हे आश्चर्यकारक बिनचूक पंचांग तयार करण्यांस त्यांना खगोल शास्त्राची फार मदत होई.  आज आपणाकडे जशा वेधशाळा आहेत तशा मयांच्या मध्य अमेरिकेंतहि होत्या.  परंतु मय लोंक आपण सूर्य, चंद्राकडे पाहण्यापेक्षा सूर्य चंद्रांना आपल्या योजनांकडे पहावयास लावीत.  मयांजवळ दुर्बिणी नव्हत्या.  उंच उंच मनोरे बांधून त्यांना लहान लहान खिडक्या मय लोक ठेवीत.  सूर्य जसजसा दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाई.  तसतशी त्याच्या किरणांची दिशा व कोन बदलत.  या फरकावरून मय लोक कोणता ऋतु चालू आहे हें बिनचूक सांगत.

मय लोक अत्यंत धार्मिक होते.  त्यांचीं अनेक देवळें होतीं.  ते अनेक देवता मानीत व त्यांची उपासना करीत.  देवांच्या पूजेकरितां पूजारी असत.  संन्यासी, जोगिणी यांचे संप्रदाय असत.  या संन्यासी-संन्यासिनींस अगदी व्रतस्थ राहावें लागे.  पातकाबद्दल मोठी शिक्षा म्हणजे केलेलें पातक चार लोकांसमक्ष कबूल करून पुन्हां तसें पातक न करण्याबद्दल निश्चय करणें - ही समज.  मृत्युपूर्वी आपलीं पातकें धमर्गुरूजवळ कबूल करून ते मोक्षाची याचना करीत.

मयांचा परस्परांवर विश्वास असे.  चोरीमारी सहसा होत नसे.  अन्यायाची त्यांना चीड असे.  धर्मयुध्द व नीति यांचे नियम फार कडक असत.  एवढीं मोठीं वैभवसंपन्न शहरें असत, परन्तु त्यांना तट वगैरे कांही नसे.  कारण अधर्मानें कोणी एकदम स्वारी करणार नाहीं असें त्यांना वाटे.  स्पॅनिश लोकांनी या त्यांच्या परोकोटीस गेलेल्या सद्गुणांचा नीचतम रीतीनें फायदा घेतला व मयांचें साम्राज्य धुळीला मिळविलें.  मय लोक विद्येचे मोठे व्यासंगी होते.  निरनिराळीं पुस्तकें त्यांनी लिहिलीं होतीं.  परंतु त्यापैकीं आज तीनच पुस्तकें उपलब्ध आहेत! बाकीचीं सर्व स्पॅनिश सैतानांनीं, पोपाच्या पापी यमदूतांनी भस्मसात् केलीं. ही जीं तीन पुस्तकें आहेत व मयांच्या इमारतींचे जे अवशेष आहेत व सांपडत आहेत त्यांच्या आधारें मयांच्या नितांतरम्य इतिहासाचा शोध लावण्याचें काम आज चालू झालें आहे व ज्या जंगलांतून जमिनीनें जातां येत नाहीं, त्या जंगलांची विमानांतून वरून पाहणी करीत आहेत व कोठें इमारतींचे अवशेष वगैरे दिसले की तेथे ऊतरतात! अशा प्रकारें विमानांचा उपयोग संशोधनार्थ लिंडबर्ग वगैरे करूं लागले आहेत.

मयांची संस्कृति उच्च व आदरणीय अशी होती.  सर्वभक्षक काळ व सर्वविनाशक स्वार्थी व दुष्ट मानव या दोघांच्या तडाक्यांत सांपडून ती संस्कृति नामशेष झाली हें पाहून कोणाहि सहृदयाचें मन उद्विग्न होईल.  मय लोकांबद्दल हिंदवासीयांना तर जास्तच आपलेपणा वाटेल.  स्पॅनिशांनीं जसें मयांना नाहीसें केलें, तशीच स्थिति आपण जागे झालों नाही तर आपलीहि होईल.

पाश्चात्य लोक आतां मयांचा कौतुकावह इतिहास लिहूं लागले आहेत, शोधू लागले आहेत.  परंतु पिलांसकट नरमादीस ठार मारून त्याच्या उरलेल्या सुंदर घरटयांचे कौतुक करून नक्राश्रु ढाळण्याप्रमाणेंच हें आहे!  १॥ कोटी मयांपैकीं आज किती हयात आहेत?  त्यांची लोकसंख्या एक लाखावर जाणार नाहीं.  अमेरिकेंतील रेड इंडियन, आस्ट्रेलियांतील बुशमेन यांची संख्या जवळजवळ नाहींशी झाली आहे.  या सर्वांचे कारण काय? कारण एकच आहे- तें हें कीं पाश्चात्यांनी केलेल्या कत्तली व कापाकापी! या पाश्चात्यांच्या आहारी सर्व पडले.  अमेरिकेंत तद्देशियांचीं अशीं अनेक राष्ट्रें नाहींशी झाली.  आपल्याकडे पाताळें सात होती अशी कल्पना आहे.  कदाचित् अमेरिकेंतील हीं सात राष्ट्रें असतील.  वैभवसंपन्न राजवाडे गेले, वेधशाळा गेल्या, ग्रंथ गेले, जडजवाहीर गेलें.  सर्व गेलें!  चक्रनेमिक्रम जर खरा असेल, तर तेच मय लोक यमसदृश पाश्चात्यांवर सत्ता गाजवतील, पुनश्च वैभवावर चढतील!  परंतु आज तरी ही कालचक्राची गति पाहून 'कालाय तस्मै नम:' असें म्हटल्याशिवाय राहावत नाहीं.       

--विद्यार्थी मासिंकातून.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to गोड निबंध - भाग २


संभाजी महाराज - चरित्र (Chava)
गांवाकडच्या गोष्टी
मराठी बोधकथा  5
जातक कथासंग्रह
श्यामची आई
बाळशास्त्री जांभेकर
आस्तिक
बोध कथा
इन्दिरा गांधी
बुद्ध व बुद्धधर्म
श्रीएकनाथी भागवत
नलदमयंती
कृष्ण – कर्ण संवाद
ख्रिश्चन नावाचा सिंह
बाबासाहेब अांबेडकर