीं ठरते.  काँग्रेसला शिव्या देण्यांत का होईना हिंदुमहासभा व मुस्लीम लीग यांची एकी आहे ही त्यांतल्या त्यांत आनंदाची गोष्ट.

(६)  मुसलमान अत्याचार करतात.  आधीं हिंदुमहासभावाल्यांनी हरिजनांवरील अत्याचार दूर करावे.  स्वत:तील श्रेष्ठ-कनिष्ठपणा दूर करावा.  यजुर्वेदी, ऋग्वेदी प्रकार बंद करावे.  मग मुसलमानी अत्याचारंकडे वळूं.  अमळनेरच्या मिलमधील स्त्रियांची अब्रू कशी विकली जाते याची चौकशी जर तेथील तत्त्वज्ञानांतील कांही तत्त्वज्ञानी, मिलमधील हिंदु अभिमानी करंदीकर, दलाल वगैरे, तसेच गांवातील स्त्रियांच्या अब्रूची चाड असणारे, इतर करतील व ती पै किंमतीची होऊं नये म्हणून हे कारखाने सारे राष्ट्राच्या मालकीचे व्हावेत म्हणून क्रांति करावयास उठतील तर यांना नीतीची व धर्माची चाड आहे असे म्हणता येईल.

गरिबीमुळें हिंदुस्थानांत सर्वच स्त्रियांची विटंबना आहे.  मिलमधून स्त्रियांना नरकासारख्या स्थितींत रहावे लागतें.  पोटासाठी, पोटच्या पोरासाठीं इतरत्रहि स्त्रियांना अब्रूचें मोल द्यावें लागतें. अब्रूचा हा वध हिंदुमहासभावाल्यांस दिसेल तर ते सामाजिक क्रांति करावयास ऊठतील.

परंतु अशी सामाजिक क्रांति करावयाची भाषा ऐकतांच ते अधर्म अधर्म म्हणून शंख करतात.  कोण एक महान् हिंदूमहासभावाले पुण्याच्या सभेंत एकदां बोलले, ' साम्यवाद राष्ट्रांतील धनदौलत समाईक करणार.  आमच्या स्त्रियांचीहि वाटणी करणार का?'  या हिंदुमहासभावाल्यांची स्त्रियांकडे आपली एक मालमत्तेची वस्तुं असें पाहण्याची अशी ही दृष्टि आहे.  स्त्रिया म्हणजे जणु एक मालकीची भोग्य वस्तु आहे!  साम्यवादी लोकांची ती दृष्टि नाहीं.  तें स्त्रियांची वाटणी नाहीं करणार.  स्त्रियांना आत्मा आहे, स्वातंत्र्य आहे असें ते मानतात.  स्त्रियांना ते जड समजत नाहींत.  स्त्रियांना जड समजणा-या, घरींदारीं त्यांना केवळ सुखीदु:खी गुलामाप्रमाणें वागविणा-या अशा या हिंदुमहासभावाल्यांस स्त्रियांची अब्रु ही वस्तु काय हें कळावयांस अद्याप शेंकडों जन्म घ्यावे लागतील. स्त्रियांची अब्रु मग एकटा मुसलमान गुंडच दवडीत नसून सर्वत्रच दवडली जात आहे, हे सत्य त्यांना समजून येईल.  मग जळगांव, धुळें, अमळनेर वगैरे कारखान्यांतील स्त्रियांची विटंबना त्यांना दिसेल.  त्या कारखानदारांविरुध्द बंडाचा झेंडा घेऊन ते उभे रहातील.  परंतु मग शेटजींकडून लाखें रुपये मिळणे बंद होईल. ज्याला ज्याला लाखों मायबहिंणींची अब्रु वांचवायची असेल तो साम्यवादाची दिव्य स्थापना करण्यासाठीं सारें जीवन देईल.  स्त्रियांची विटंबना हिंदुमहासभावाले वा अन्यवाले यांना थांबविता येणार नाहीं.  ती एक दिवस साम्यवादच थांबवील.  साम्यवादच खरा माणुसकीचा, न्याय-नीतीचा, सर्वांगीण विकासाचा, ख-या संस्कृतीचा धर्म आणील.  बाकीच्यांचे बडबडणें म्हणजे केवळ दंभ आहे.  नवाबांचे, श्रीमंतांचे संसार ते अधिक सुंदर करतील, परन्तु कोट्यवधि कुटुंबातील हायहाय त्यांना ऐकूंहि येत नसते व तिचें त्यांना कांही वाटतहिं नसतें.

-- वर्ष २, अंक १५.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel