३२ आपलीं राज्यें गेलीं व इंग्रजांचें कसें आलें?

[बालबोध मासिकांत पुष्कळ वर्षापूर्वी कै. ओक यांनी पुढील आंग्रे यांची गोष्ट दिली होती, तिचा मी उपयोग केला आहे.]

जगांतील कोणत्याहि व्यवहाराचा तुम्हीं विचार करा तुम्हांला असें आढळून येईल कीं, कारणांवाचून कोणतेहि कार्य घडत नसतें.  पुष्कळ वेळां कार्य स्पष्टपणे दिसतें, परन्तु कारण मात्र चटकन् ध्यानांत येत नाहीं.  परन्तु यावरून त्या कार्यास कारणच नाहीं असें म्हणणें चुकींचे होईल.  ज्याप्रमाणे एखादा मुलगा आजारी पडता म्हणजे तो म्हणतो ' कां बोवा आजारी पडलों कांहीं समजत नाहीं. '  परंतु हळुहळू अनेंक कारणें जमत आलेलीं असतात, हें त्यास कोठें माहित होतें?  कधीं जागरण केलें असेल, कधी ऊणें अधिक खाल्ले असेल, कधीं उन्हांतून येतांच पाणी प्यायला असेल.  या सर्व कारणांचा संमिश्र परिणाम म्हणजे तो आजार.  प्रत्येक गोष्टीस पूर्वेतिहास आहे.  हा इतिहास शोधावा, हीं कारणें शोधावीं व तीं दूर करावीं.  उगीच दैवावर ढकलूं नये.  दैवाचा अर्थ हाच कीं अज्ञान व अदृश्य अशा कारणांची मालिका.

आम्हीं लोक या देशांतले.  येथें आमचीं मोठमोठीं राज्यें होती. आम्हीं म्हणू ती पूर्व दिशा पूर्वी येथे होती;  ती राज्यें कोठें गेली?  आज सर्व हिंदुस्थानचा नकाशा तांबडा झाला आहे.  याची कारणें काय?  सातां समुद्रांपलीकडून येणा-या मूठभर लोकांच्या हातीं आम्ही गेलों कसे?  आम्हीं राजे होतो, आतां गुलाम झालों.  दुस-यास पाणी पाजणारे आम्हीं होतो;  आज दुस-याच्या ओंजळीनें पाणी पिणारे झालों आहोत.  केवढा हा चमत्कार आहे !  परन्तु या चमत्कारास कारणें नसतील का?  आहेत तर.

एकदां अलिबागेस आंग्रे ह्यांच्या वाड्यांच्या तिस-या मजल्याच्या खिडकीमध्यें बाबाजीं आंग्रे व एल्फिन्स्टन साहेब उभे राहून गोष्टी करीत होते.  खाली वाळवंटात उभय पक्षांची सैन्यें होती.  आंग्रे ह्यांचा समुद्रात किल्ला आहे.  ओहटीच्या वेळेस किल्ल्याजवळचें पाणी अगदीं कमी होतें.

राजकारणाच्या गोष्टी चालल्या होत्या.  बोलतां बोलतां बाबाजी आंग्रे यांनी एल्फिन्स्टन यांस विचारलें  'आमच्या देशांतील आमचीं स्वत:ची राज्यें नष्ट व्हावींत आणि त्यांच्या जागीं तुम्हा परकीयांची स्थापन व्हावीत असें होण्यांत तुम्हां-आम्हांत कमी. जास्त काय आहे?'

एल्फिन्स्टन म्हणाला  ' कमी जास्त काय आहे तें दाखवतों.  हीं आपलीं सैन्यें खाली उभीं आहेत.  थोड्याच वेळानें भरती येऊं लागेल.  या उभय सैन्यांस आपण तेथें उभें राहण्याविषयीं हुकूम करूं या आणि काय चमत्कार होतो तो पहा. '

उभय सैन्यास त्याप्रमाणें हुकूम झाले.  भरती येऊं लागली व पाणी वाढूं लागलें.  आंग्-यांचे सैन्य मागें पळूं लागलें.  परन्तु इंग्लिशांचे छातीपर्यंत पाणी झालें तरी हललें नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel