अशा प्रकारचा स्पृश्यास्पृश्य धर्म आपण शेकडों वर्षें पोसला, हे पाप पोसलें ; हें पाप दूर करावयास संत झिजले.  परंतु त्यांचे फक्त तोंडी जयजयकार करीत हें पाप आपण उराशीं धरलेंच आहे.  वर्णाश्रम धर्म म्हणजे स्पृश्यास्पृश्य धर्म नव्हे.  वर्णाश्रम धर्म एवढेंच सांगतो :  तुझ्या आवडीचें कार्य कर.  तें सेवाकार्य कोणतेंहि असो, तें पवित्र आहें तें मोक्ष देईल.  सजन कसाई उध्दरला.  चोखा उध्दरला.  सेना न्हावी उध्दरला, सांवतामाळी उध्दरला.  कोणतेंहि सेवाकर्म तुच्छ नाहीं.  वर्णधर्म, आश्रमधर्म म्हणजे ब्रह्मचर्य पाळ, मग गृहस्थाश्रम कर, मग वानप्रस्थ होऊन पुढें केवळ जगाचें पहाणारा संन्यासी हो.  वर्णाश्रम धर्माचीं आज नांवे उरलीं, आणि हा गुलामगिरीचा जुलुमाचा धर्म मात्र राहिला आहे. 

आम्हीं इंग्रजांजवळ न्याय मागतों आहोत.  कोठल्या तोंडानें मागावा?  शेतकरी म्हणतात, सावकार छळतो.  परन्तु खेड्यांतील स्पृश्य शेतकरी हरिजनांची साधी माणुसकीहि मातींत मिळवीत आहेत.  श्रमणारा किसान आज कष्टी आहे.  खंडोगणती ज्वारी निर्मिणारा आज कण्या खात आहे, उडीद खात आहे हें खरें.  किसानांची कसायांच्या हातची मान वांचविली पाहिजे.  परन्तु त्याबरोबर स्पृश्य किसानांनी श्रमी हरिजनांची मान नको का उंच करायला?  तुम्ही जगाला गुलाम कराल, तर ती गुलामी शतपट वाढून तुमच्या बोकांडीं बसते,  हा अनुभव आपणांस येतच आहे.

लाखों खेडयांतील किसानांना खरा धर्म कामगारांनी नेऊन द्यावा.  शेती वाडी जाऊन बेकार होऊन, घरांदारांस मुकून शेतकरीच शहरांत येऊन कामगार बनला.  कामगार तेवढा एक हा मंत्र तो शिकत आहे.  हिंदुमुसलमान, स्पृश्यास्पृश्य कामगार एका झेंडयाखाली येऊन माणूसकीसाठीं लढत आहेत.  कामगारांनी आपल्या खेड्यांतील बंधूंस हा समता धर्म नेऊन शिकवावा.  त्यांचेंच ते ऐकतील.  आमचें कोण ऐकतो?  खरा धर्म एक दिवस माझे कामगार बंधूच जगाला देतील.  धनधान्य निर्मिणारे, सुंदर वस्तूं निर्माण करणारे कामगारच माणुसकीचा धर्महि निर्मितील.

हिंदुमहासभा लढायला हैद्राबादला गेली.  ठीक.  जेथें अन्याय आहे तेथें जा.  परन्तु आपण हिंदूच हिंदूला ७ लाख खेड्यांत खात आहोत.  हरिजनांना माणसें मानीत नाहीं.  येथें कोण प्रचार करणार?  तेजस्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते थोर हरिजन-प्रेम किती जण उराशीं घेतील व खेड्यांतील स्पृश्यांचे शिव्याशाप व दगडधोंडे घेण्यास जातील?

आपणां सर्वांचेंच हें काम आहे.  सारे प्रचारक, कीर्तनकार, प्रवचनकार, सर्वांचे हें काम आहे.  पुण्याला मागें हिंदुमहासभा परिषद झाली होती.  तेथें अस्पृश्यता नष्ट करा सांगणारीं शेकडों व्याख्यानें खेडयांतून देण्याचे संकल्प   झाले.  परन्तु किती जणांनी संकल्प पार पाडले?

खेड्यांतील कष्टमूर्ति शेतकरी बंधो, नको हें पाप.  हरिजनांना प्रेम दे, माणुसकी दे.  त्यांना जवळ घे, त्यांना छळूं नको ; पिळूं नको.  त्याचा स्वाभिमान राख.  त्याला अशी मारहाण नको करूं.  त्याला दिलेली शिवी परमेश्वराला लागते.  त्याला मारलेली लाठी देवाच्या अंगावर उठते.  हरिजनांच्या छळानें त्या देवाच्या हृदयाचीहि चाळणी झाली असेल.  हरिजनांना पाणी दे.  विहिरीवर बसूं दे, ओटीवर सुपारी खाऊं दे.  ही गुलामगिरी दूर करशील तर तुझी गुलामगिरी दूर होईल.  उठ गडया, ख-या धर्माची कास धर.

पाणी फार गढूळ असेल तर त्यांत निवळ टाकावी लागते.  या सडलेल्या समाजाला शुध्द करण्यासाठीं हजारोंच्या प्राणार्पणाची का निवळ टाकिली पाहिजे?  राष्ट्रांतील ही घाण पाहून महर्षि सेनापतींच्या हृदयाची कशी तगमग होत असेल याची कल्पना येते.  हिंदु समाजा, जागृत हो.  खेड्यापाड्यांतील स्पृश्य समाजा, स्वधर्म व स्वकर्तव्य ओळख ; परन्तु लौकर न ओळखशील तर नवभारत त्यासाठी अनंत बलिदानसुध्दां उद्यां करील ! 

-- वर्ष २, अंक २७

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to गोड निबंध - भाग २


संभाजी महाराज - चरित्र (Chava)
गांवाकडच्या गोष्टी
मराठी बोधकथा  5
जातक कथासंग्रह
श्यामची आई
बाळशास्त्री जांभेकर
आस्तिक
बोध कथा
इन्दिरा गांधी
बुद्ध व बुद्धधर्म
श्रीएकनाथी भागवत
नलदमयंती
कृष्ण – कर्ण संवाद
ख्रिश्चन नावाचा सिंह
बाबासाहेब अांबेडकर