२३ सामर्थ्य व शुध्दी

राजबंदी दिन हिंदुस्थानभर साजरा झाला.  ठायीं ठायीं भाषणें झालीं.  कांही ठिकाणीं भाषणांतून असा सूर निघाला कीं, आज काँग्रेसचे सामर्थ्य कमी झाले आहे.  यामुळें पंजाब व बंगाल सरकार या बाबतींत कांही करूं इच्छित नाहींत.  आज आपणांत ऐक्य नाहीं.  वर्ष दोन वर्षापूर्वी काँग्रेसची जी शक्ति होती ती आज उरली नाहीं.

काँग्रेसचें बळ का कमी झालें?  बळ जनतेच्या पाठिंब्यातून येतें.  बहुजन- समाजाचा पाठिंबा म्हणजे पक्का खडक.  या खडकावर काँग्रेस उभी राहील तरच तिचें बळ टिकेल.  त्रिपुरी काँग्रेसच्या मंडपांत शेतक-यांच्या पुतळयाच्या आधारावर काँग्रेस व्यासपीठ उभारलें होतें.

परंतु बहुजनसमाजाचे प्रश्न अत्यंत उत्कटतेनें घेतले जात नाहीत.  महत्त्वाचे प्रश्न आधीं घ्यावयाचे सोडून दुसरेंच घेतले जातात.  किसान व कामगार म्हणजेच राष्ट्र.  राष्ट्राचा वांकलेला कणा आधीं सरळ करणें म्हणजेच काँग्रेसचें बळ वाढविणें.

पंजाब व बंगालमधील राजबंदी कां सुटावेत? राजबंदी सुटले म्हणजे ते बहुधा किसान कामगारांचे चळवळींत पडतात.  दहशतवादाची चूक त्यांना कळली.  एक साहेब मारून स्वराज्य मिळणार नाहीं, हे त्यांस उमजलें.  परंतु दुसरा मार्ग कोणता?  शास्त्रीय क्रांतीचा पंथ कोणता?  किसान व कामगार यांची संघटना हा तो मार्ग. बंगालमधील राजबंदी सोडण्यांत आले, व जर ते किसानांत व कामगारांत काम करूं लागले तर? 

काँग्रेसप्रांतातहि किसान व कामगार कार्यकर्ते साशंकतेने पाहिले जातात.  आज पेशावर प्रांतात मुख्य प्रधानांनी आपल्या पुत्रास अटक केली. अपराध काय?  तर तो सच्चा सेवक कुळांची बाजू घेऊन लढत होता.  पेशावर प्रांतात जमीनदार आहेत.  कुळांचे हाल अपार आहेत.  मुंबई इलाख्यांत कामगार कार्यकर्त्यांस  शाश्वति वाटत नाहीं.  बंगालमधील हक्क व पंजाबांतील सर शिकंदर म्हणतील, ' राजबंदी मुक्त केल्यावर त्यांना पुन्हा तुरुंगात घालावें लागेल.  काँग्रेस प्रांतातहि किसान कामगारांच्या कार्यकर्त्यांच्या नशिबाचा तुरुंग कोठें पूर्णपणें सुटला आहे? '

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel